गेल्या शतकात ७० वर्षे पूर्ण झालेल्या बर्‍याचशा मराठी लेखकांची छाननी केली, तर लेखनदृष्ट्या संपलेले आढळतील. ‘आमच्या काळात होते तेच काय ते सोने’ ही किरकिरी वृत्ती आत्ताच्यादेखील सत्तरीतल्या जगभरच्या लेखक-वाचकांना लगडलेली दिसेल. सरन्यायाधीश असल्याच्या थाटात कुठल्याही विषयाचे विश्लेषण करू धजणारा हा डोकरटपंथ नवोन्मेषाशी फटकून जगणारा. पण ॲलन लीवाय या अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील लेखकाने ‘थिओ ऑफ गोल्डन’ ही कादंबरी दोन वर्षांपूर्वी स्वत:च प्रसिद्ध करून तिच्या तीन हजार प्रती विकून दाखवल्या. पुस्तक मुख्य धारेतील प्रकाशकांनी नंतर विकत घेतले. मग ‘न्यू यॉर्क टाइम्स’पासूून सार्‍याच याद्यांमध्ये हे पुस्तक अग्रस्थानी राहिले. कायदेतज्ज्ञ, अर्ध-व्यावसायिक गिटारवादक असलेल्या या लेखकावर ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने खास लेख प्रसिद्ध केला. त्यानंतरची प्रतिक्रिया असलेली ही लोकप्रिय ब्लॉगपोस्ट. या लेखकाला २५ वर्षांहून अधिक काळ ओळखत असलेल्या जेफ मन्रो यांनी लिहिलेली. ७० वर्षीय लेखक खूपविका कसा झाला, याचं नवल वर्तवणारे लेख व मुलाखती…

https://tinyurl.com/mrydwja8
https://tinyurl.com/yc74amnv

एक(मेव) मुराकामी… दोन आगामी!

अमेरिकेत दोन महिन्यांपूर्वी वयाच्या ७७व्या वर्षी जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी कथनात्मक लेखनासाठी कारकीर्द-गौरव पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारतानाचे अथवा कार्यक्रमातील स्वत:चे छायाचित्रही झळकवण्यात येऊ नये या अटीवर. पाच दिवसांपूर्वी न्यू यॉर्क टाइम्सचा पुस्तक विभाग पाहणार्‍या अलेक्झांड्रा अल्टर यांनी मुराकामीशी झालेल्या संवादाच्या बळावर व्यक्तिवेध लिहिला. तो का वाचायचा? तर येत्या वर्षात दोन पुस्तके इंग्रजीतून येतायत त्यांच्या तपशिलासाठी. एक कादंबरी (जिचा अंश न्यू यॉर्करच्या कथा विशेषांकात सापडू शकतो.) आणि वडलांच्या संदर्भातील अकथनात्मक पुस्तक. शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड संग्रहावरचा आणखी एक ग्रंथ. त्याशिवाय जपानी भाषेत पूर्ण झालेली कादंबरी आदी बर्‍याच तपशिलांसाठी. मुराकामी यांच्याशी संबंधित अनेकांशी बोलून हा लेख झाला असल्याने आणखीही नवे संदर्भ हाती लागतील.

https://tinyurl.com/yjtyf97k

पुस्तकसाठा आणि न-वाचन…

पुस्तकवेडे, ग्रंथसंग्राहक यांना कायम भेडसावणारा प्रश्न हा विविध मार्गांनी दाखल होणार्‍या पुस्तकांसाठी वेळ केव्हा शोधावा याबाबतचा असतो. भेटीदाखल पुस्तके येत राहतात. ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारामुळे दुर्मीळ पुस्तकांची द्वारे उघडली जातात. रद्दीच्या दुकानांपासून ते वेगवेगळे थांबे पुस्तक घरी येण्यासाठी कारणीभूत ठरतात. ग्रंथांचा थर वाढत जातो. पुढे थरांचेदेखील नंतर आणखी थर होतात. काही लोकांकडे पुस्तकभिंती आकारास येतात. पण त्यातल्या काही पुस्तकांच्याच नशिबी डोळ्यांचे दर्शन असते. आस्मा सिद्दीकी यांचा हा ‘पर्सनल हिस्ट्री’सह व्होग इंडियामध्ये आलेला लघुनिबंध. ‘इन डिफेन्स ऑफ बायिंग बुक्स यू मे नेव्हर रीड’ वाचावा असा खास.

https://tinyurl.com/3a5jc9p9