‘लिबर्टी इंटरनॅशनल’ ही १९८२ पासून, म्हणजे मुक्त व्यापाराला राजकीय उदारमतवादाचा पाया असेलच असे नाही, याची आधुनिकोत्तर काळातली पहिली चाहूल लागल्यावर, उदारमतवादी मूल्यांचे पोषण व रक्षण करण्यासाठी अमेरिकेत स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय विद्वानांची संस्था. अलीकडेच तिचे ४० वे वार्षिक अधिवेशन काठमांडू येथे पार पडले. त्यात भारतीय लेखक आणि अर्थव्यवस्थेचे भाष्यकार गुरुचरण दास यांना आयुष्यभर उदारमतवादाची कास न सोडल्याबद्दल ‘लाइफटाइम लिबर्टेरियन ॲवॉर्ड’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.

दास यांची ही वैचारिक वाटचाल हार्वर्डच्या शिक्षणामुळे सुकर झाली असेल, पण ती सुरू झाली भारतातच. नेहरूकाळाचा संस्कार टाळणे त्यांना अशक्यच होते- त्यांच्या वडिलांचा तेव्हाच्या पंजाब सरकारचे मुख्य अभियंता या नात्याने भाक्रा धरणाच्या प्रत्यक्ष उभारणीत महत्त्वाचा वाटा होता. आाजोबा वकील होते. सुखवस्तू, उच्चभ्रूच कुटुंबातली ही सुरुवात, हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण आणि प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल या बहुराष्ट्रीय कंपनीचे भारतातील मुख्याधिकारी ते जागतिक व्यवस्थापकीय संचालक अशी कारकीर्द हा त्यांचा भूतकाळ. त्याचे ओझे बाळगायचे नाही, असे ठरवूनच ते वयाच्या ५० व्या वर्षी ‘लिखाण करण्यासाठी’ निवृत्त झाले.

‘इंडिया अनबाउंड’ हे त्यांचे पहिलेच पुस्तक गाजले, याचे कारण १९९१ च्या उदारीकरणामुळे भारतीयांच्या आकांक्षा वाढणार, त्यामुळे देशाची आर्थिक गतीच बदलणार, याचे अचूक भाकीत करणार्‍या पहिल्या काही लेखकांपैकी ते होते. मात्र म्हणून, ते मनमोहन सिंग यांचे पाठीराखे वगैरे होते असे नाही. किंवा नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला दहा वर्षे झाल्यानंतर त्यांनी ‘भारत मोदींमुळे बदलणार नाही. सरकार झोपलेले असताना, रात्रीच आपला देश वाढत असतो’ असे मत व्यक्त केले म्हणून ते मोदीविरोधक ठरले, असेही नाही. उलट, राजकीय भूमिकांपासून अंतर राखूनही देश समजून घेता येतो, हे सूत्र त्यांनी सोडले नाही.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा आधार माझ्या चार पुस्तकांना आहे, असे ते सांगतात. यापैकी ‘इंडिया अनबाउंड’ हे अर्थातच ‘अर्था’बद्दल, दुसरे ‘द डिफिकल्टी ऑफ बीईंग गुड’ हे व्यापक अर्थाने धर्माबद्दल आणि मर्यादित अर्थाने महाभारताचाच प्रभाव भारतीय मानसिकतेवर किती सखोल आहे याबद्दल. तिसरे ‘काम- द रिडल ऑफ डिझायर’; तर मोक्षाबद्दलचे ‘अनदर सॉर्ट ऑफ फ्रीडम’ हे पुस्तक काहीसे आत्मचरित्रवजा. त्यात स्वत:च्या वैचारिक आणि भावनिक वाटचालीचा आलेख त्यांनी रेखाटला आहे.

याखेरीज ‘पेंग्विन इंडिया’साठी भारताच्या आर्थिक व वाणिज्यिक इतिहासाच्या १७ खंडांचे संपादन त्यांनी केले आहे आणि ‘अ फाइन फॅमिली’ हा लेखसंग्रहही प्रकाशित झाला आहे. ‘इंडिया ग्रोज ॲट नाइट’ याच नावाचे पुस्तकही त्यांच्या नावे आहे- त्याबद्दल ‘यात त्यांच्या राजकीय भूमिकांचा आलेख दिसतो’ असा आनंद काही समीक्षकांना झाला होता! या पुस्तकांतून दिसणारे त्यांचे व्यक्तित्व सभ्यतेची भारतीय कल्पना स्पष्ट करणारे ठरते. भारताची केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे, तर भारतीय मानस समजून घेणार्‍या लेखकाला एक आंतरराष्ट्रीय बहुमान आयुष्यभराच्या वाटचालीसाठी मिळतो, हे विशेष.