महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील मतदान तारखा राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार होता, हा युक्तिवाद ठीकच; पण दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुकीपायी ‘आप’ला गुजरातकडे दुर्लक्ष करावे लागले आणि भाजपने प्रचाराचा धडाका लावला..

भाजपचे सगळे ‘भारदस्त’ नेते सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ दोन दिवस उरलेले आहेत. गुजरातमध्ये तिरंगी लढाई होणार असल्याचे सांगितले जाते. भाजप, आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. काँग्रेसने नेत्यांच्या मोठय़ा प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. मध्य प्रदेशमधील ‘भारत जोडो’ यात्रेचा टप्पा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधींनी दोन जाहीर सभा घेतल्या. बाकी काँग्रेसचा भर लोकांपर्यंत जाऊन थेट संवाद साधण्यावर होता. काँग्रेसकडे गर्दी खेचू शकेल असा राहुल गांधींव्यतिरिक्त नेता नसल्यानेही कदाचित जाहीर सभा आयोजित केल्या नसाव्यात. प्रियंका गांधी-वाड्रा यांना हिमाचल प्रदेशमधील प्रचारासाठी अधिक वेळ द्यावा लागला. गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले ते ‘आप’च्या आक्रमक प्रचारामुळे. ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल दिल्लीत कमी आणि गुजरातमध्ये जास्त दिसू लागले होते. त्यावरून भाजपने, ‘दिल्लीसाठी पूर्णवेळ मुख्यमंत्री पाहिजे’, अशी टीकाही केली होती. ‘आप’ने राघव चड्ढा यांच्यावर गुजरातच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवलेली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान वगैरे ‘आप’चे नेतेही गुजरातमध्ये ठाण मांडून होते. ‘आप’ने सुरुवातीच्या काळात प्रचंड वेगाने प्रचार केला. केजरीवाल यांच्या जाहीर सभा झाल्या, भाजप आणि काँग्रेसविरोधात घणाघाती आरोप केले गेले. गुजरातमध्ये लढाई भाजप विरुद्ध आप अशी असून काँग्रेस या निवडणुकीत अस्तित्वात नाही, असे ‘आप’चे नेते जाहीरपणे सांगत होते. भाजपने मात्र हळूहळू प्रचारात पकड घेतली आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपचा प्रचार इतक्या धडाक्यात सुरू आहे की, गुजरातमधील सत्ताधारी पक्षाने ‘आप’ला वेगवान प्रचारात मागे टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गुजरातमध्ये ‘आप’च्या प्रचाराने जोर धरला असतानाच, दिल्लीच्या राज्य निवडणूक आयोगाने दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर केली आणि मतदानाची तारीख ४ डिसेंबर ठेवली. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. या दोन मतदानाच्या तारखांच्या दरम्यान दिल्लीत मतदान होईल. त्यामुळे दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख ‘आप’ला कोंडीत पकडण्यासाठी निश्चित केली गेली का, असा प्रश्न पडावा. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘आप’ची खरोखरच धावपळ झालेली दिसली. ‘आप’ने आधी हिमाचल प्रदेशवर लक्ष केंद्रित केले होते. नंतर ‘आप’चा मोर्चा गुजरातकडे वळला. तिथून त्यांना आता दिल्लीत प्रचार करावा लागत आहे. गुजरातची विधानसभा निवडणूक जिंकणे ‘आप’साठी जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच दिल्ली महापालिका ताब्यात घेणे प्रतिष्ठेचे आहे! दिल्ली राज्यावरील ‘आप’च्या सत्तेला भाजपने धक्का लावू नये, यासाठी दिल्ली महापालिकेतील भाजपची सत्ता ‘झाडू’ने बाजूला करावी लागेल, ही बाब दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्यासारख्या तल्लख राजकारणी नेत्याने खूप आधीपासून जाणलेली आहे. म्हणूनच दिल्ली महापालिकांचे विलीनीकरण करण्याच्या निमित्ताने निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर केजरीवाल यांनी कडाडून टीका केली होती. दिल्ली महापालिकेची निवडणूक पूर्वनियोजित कालावधीत झाली असती तर आत्ता ‘आप’ला पूर्णपणे गुजरातवर लक्ष केंद्रित करता आले असते. गुजरात निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर होणे हे एक प्रकारे भाजपने ‘आप’ची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यासारखेच आहे.

