मुंबईनं अनेकांना मोठं केलं. पण आपल्या मोठेपणात मुंबईचा वाटा आहे असं मोकळेपणानं मान्य करणारे अगदी मोजकेच. पूर्वायुष्यात दुकानाच्या फळीवर, फुटपाथवर झोपण्याचा अनुभव घेतलेले महालात राहायला गेल्यावर मुंबईच्या नावे बोट मोडताना सर्रास आढळतात. पूर्वी ब्रिटिश उमराव नेटिवांविषयी ज्या सुरात बोलत, त्या सुरात हे आजचे उमराव मुंबईिवषयी बोलतात. मुंबईला कृतज्ञ फार कमी मिळाले.
गुलजार- कवी, कथालेखक, चित्रपट निर्माते वगैरेची काही गरज नाही फक्त गुलजार- हे या मोजक्यांतले एक. त्यांचं नवं पुस्तक आलंय. ‘आमची मुंबई : माय सिटी इन स्टोरीज अँड पोएम्स’. भारत-पाक फाळणीनंतर संपूर्ण सिंग कालरा नावाचा तरुण जगण्यासाठी मुंबईत आला. वाटेल ती कामं केली आणि बघता बघता गुलजार झाला. हे असं गुलजार होण्याची ऊर्मी असणं हे संपूर्णसिंग कालरा या तरुणातलं मोठेपण. पण त्या तरुणाच्या गुलजार होण्याच्या ऊर्मीच्या बीजाला प्रेमानं वाढायला मोकळं आकाश दिलं ते मुंबईनं. या महानगरीचं आभाळाएवढं ऋण गुलजार या पुस्तकातनं व्यक्त करतात. एका कवीनं, कलाकारानं मुंबईला वाहिलेली आदरांजली म्हणजे हे पुस्तक.
गुलजारांच्या सगळ्या सादरीकरणात एक कलासक्तता असते. मग हे त्यांचं स्वत:च तशरीफ घेऊन येणं असेल, एखाद्या मुशायर्यात एखादी नज्म सादर करणं असेल किंवा अगदी गद्य चर्चेत सहभागी होणं असेल. सगळं कसं ‘शुभ्र काही जीव घेणं’. त्यामुळे बर्याचदा होतं काय की लोक गुलजारांचे कैसे चालणे, गुलजारांचे कैसे बोलणे… यावर जीव टाकतात की त्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्याइतकी त्यांची तयारी झालेली असते हे कळेनासं होतं. बहुतेकदा यातलं पहिलं खरं अधिक. आणि अलीकडच्या काळात तर बोलायचीच सोय नाही. समाजमाध्यमांवर त्यांच्या नावचं काय काय फिरत असतं. ‘‘बर्याचदा बरंचसं त्यातलं माझं नसतंही…’’, तेच एकदा म्हणाले होते.
अशा वेळी त्यांचं मुंबईवरचं हे पुस्तक आलंय. देखणं सादरीकरण. मुंबईवर काही ना काही निमित्तानं त्यांनी जे काही लिहिलं… कविता… कथा वगैरे… असं सगळ्याचं संकलन. मांडणी अशी की डावीकडे मूळचं हिंदीतलं लिखाण आणि समोर लगेच त्याचा इंग्रजी तर्जुमा. इंग्रजी रूपांतरकार आहेत रक्षांदा जलील. लेखिका आणि कला इतिहासकार म्हणून त्या माहीत आहेतच. त्यांच्या इंग्रजी रूपांतरणाविषयी भाष्य करण्याची गरज नाही. पण मूळ हिंदीतलं गुलजारांच्या शब्दातनं वाचता येत असेल तर त्याचं भाषांतर वाचायची गरज काय… असा प्रश्न काहींना पडू शकतो. तो गैर नाही. कारण हिंदीत वाचण्याची जी गंमत आहे ती अर्थातच इंग्रजीत नाही.
याचं महत्त्वाचं कारण असं की गुलजारांचं हिंदी आपण वाचताना ते ‘ऐकायला’ येतं. ते आपण त्यांच्या घनगर्द आवाजात डोळ्यानं ‘वाचत’ असतो. त्यांच्यासारखेच पॉज घेतो. चष्म्याची एक काडी ओठांना लावतो… किंवा चष्मा डोक्यावर सरकवतो. इंग्रजी भाषांतर त्यांच्या आवाजात ऐकता येत नाही. अर्थात ही अडचण गुलजारांना खूप ऐकलेल्यांची असू शकेल. ज्यांना हिंदीचा गंध नाही वा देवनागरी लिपीशी सख्य नाही, त्यांच्यासाठी ही सोय महत्त्वाची. पुस्तकाविषयी दुसरा मुद्दा म्हणजे वाचायला सोपं. एकसलग वाचायला हवं असं अजिबात नाही. मुंबईवरची एखादी कविता वाचल्यानंतर गद्याकडेही सहज वळायची सोय. ‘मी मुंबईकर… मुंबई आमची’ असं म्हणतात गुलजार त्यात शेवटी.
आज गुलजारजी ९२ वर्षांचे आहेत. घरच्यांनी फ्रंटियर मेलमधून त्यांना मुंबईत पाठवून दिलं तेव्हा ते जेमतेम १६ वर्षांचे होते. ही १९५० सालची घटना. तेव्हापासून त्यांनी कधी मुंबईला अंतर दिलं नाही. मुंबईनंही त्यांना आपलंच मानलं. पुढच्या आठवड्यात शतायुष्याकडे ते आणखी एका वर्षाचं पाऊल टाकतील तेव्हा त्यांच्या मुंबईतल्या वास्तव्यालाही ७६ वर्षं होतील.
आजही मुंबई ‘तेव्हा’ होती तितकीच तरुण आहे… आणि मुंबईप्रमाणेच गुलजारजींनाही वार्धक्याचा स्पर्श झालेला नाही. मुंबईचंही हे गुलजारपण त्यांनी आपल्या अंगी मुरवलंय…!
आमची मुंबई – माय सिटी इन
स्टोरीज अँड पोएम्स
लेखक – गुलजार
अनुवाद – रक्षांदा जलील
प्रकाशक – हार्पर कोलीन्स पब्लिशर्स इंडिया
पृष्ठे – ४९६, मूल्य – ३९९९ रु.
@girishkuber
