‘संगीत, बॉलीवूडचे तारे आणि पार्टीचं वातावरण : भारतातल्या साहित्य महोत्सवांत पुस्तकांपलीकडेच बरंच काही का असतं?’ ‘द गार्डियन’ने सोमवारी या मुद्द्यावर मंथन करणारा एक लेख प्रसिद्ध केला आणि वादाला तोंड फुटलं. प्रसिद्ध लेखक आणि जयपूर साहित्य महोत्सवाचे सह-संस्थापक विलियम डॅलरिम्पल यांनी या लेखावर टीकास्त्र सोडलं आहे.

लेखात काय म्हटलं आहे हे जाणून घेऊया… भारतात वाचनसंस्कृती अद्याप पुरेशी रुजलेली नाही. निव्वळ आनंदासाठी वाचणार्‍यांचं प्रमाण कमी आहे. पुस्तकं खरेदी करून वाचण्याची सवय अद्याप मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना लागलेली नाही. बराचसा वेळ मोबाइल फोनमध्येच जातो. ज्या देशात दिवसभर रेल्वे स्थानकात किंवा विमानतळावर घालवून एकही व्यक्ती पुस्तक वाचताना न दिसणं यात काही विशेष नसतं, ज्या देशातल्या काही उच्चभ्रूंना ‘रीडर्स डायजेस्ट’ हे ‘स्टडी’मध्ये प्रदर्शनात मांडावंस वाटतं तिथे दर हिवाळ्यात भरणार्‍या साहित्य महोत्सवांची संख्या १००च्या घरात कशी जाते? याचं उत्तर असं की, भारतातल्या साहित्य महोत्सवांत पुस्तकं हा केवळ एक छोटासा भाग असतो. त्यापलीकडे संगीत, नृत्य, हस्तकलेच्या वस्तूंचे सेल आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांचं प्रमाण लक्षणीय असतं. देशातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या जयपूर साहित्य महोत्सवातही ही ‘अधिक’ची आकर्षणं नसतील, तर एवढा प्रतिसाद नक्कीच मिळणार नाही, असा लेखाचा एकंदर सूर आहे. लेखक, प्रकाशक, पुस्तकांच्या दुकानांचे मालक, वाचक आणि विविध साहित्य महोत्सवांत सहभागी झालेल्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांतून या मतांना पुष्टी देण्यात आली आहे.

विलियम डॅलरिम्पल यांनी ‘तापदायक आणि अज्ञानमूलक,’ अशा शब्दांत या लेखाची संभावना केली आहे. जयपूर साहित्य महोत्सवातील सत्रांमध्ये उत्साही आणि एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास असलेल्या तरुण वाचकांची मोठी गर्दी असते. यंदा महोत्सवाच्या पाच दिवसांत आम्ही
४४ हजारांहून अधिक पुस्तकं विकली. महोत्सवात केवळ विद्यार्थी आणि शिक्षकच नव्हेत तर रिक्षाचालकही सहभागी होतात, कारण या कार्यक्रमात नोबेल आणि बुकर पारितोषिक विजेत्यांपासून ते दलित कवी आणि राजस्थानी लोकसंगीतातील कलाकारांपर्यंत अनेकांचा सहभाग असतो,’ असे त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

त्यांची ही पोस्ट साहित्यविश्वात ‘व्हायरल’ झाली असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी भारतातील सेकंड-हँड पुस्तकांच्या बाजारांचा आणि पदपथांवरील पुस्तकविक्रीचा उल्लेख केला आहे. भारतातील साहित्याला समृद्ध मौखिक परंपरा लाभली आहे. साहित्याच्या बाबतीत भारत हा सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक आहे, असं काहींनी म्हटलं आहे. अमेरिकेतही निव्वळ आनंदासाठी वाचनाची परंपरा नाही. तिथल्या अनेक घरांत एकही पुस्तक दिसत नाही, असे अनुभव काहींनी मांडले आहेत.