योगींसारख्यांसाठी प्रचाराची सोपी दिशा

भाजपकडे आक्रमक नेत्यांची फळी आहे, त्या तुलनेत ‘आप’कडे नेते आणि संघटनेचे पाठबळ कमी पडते. त्यामुळे एकाच वेळी गुजरात आणि दिल्ली, अशा दोन्हीही महत्त्वाच्या निवडणुका लढण्यामध्ये ‘आप’ची दमछाक करण्याचा भाजपचा हेतू असावा असे दिसते. भाजपने गुजरातमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व-शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवले आहे. भाजपचा अखेरच्या टप्प्यातील प्रचार धार्मिक मुद्दय़ावर केंद्रित झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ‘२००२ मध्ये धडा शिकवला’ असल्याचे विधान करून पश्चिम उत्तर प्रदेशप्रमाणे गुजरातमध्येही प्रचाराची दिशा निश्चित करून टाकली. या मार्गाने प्रभावी प्रचारासाठी शर्मा आणि योगी यांच्यासारखे आक्रमक नेते कुठल्याही पक्षाच्या प्रचारातील ऊर्जा काढून घेऊ शकतात. गुजरातमध्ये भाजपने मोदी-शहा-शर्मा-योगी-नड्डा आणि स्थानिक नेत्यांच्या झंझावाती प्रचारातून ‘आप’च्या प्रचारावरील मतदारांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. भाजपच्या या ‘तेजोमय’ नेत्यांच्या तोफा दणाणत असताना ‘आप’चे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल यांना मात्र दिल्लीमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वेळ द्यावा लागत आहे. ‘आप’तर्फे मनीष सिसोदिया, भगवंत मान, राघव चड्ढा, संजय सिंह, आतिषी, गोपाल राय अशा अनेक नेत्यांनी याआधी गोवा, पंजाब, गुजरात आदी राज्यांमध्ये लक्षवेधी प्रचार केला असेल; पण दिल्लीत हे सर्व नेते अधिक प्रभावी ठरतात. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने तीव्र शाब्दिक हल्लाबोल केला असताना या नेत्यांना गुजरातमध्ये अधिक वेळ घालवणे परवडणारे नव्हते. त्यांना दिल्लीतील लोकांपर्यंत पोहोचावे लागणार होते. त्यामुळे गुजरातचा प्रचार मार्गी लागल्यानंतर ‘आप’च्या नेत्यांनी तिथला मुक्काम हलवला असेल तर वावगे नव्हे! पण त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये झाला तर ‘आप’ला गुजरातमध्ये अपेक्षित जागांचे लक्ष्य गाठता येईल का, हा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकतो.

