कलापथके, मेळे यातून झालेली सुरुवात, प्रभातसारख्या स्टुडिओ कंपन्यांच्या काळात काम करण्याचा अनुभव ते पुढे स्वतंत्र चित्रपटनिर्मिती सुरू झाल्यानंतर बदलत गेलेल्या कालप्रवाहानुसार स्वत:त बदल करून मालिका-नाटक-चित्रपट सर्वच माध्यमांत आपल्यातील कलाकार सिद्ध करणे हे प्रत्येकाला सहज जमतेच असे नाही. सात दशकांच्या कारकीर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका साकारूनही ज्यांचा चेहरा आणि अभिनय मराठी प्रेक्षक विसरले नाहीत अशा अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना ते साधले. वयाच्या बाराव्या वर्षी नृत्यांगना म्हणून आपल्या कलाप्रवासाची सुरुवात करणाऱ्या सुहासिनी यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. मात्र थोडीथोडकी नव्हे तर ७० वर्षे अभिनयाच्या माध्यमातून रसिकरंजन करण्यात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत.

खरेतर पडद्यावरची त्यांची खाष्ट सासू ही प्रतिमा रसिकांच्या मनात दृढ झाली असली तरी रंगभूमीवर आणि चित्रपटांतून त्यांनी केलेल्या विविधांगी भूमिकांमुळे त्यांच्यातील अभिनयाची ताकद कोणीही नाकारू शकत नाही. नृत्यनिपुण असलेल्या सुहासिनी देशपांडे यांनी ‘कला झंकार नृत्य पार्टी’तून नृत्यांगना म्हणून सुरुवात केली. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्याबरोबर त्यांनी नृत्याचे अनेक कार्यक्रम केले. या नृत्यनिपुणतेचा काही अंशी फायदा त्यांना अभिनयातही झाला. विशेषत: चेहऱ्यावरचे हावभाव, नजरेतून व्यक्त होण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. पडद्यावर खाष्ट सासू साकारताना त्यांना आवाजात वा एकूणच शारीरिक हालचालीत आक्रस्ताळेपणा आणावा लागला नाही. त्यांच्या नजरेतून निर्माण होणारा दरारा आणि राग सासू म्हणून पडद्यावर त्यांची भूमिका अधिक धारदार करण्यासाठी पुरेसा होता. अर्थात, ‘माहेरची साडी’, ‘सुहासिनीची सत्त्वपरीक्षा’, ‘सासर माझं भाग्याचं’, ‘माहेरचा आहेर’सारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका या ठरावीक साच्यातील असल्या तरी त्यापलीकडे जात नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका या अधिक वेगळ्या होत्या.

हेही वाचा : अन्वयार्थ: रक्तलांछित बलुचिस्तान

नृत्याचे कार्यक्रम, वगनाट्य, त्याच वेळी ‘प्रभात’च्या चित्रपटांत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम हे सारे एकाच वेळी करत असताना स्वत:तील अभिनयगुण फुलवण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांना रंगभूमीवर एक विशेष ओळख निर्माण करून देणारे ठरले. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘चिरंजीव आईस’, ‘बेलभांडार’, ‘सूनबाई घर तुझंच आहे’, ‘राजकारण गेलं चुलीत’ अशा वैविध्यपूर्ण आशय असलेल्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्या काळात दूरचित्रवाहिन्यांचा प्रभावही वाढत होता, या नव्या माध्यमातही त्यांनी स्वत:ची कौशल्ये अजमावून पाहिली.

हेही वाचा : उलटा चष्मा: मिळाले का पैसे?

कलाकार म्हणून सेटवर वेळेवर येण्यापासून ते नाटकाच्या अथक तालमी करण्यापर्यंत त्यांनी कडक शिस्त जपली. सेटवरच नव्हे तर वैयक्तिक स्तरावरही आपण कोणीतरी मोठ्या कलावंत आहोत असा अभिनिवेश त्यांनी कधी बाळगला नाही, मात्र अभिनयातील आणि व्यक्तिमत्त्वातील आब शेवटपर्यंत जपला.