ग्रेगरियन कालगणनेतल्या महिन्यांची नावं हे भोंगळपणाचं उत्तम उदाहरण आहे. ना सुसूत्रता, ना कोणता विचार, ना तर्कसुसंगती. लोकप्रियता आली की भोंगळपणा सहज खपून जातो असं दिसतं. आज याच भोंगळमासाचं पुराण.
महिन्यांची नावं ठेवताना काही तरी एक विचार हवा, काही तरी सुसूत्रता हवी, ती नावं तर्कसुसंगत असली पाहिजेत अशी अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. शालिवाहन शकातली महिन्यांची नावं, त्याआधीची अरुण-सम्भार किंवा मधु-माधव या पद्धतींची नावं या कसोट्यांवर उतरतात. आणि ग्रेगरियन कालगणनेतली महिन्यांची नावं? ती अर्थपूर्ण, तर्कसुसंगत आहेत का? ‘जानेवारी’, ‘फेब्रुवारी’, ‘मार्च’ ही चिरपरिचित नावं आली कुठून आणि कशी? त्यासाठी थोडा इतिहास पाहावा लागेल.
ग्रेगरियन कॅलेंडर बेतलं आहे जूलियन कॅलेंडरवर. आणि जूलियन कॅलेंडर रोमन कॅलेंडरवर आधारित आहे. या रोमन कॅलेंडर मालिकेतलं पहिलं कॅलेंडर दहाच महिन्यांचं होतं. आणि त्याची सुरुवात मार्च महिन्यापासून होई. मार्च महिना म्हणजे वसंत ऋतू. हाडं गोठवणाऱ्या थंडीतून बाहेर येऊन जणू सृष्टी जागी होण्याचा काळ. रोमन लोकांच्या युद्धमोहिमा याच महिन्यापासून सुरू होतात. त्यामुळे या महिन्याला त्यांनी युद्धदेवता ‘मार्स’ हिच्या नावावर आधारित ‘मार्च’ असं नाव दिलं असेल तर ते तर्कसुसंगतच म्हणावं लागेल. हे कॅलेंडर अमलात आणणाऱ्या रोमुलस या राजाच्या वडलांचं नावंही ‘मार्स’च होतं. आता हा योगायोग म्हणायचा की यात काही कार्यकारणभाव शोधायचा हे ज्याने त्याने ठरवावं.
‘एप्रिल’ या नावाचा संबंध उमलणे, फुलणे या क्रियेशीही जोडता येतो किंवा अफ्रोडिटी या कामवासनेशी संबंधित देवतेशीही. पण एकुणात या महिन्याचं नाव वसंतसमयाशी साधर्म्य सांगणारं आहे हे नक्की.
‘मे’ या महिन्याचं नाव ‘मायऽ’ या देवतेच्या नावावर आधारित आहे. ही वृद्धीची, प्रजननक्षमतेची देवता. या देवतेचा संबंध वृद्धांशीही जोडतात. त्यानंतरचा महिना जून. याचं नाव ‘जुनो’ या देवांच्या राणीशी संबंधित आहे. किंवा ‘जु(यु)नियोरेस’ या तारुण्याशी संबंधित देवतेशी. हा महिना पारंपरिकरीत्या विवाहाचा महिना मानतात.
इथून पुढच्या महिन्यांना त्यांच्या क्रमांकावरून आलेली नावं होती. क्विंटिलिस (पाचवा), सेक्स्टिलिस (सहावा), सप्टेंबर (सातवा), ऑक्टोबर (आठवा), नोव्हेंबर (नववा) आणि डिसेंबर (दहावा)!
पुढच्या रोमन राजांनी या कॅलेंडरच्या रिकाम्या, बिननावांच्या दिवसांत ‘जानेवारी’ आणि ‘फेब्रुवारी’ हे दोन महिने ठेवले. त्या काळी हे वर्षाचे शेवटचे महिने होते. आणि ते तर्कसुसंगतही होतं. कारण ‘फेब्रुवारी’ हे साफसफाई, शुद्धीकरण अशा अर्थाचं नाव आहे. ही सगळी साफसफाई करून नवं वर्ष नव्या कोऱ्या पाटीवर, नव्या युद्धमोहिमा आखून सुरू करायचं असा मूळ विचार.
त्या काळातल्या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यांची (मार्च, एप्रिल, मे, जून) नावं देवतांच्या नावांवर आधारित होती. त्यातली काही नावं तरी ओढून-ताणून का होईना, त्या काळच्या ऋतूमानाशी किंवा त्या काळात करायच्या मानवी कृतींशी संबंधित होती असं म्हणता येईल.
त्याच्या पुढची सहा नावं तर चक्क क्रमांकांवर आधारित होती – ‘क्विंटिलिस’, ‘सेक्स्टिलिस’, ‘सप्टेंबर’, ‘ऑक्टोबर’, ‘नोव्हेंबर’, ‘डिसेंबर’. आणि त्यानंतरची दोन नावं पुन्हा देवतांशी संबंधित होती – ‘जानेवारी’, ‘फेब्रुवारी’.
खरी गंमत तर पुढेच आहे. ‘जानेवारी’ हे नाव ‘जानुस’ या देवतेच्या नावावर आधारित आहे. ही द्विमुख देवता आहे. एक तोंड मागे पाहणारं आणि एक पुढे पाहणारं. याचा बादरायण संबंध नवं वर्ष सुरू होणं या घटनेशी जोडला – एक कालखंड संपला, दुसरा सुरू झाला अशा अर्थाने. आणि म्हणून तो वर्षाचा पहिला महिना असेल असं ठरवलं! आता त्यामुळे क्रमांकावर आधारित महिन्यांच्या नावांना काही अर्थच राहिला नाही. कारण आता ‘सप्टेंबर’ सातवा नाही तर नववा महिना झाला, ‘ऑक्टोबर’ आठवा नाही तर दहावा, ‘नोव्हेंबर’ नववा नाही तर अकरावा आणि ‘डिसेंबर’ दहावा नाही तर बारावा! मग खरं तर या महिन्यांची नावं तरी बदलायची की नाही? पण रोमन कॅलेंडरकर्त्यांनी ते काही केलं नाही.
पुढे जूलियस सीझरच्या सन्मानार्थ त्याच्या जन्ममहिन्याचं, ‘क्विंटिलिस’चं नाव बदलून ‘जुलै’ केलं आणि नंतर ऑगस्ट. सीझर या त्याच्यानंतरच्या राजाच्या सन्मानार्थ त्याच्या जन्ममहिन्याचं, ‘सेक्स्टिलिस’चं नाव बदलून ‘ऑगस्ट’ केलं!
म्हणजे आता जी महिन्यांची नावं आहेत त्यातली पहिली सहा देवतांवर आधारित आहेत, पुढची दोन सम्राटांच्या नावांवर बेतलली आहेत आणि शेवटची चार क्रमांकांवर आधारित आहेत – तेही चुकीच्या क्रमांकांवर! आणि यातल्या जवळजवळ कोणत्याच नावाने त्या सुमारास ऋतुमान कसं असेल याचा काहीही बोध होत नाही!
एखादी गोष्ट एकदा रुळली, लोकप्रिय झाली की तिच्यातल्या अवगुणांकडे सगळे लोक काणाडोळा करतात हेच खरं!
@KalacheGanit
kalache.ganit @gmail.com
