जपानी लेखक हारुकी मुराकामी यांचे नवे पुस्तक वडिलांच्या आठवणींवर आहे. नाव मात्र ‘अबॅण्डनिंग ए कॅट’. गेल्या दोन आठवड्यांत अनुक्रमे ब्रिटन आणि अमेरिकेत वेगवेगळे मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसह ते प्रकाशित झाले. यानिमित्ताने अमेरिकी पुस्तकबाजारपेठेतील जपानी कथात्मक पुस्तके यांत मांजराधिक्य कसे वाढत चाललेय याची चर्चा करणारा हा लेख. हारुकी मुराकामीच्या जवळपास प्रत्येक कादंबरीत मांजर आहे. वेड्याविद्रूप मनीमाऊची कथा ते संपूर्ण शहरच मांजराने भरलेली एक दीर्घकथाही त्याने लिहिली होती. या लेखातील संदर्भ मुराकामीच्या नव्या पुस्तकाच्या वाचनासाठी पूरक ठरले आहेत. https://tinyurl.com/4uc6j7j2

‘रील्स’घायकुतीच्या युगात पुस्तके तरतील?

प्रगत अथवा अप्रगत राष्ट्रांतील सगळे कानेकोपरे हे एकटेपणाशी लढत आहेत, त्याहून कैक पटींनी ‘रील्स’मार्‍यात रमणे पसंत करत आहेत. यातून उत्पादित होणार्‍या जुन्या- नव्या एकाग्रताशून्य पिढ्या कागदी पुस्तकांपासून लांब पळत आहेत. या सार्‍यांत पारंपरिक वाचनाला बदण्यासाठी ‘किंडल’सारखी अद्ययावत उपकरणेही आली. ‘जीक्यू’ मासिकाच्या ताज्या अंकात जगात सध्या गाजणार्‍या ३४ मान्यवरांना या विषयावर बोलते करण्यात आले आहे. कथा-कादंबरीकार ते पुस्तकांच्या लाखोंच्या पहिल्या प्रती काढणारे प्रकाशक असे सारेच ‘रील्स’घायकुतीच्या जगात पारंपरिक पुस्तके तरतील की मरतील यावर चर्चा करताना या दुव्यावर सापडतील.  https://tinyurl.com/4cb9m92n

वायूवेगी लेखिकेची ३७० पुस्तके

मराठीत सत्तरीच्या दशकात रहस्यकथा लेखक महिन्याला पाच नायकांच्या वेगवेगळ्या कथामालिका देत. वर्षभरात ५० ते ७० छोट्या आकाराच्या कादंबर्‍या हा त्यांचा वेग. जगभरात या प्रकारचे रंजक लगदा साहित्य लिहिले गेले, पण कुणालाही २० महिन्यांत ३७० इतक्या आकड्याला स्पर्श करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेतील एका लेखिकेने मात्र ‘एआय’ च्या मदतीने इतक्या पुस्तकांचा लेखनफडशा पाडला. आता कृत्रिम बुद्धिमत्ता पुस्तकेही लिहिते. या महिलेने २०२५ फेब्रुवारीपासून साधलेली वेगवान लेखनसाधना नक्की कशी पूर्ण केली, त्याबाबतचा तपशील सांगणारे वृत्त. एकीकडे ‘एआय’ वापरून लिहिलेल्या कथांवरून रान उठलेले असताना या पुस्तकांचे समर्थन लेखिकेने केले. * https://tinyurl.com/2wntv8v2
* https://tinyurl.com/4xctjayx