प्रतिमाभंगाचे प्रयत्न

‘आप’च्या नेत्यांचे लक्ष दिल्लीकडे खेचण्यासाठी भाजपने चाणाक्ष डाव टाकल्याचे दिसले. मतदानांच्या तारखा एकाच वेळी जुळून आल्या, पण कुठल्या तारखेला दिल्ली महापालिकेसाठी मतदान घ्यायचे हे भाजपच्या हाती नव्हते, ते निवडणूक आयोग निश्चित करणार होता, असा युक्तिवाद करता येईल. ‘आप’चा प्रतिमाभंग करण्यासाठी भाजपने एकामागून एक आरोपांची राळ उठवली, या आरोपांना ‘आप’ला प्रत्युत्तर देणे भाग पडले. भाजपने अजेंडा निश्चित केला आणि त्यामागून ‘आप’ला फरफटत जावे लागले. गुजरातमध्ये ‘आप’ने अजेंडा ठरवला होता, त्यातून भाजपला मार्ग काढावा लागला. त्यासाठी त्यांना दिल्लीतील ‘आप’च्या सरकारला लक्ष्य बनवावे लागले. गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्ली महापालिकांमधील सत्तेचा सदुपयोग काय केला हे भाजपला सांगता आलेले नाही. म्हणून त्यांनी दिल्ली राज्यातील ‘आप’ सरकारच्या कारभारावर टीका करून स्वत:चा बचाव केला. पहिले लक्ष्य ठरले मनीष सिसोदिया आणि त्यांचे नवे उत्पादन शुल्क धोरण. या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची ‘सीबीआय’ने चौकशी सुरू केली, सिसोदिया वगळून नऊ जणांना आरोपी केलेले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा आपापल्या वेगाने काम करतात, सिसोदियांविरोधात पुरावे मिळाले तर कदाचित त्यांनाही आरोपी केले जाऊ शकेल. पण तोपर्यंत दिल्ली महापालिकेची निवडणूक आटोपलेली असेल. सिसोदियांवर आरोप करण्याची भाजपची गरज संपूनही गेलेली असेल. तिहार तुरुंगात असलेले ‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मालीश आणि खाण्यापिण्याच्या चित्रफिती लोकांनी पाहिल्या. तिहारमधील कैदी ऐषारामात राहात असल्याचा आरोप भाजपने ‘आप’वर केला. या चित्रफिती कोणी ‘लीक’ केल्या हे कधीच कुणाला कळणार नाही. दिल्ली महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला ‘आप’विरोधात टीका करण्याची संधी मिळाली, एवढे म्हणता येईल. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने सातही जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीकर मतदारांनी भाजपला पूर्णपणे अव्हेरून ‘आप’ला पुन्हा सत्तेवर बसवले. मतदानांनी ‘आप’ला कौल देताना, या पक्षाचा दिल्लीतील कारभार, स्वच्छ प्रतिमा, क्राऊड फंिडगसारख्या मार्गाने, लोकांच्या मदतीने निवडणूक लढवण्यासाठी पैसे गोळा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न, हे सारे पाहिले. नेता म्हणून अरिवद केजरीवाल यांची लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून सूचना मागवून त्यावर अंमल करण्याची धडपड मतदारांच्या मतात विश्वास निर्माण करणारी ठरली. लोकांच्या मनातील दिल्लीतील ‘आप’ सरकारची प्रतिमा मोडून काढली तर मतदारांमध्ये दुविधा निर्माण होऊ शकते, हे भाजपने हेरले. मग, भाजपने सिसोदिया, जैन यांच्या कथित भ्रष्टाचारांची प्रकरणे चव्हाटय़ावर आणली, त्याची चर्चा घडवून आणली, त्याचा गाजावाजा केला. ‘आप’ला स्वत:ची प्रतिमा सांभाळणे गरजेचे होते, अन्यथा दिल्ली महापालिकेत यश मिळवण्याचा मार्ग अवघड होत गेला असता. दिल्लीतील मतदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले तर

ही निवडणूक हातातून घालवावी लागली असती. ‘आप’ने भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये केजरीवाल, सिसोदिया यांच्यासह ‘आप’चे नेते दिल्लीतील प्रभाग पिंजून काढत आहेत.

मात्र त्यासाठी त्यांना गुजरात आणि दिल्ली या दोन्ही राज्यांमध्ये वेळ विभागावा लागत आहे. दिल्लीमध्ये अधिक वेळ देणे गरजेचे आहे. भाजपकडून दिल्ली महापालिका कदाचित ‘आप’ला हिसकावून घेता येईल, गुजरातमध्ये ‘आप’ला किती यश मिळते याची दिल्लीकरांना उत्सुकता असेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly polls 2022 gujarat bjp faces challenge to ensure party s win in assembly polls zws
First published on: 28-11-2022 at 04:21 IST