संगणकाच्या अफाट, अमर्याद, जादूई विश्वाची सुरुवात झाली तेव्हा हे यंत्रही अवाढव्य होते. तेव्हाच्या संगणकाला चालवणारे प्रोसेसिंग युनिट म्हणजे जणू एखादी खोलीच. वाहिन्यांच्या जाळय़ांशी जोडल्या गेलेल्या अनेक सर्किट बोर्डानी बनलेल्या संगणकाच्या प्रोसेसरला स्मार्टफोनच्या सूक्ष्म अशा ‘चिप’वर आणण्याच्या प्रक्रियेचा संगणकाच्या सार्वत्रीकरणात मोठा वाटा होता. हा प्रवास अनेक वर्षांचा असला तरी, त्याचे भाकीत किंवा दिशादर्शन गॉर्डन मूर या अभियंत्याने १९६५ मध्ये केले होते. संगणकाच्या प्रोसेसरची निर्मिती करणाऱ्या ‘इंटेल’ या कंपनीचे संस्थापक असलेले गॉर्डन मूर यांचे नुकतेच, वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. संगणकाचा आकार कमी करण्याबरोबरच त्याचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यात ‘इंटेल’ कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस या संशोधक-द्वयाने १९६८ मध्ये इंटेल कंपनीची स्थापना केली. मात्र, त्याहीआधी गॉर्डन मूर हे लक्षवेधक ठरले ते ‘मूरस् लॉ’मुळे. १९६५ मध्ये मूर हे ‘फेअरचाइल्ड’ या अर्धवाहक (सेमीकंडक्टर) बनवणाऱ्या कंपनीत संस्थापक संचालक होते. त्यावेळी एका अमेरिकेतील मासिकात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी सेमीकंडक्टर आणि प्रोसेसिंग चिपचे भविष्य मांडले होते.

‘संगणकाच्या चिपवरील घटकांची संख्या दर दोन वर्षांनी दुप्पट होईल’  म्हणजेच, ‘भविष्यात संगणकाचा वेग आणि कार्यक्षमता यांच्यात कैकपटींनी वाढ होईल आणि त्याच वेळी त्याची किंमत कमी कमी होत जाईल’ असे सांगणाऱ्या त्या लेखात आकडेमोडही करून दाखवली होती. पुढील काही वर्षांत त्यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आणि नंतर संगणकीय प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांसाठी तो एक ‘सिद्धान्त’च बनला. इंटेल आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी संगणकीय प्रोसेसरच्या चिपचा आकार कमीत कमी करून किमतीही घटवण्यास सुरुवात केली. त्या पुढच्या काळात झालेल्या घरोघरी संगणक येण्याच्या क्रांतीतील तो एक महत्त्वाचा टप्पा होता. १९७० पासून अगदी २०२०पर्यंत मूर यांचा हा सिद्धान्त मायक्रोचिप निर्मात्या कंपन्याच नव्हे तर अ‍ॅपल, गूगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांच्या भरभराटीस कारण ठरला. स्मार्टफोन, व्हिडीओ गेम्स चालवणाऱ्या अतिसूक्ष्म प्रोसेसरमधील चिपच्या लघुकरणातही हेच तत्त्वज्ञान लागू पडले. परंतु आता चिपवरील ट्रान्झिस्टरची संख्या इतकी झाली की त्यांना सक्षम ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांच्याद्वारे वाहून नेल्या जाणाऱ्या ऊर्जेपेक्षाही अधिक होऊ लागली आहे. त्यामुळे मूर यांचा सिद्धान्त आता कालवश होण्याच्या मार्गावर आहे. त्याआधीच मूर हे काळाच्या पडद्याआड गेले. मात्र, आपला हा सिद्धान्त येत्या काही वर्षांत गैरलागू ठरेल, असे भाकीतही त्यांनी २००५ मध्येच करून ठेवले होते, हे विशेष.  इंटेलमधील तीन दशकांच्या कार्यसेवेनंतर निवृत्ती स्वीकारणाऱ्या मूर यांनी पत्नीच्या जोडीने आपल्या तिजोरीतील पाच अब्ज डॉलरचा निधी स्वयंसेवी संस्थेत ओतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली. त्यांच्या एकूण कार्याला पोचपावती म्हणून अमेरिकेतील ‘मेडल ऑफ फ्रीडम’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले होते.

HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती