‘हरिद्वारच्या या सभामंडपात जमलेल्या संन्यासी व ब्रह्मचारी बंधू भगिनींनो, गेले वर्षभर तुम्ही या आश्रमात राहून धर्म व योगाविषयीचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याबद्दल अभिनंदन!(प्रचंड टाळय़ा) आजच्या संन्यास सोहळय़ानंतर तुम्ही एका नव्या जीवनाला प्रारंभ करीत आहात. जे भारताला जागतिक गुरू बनवण्यासाठी मदत करणार आहे. सनातन धर्माचा प्रसार हाच भारतवर्ष व जगाचा उद्धार करण्याचा एकमेव कल्याणकारी मार्ग आहे. यावरची तुमची श्रद्धा किती अढळ आहे, याची प्रचीती प्रशिक्षणकाळात मला आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वर्षभरापूर्वी दिलेली जाहिरात तुम्हाला आठवत असेल. त्यात तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केले की तुमच्या उर्वरित जीवनाची आम्ही काळजी घेऊ असे नमूद केले होते. आज त्याबद्दलच विस्ताराने सांगण्यासाठी मी उभा आहे. इतिहास बघितला तर व्यापारातूनच धर्मप्रसार व विस्तार झाला आहे. तुमच्या संन्यस्तपणाला व्यापाराशी जोडणे हे मी माझे इतिकर्तव्य समजतो. यापुढे तुम्हाला व्यापारासोबतच धर्मप्रसाराचे काम करायचे आहे. त्यासाठी आमच्या पीठाने अनेक आकर्षक योजना तयार केल्या आहेत. ज्या तरुणांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले त्यांना विदेशात पाठवले जाईल. तिथे आमच्या पीठातर्फे तयार करण्यात आलेली औषधे इ.च्या विक्रीसाठी दालन उभारून दिले जाईल. नफ्यातील दहा टक्के रक्कम तुम्हाला दिली जाईल. खर्च भागवून उरलेली रक्कम तुम्ही धर्मप्रसारासाठी वापराल याची खात्री आहे. ज्यांनी हे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यांच्यासाठी तीच योजना देशांतर्गत पातळीवर असेल. जे द्वितीय व तृतीय श्रेणीत आहेत त्यांनी निराश होऊ नये. त्यांना देशभरात कुठे ना कुठे पीठाच्या वस्तूविक्री दालनात नोकरी दिली जाईल.
त्यांनी साधूच्या वेशात व्यवसाय व धर्मवृद्धीसाठी एकाच वेळी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्याचा योग्य मोबदला त्यांना थेट पीठाच्या मुख्यालयातून देण्यात येईल. यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्यांना नंतर पीठातर्फे ‘होलसेल एजन्सी’ देण्याबाबत विचार केला जाईल. या योजनेत सामील झालेल्या सर्वानी ग्राहकांशी संवाद साधताना वेद-पुराणाचे दाखले देत तर कधी संस्कृत भाषेतून संवाद साधून धर्माची छाप त्यांच्यावर पडेल याची काळजी कटाक्षाने घ्यायची आहे. या संपूर्ण कार्यक्रमावर आपले नेपाळनरेश बारकाईने लक्ष ठेवून असतील. भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. काही वर्षे हे राष्ट्रकार्य केल्यावर जर तुम्हाला गृहस्थाश्रम थाटायची इच्छा झाली तर त्याचीही अनुमती तुम्हाला दिली जाईल. तसा नियम आम्ही धर्मसंसदेत पारीत करून घेऊ. जेणेकरून तेराव्या शतकातल्या विठ्ठलपंत कुलकर्णीसारखी तुमची अवस्था होणार नाही. तेव्हा मित्रांनो नव्या कामगिरीसाठी तुम्ही सज्ज व्हा’ – असे जोशपूर्ण बोलून बाबा आसनस्थ झाले, पण टाळय़ा वाजल्या नाहीत. बाबा व आचार्य एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. कदाचित साऱ्यांना भूक लागली असेल असे समजून दोघांनी व्यासपीठ सोडले. नंतर भोजनमंडपात साऱ्या संन्याशांची एकच कुजबुज कानी येत होती- ‘आपण संन्यासी व ब्रह्मचारी व्हायला आलो की विक्री प्रतिनिधी?’