‘वॉव! वॉव! वॉव!’ फुटबॉल जगतातील ऑस्कर समजला जाणारा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीचा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार दिला गेल्यानंतर हॅरी केन बोलायला उभा राहिला, तेव्हा उपस्थितांनी आधी ही उद्गारवाचक तिहाई ऐकली. केनकडूनच. अनपेक्षिततेचा धक्का असाच असतो. याच वर्षी पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला उपान्त्य फेरीपर्यंत घेऊन जाणारा कर्णधार यंदाच्या ‘बॅलन डी ओर’चा मानकरी ठरला, हे इंग्लंडसाठी विशेष. २५ वर्षांपूर्वी मायकेल ओवेनने हा किताब मिळवला होता. त्याआधीचे इंग्लिश विजेते म्हणजे बॉबी चार्लटन (१९६६) आणि केव्हिन कीगन (१९७८-७९) आणि ‘बॅलन डी ओर’ ज्या वर्षी सुरू झाला, तेव्हा १९५६ मध्ये स्टॅन्ले मॅथ्यूज.
इंग्लंड ही खरे तर आधुनिक फुटबॉलची जननी. पण १९६६ मध्ये एकदाच उंचावलेला विश्वचषक सोडता, त्यांना या खेळात विश्वविजेते म्हणून कधीच मिरवता आलेले नाही. इंग्लिश प्रीमियर लीगने जागतिक दर्जाचे अनेक खेळाडू घडविले, त्यात इंग्लंडच्याही अनेक खेळाडूंचा समावेश. पण या सांघिक खेळात वैयक्तिक करिश्म्याला विजेेतेपदाचे कोंदण लागते.
हॅरी केनला इंग्लंडकडून खेळताना ते साध्य करता आले असे नाही. पण कर्णधार म्हणून त्याचे प्रयत्न त्या प्रवासाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत राहिले. २०१८ आणि २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत, तर युरो स्पर्धेत २०२० आणि २०२४ अशा सलग दोन स्पर्धांत इंग्लंड त्याच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात पोहोचला.
‘फ्रान्स फुटबॉल’ या नियतकालिकातर्फे दिला जाणारा ‘बॅलन डी ओर’ वर्षभरातील वैयक्तिक कामगिरीचा सन्मान करतो, हे खरे असले, तरी केनच्या शिरपेचात हा तुरा खोवताना त्याच्या संघासाठीच्या कामगिरीचा विचार वगळून त्याचे मूल्यमापन करता येत नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो काही मेस्सी, रोनाल्डो किंवा नव्या पिढीतले किलियन एम्बाप्पे वा लमिन यमालइतका उपजत गुणवान नाही.
उपरोल्लेखित खेळाडू गोल करतात आणि जोडीने गोलसाठीच्या संधी निर्माण करणारे ‘गेममेकर’ म्हणूनही माहीर आहेत. याउलट केनची भूमिका ही कोणत्याही संघातील अत्यंत उपयुक्त अशा ‘सेंटर फॉरवर्ड’ची आहे. केन गोल करण्याच्या संधी फार कधी दवडत नाही. यंदा तर ‘बायर्न म्युनिक’ क्लबकडून खेळताना ५१ सामन्यांत ६१ गोल केले. त्याचे याव्यतिरिक्तचे आणि सध्याच्या अत्यंत वेगवान फुटबॉलमध्ये उपयुक्त ठरते, असे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रगत, आधुनिक व्यूहरचनेनुसार खेळण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे कौशल्य आणि मोठी धाव.
सहा फूट उंचीचा केन उंचावरून आलेल्या पासवर डोक्याने, थोडा लांबवर पास आला तर लांबुळके पाय ताणून आणि ‘डी’ क्षेत्रात गोलसाठी जागा बनविण्यासाठी लांब ढांगा टाकून धाव घेऊन गोल करतोच. केन कधीच सुपरस्टार नव्हता, नाही. ‘टॉटनहॅम स्पर’कडून खेळताना आधी पूर्ण वेळ खेळण्यासाठी धडपड, मग इतर संघांत कर्जाऊ जाण्याची वेळ, दुखापती अशी दिव्ये पार करूनच तो इंग्लंडच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचला.
‘बॅलन डी ओर’ स्वीकारताना त्याच्या डोळ्यांसमोरून हे तरळून गेले असणार. म्हणूनच पहिल्या उद्गार तिहाईनंतर त्याचे पुढचे वाक्य होते, ‘मी नि:शब्द आहे.’ नंतर काही काळ तो पत्नी, आई-वडील यांच्यासह उपस्थित जगभरातील उत्तमोत्तम फुटबॉलपटूंचे आभार मानता झाला. तो असाच आहे. फुटबॉलसारख्या रांगड्या खेळात असूनही क्रिकेटमध्ये लागतो, तसा जंटलमन, उमदा, सज्जन माणूस.
