‘बालसाहित्याचे नोबेल’ असा लौकिक १९५६ पासून सुरू झालेल्या ‘हान्स ख्रिश्चन ॲण्डरसन ॲवॉर्ड’ने अल्पावधीत कमावला आणि यंदाच्या ७०व्या वर्षापर्यंत टिकवला. लेखक आणि बोधचित्रकार (इलस्ट्रेटर) अशा दोघांना दर वर्षी ‘नोबेल’च्या पदकासारखेच दिसणार्या- पण आल्फ्रेड नोबेलऐवजी थोर परीकथाकार हान्स ॲण्डरसन यांचा चेहरा कोरलेल्या पदकाने आणि मानपत्राने गौरवले जाते. हा पुरस्कार अख्ख्या कारकीर्दीसाठीचाच. त्यामुळे हमखास तो आजी/आजोबा शोभणार्या लेखकांना मिळतो. यंदाचे दोघेही मानकरी- ब्रिटनचे मायकल रोसेन आणि चीनच्या काइ गाओ- ८० वर्षांचेच आहेत!
रोसेन आजोबांनी मेडिकलच्या वर्गात प्रवेश मिळूनही काही दिवसांतच ते शिक्षण सोडून लेखक होण्याचे ठरवले. इंग्रजी साहित्याचे उच्चशिक्षण घेतले. पहिले पुस्तक २६ व्या वर्षी आले, पण गाजले ते तिसरे पुस्तक : ‘माइंड युअर ओन बिझनेस’ हा कवितासंग्रह! त्यात, २८ वर्षांचे मायकल रोसेन, मोठ्या माणसांपेक्षा मुले निराळी कशी हे मुलांना सांगतात. बालमानसशास्त्रज्ञांच्या मते ज्या वयात ‘ओळख’ तयार होते, त्या वयाच्या मुलांसाठीचे हे पुस्तक. आजवर एकंदर १४० पुस्तके रोसेन यांनी लिहिली किंवा संपादित केली. ब्रिटनभर शाळाशाळांत ते फिरले, रेडिओ/ टीव्हीसाठी लेखन केले. आपले विंदा करंदीकर जसे मुलांच्या विनोदबुद्धीला- काहीशा टवाळपणालाही आवाहन करतात, तसे रोसेन यांचे लेखन. पण त्यांचे सादरीकरण मात्र, हिंदीतले कवी- अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांची आठवण व्हावी असे.
चीनच्या गाओ आजींची चित्रे इंटरनेटवर शोधून कुणीही पाहिली, तर ‘साधारण अशीच चित्रं कुणीही काढतं की मुलांसाठी! यात काय वेगळं?’ – अशी प्रतिक्रिया येऊ शकते खरी; पण जरा सबुरीने त्यांची नीट माहिती घेतली तर कळेल की, आजकाल बर्याच बालपुस्तकांत दिसणारी, पुसटसर रंगांत जणू भराभर काढली असावीत अशी भासणारी चित्रे काढण्याच्या शैलीची सुरुवात करणार्या पहिल्या काहींपैकी गाओ होत्या. पण त्यांना वयाच्या सुमारे ४०पर्यंत, बालपुस्तकांसाठी इलस्ट्रेशनची संधी कमीच मिळाली. शाळेतल्या चित्रकला शिक्षिका म्हणून १९७५ मध्ये सुरू झालेली काइ गाओ यांची कारकीर्द पुढे, बालपुस्तकांच्या प्रकाशकाकडे नोकरी, तिथे संपादनाचे काम, ते करतानाच चित्रेही अधूनमधून काढणे, मग मुलांसाठी चित्र-पुस्तकाचे संपादन अशा वळणांनी गेली. हळूहळू नाव होत गेले, तसतसे काही निराळे प्रयोगही गाओ यांनी केले. ‘दुसर्या महायुद्धातले जळते शहर’, ‘माझी जडणघडण’ अशा विषयांवर त्यांनी बाल-चित्र पुस्तके साकारली.
‘इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपल’ ऊर्फ ‘इब्बी’ या सर्व खंडांतील अनेक देशांत एक तरी प्रतिनिधी असलेल्या संस्थेमार्फत हे ‘बालसाहित्याचे नोबेल’ दिले जाते. हान्स ॲण्डरसन (१८०५-७५) डेन्मार्कची शान ठरलेले, पण या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार दिला जातो तो इटलीतल्या बोलोन्या शहरातील जागतिक बालपुस्तक मेळ्यात. यामुळेच फुरंगटून डेन्मार्कच्या राजघराण्याने या पुरस्काराशी संबंध तोडून २०१० पासून ॲण्डरसनच्याच नावाचा निराळा, पाच लाख डॅनिश क्रोनरचा पुरस्कार सुरू केला आणि फक्त नामवंतांनाच (जे. के. रोलिंग, पाउलो कोएलो, रश्दी, ॲटवूड आदी) तो दिला! पण पदक आणि मानपत्र यांचे महत्त्व ‘इब्बी’च्याच पुरस्काराने टिकवले.
