बहुचर्चित जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी यांची नवी कादंबरी येऊ घातली आहे. ‘द टेल ऑफ काहो’ असे तिचे शीर्षक असून ती ३ जुलैला प्रकाशित केली जाईल. कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील मुख्य व्यक्तिरेखा एक स्त्री आहे. मुराकामींवर त्यांच्या कादंबर्‍यांतील स्त्री व्यक्तिरेखांच्या चित्रणावरून अनेकदा टीका झाली आहे. त्यांच्या साहित्यात ्त्रिरयांना केवळ एखाद्या लैंगिक वस्तूपुरते मर्यादित स्थान दिले जाते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरणार्‍या या नव्या कादंबरीविषयी साहित्यविश्वात कुतूहल आहे.

ही कादंबरी काहो नावाच्या रेखाचित्रप्रधान पुस्तकांच्या लेखिकेचे आयुष्य चित्रित करते. ही लेखिका २६ वर्षांची आहे. कादंबरीच्या आशयाविषयी फारसे तपशील उपलब्ध नाहीत; मात्र काहोचे वर्णन मुराकामींनी ‘फारशी हुशार वा फार सुंदरही नसलेली अत्यंत साधीसुधी मुलगी’ अशा शब्दांत केले आहे. तिच्या आयुष्यात आणि तिच्या अवतीभोवती घडणार्‍या विचित्र घटनांमुळे ती खास ठरते, असे ते सांगतात. ‘शिंचो’ या साहित्याला वाहिलेल्या मासिकात जून २०२४ ते मार्च २०२६ दरम्यान प्रसिद्ध झालेल्या चार भागांच्या मालिकेवर ही कादंबरी आधारलेली आहे. या मालिकेचा फिलिप गॅब्रिएल यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेला पहिला भाग २०२४ मध्ये ‘न्यू यॉर्कर’मध्ये प्रकाशित झाला होता. कथेची सुरुवात काहो एका अनोळखी व्यक्तीबरोबर डेट जात असल्याच्या प्रसंगाने होते. ही व्यक्ती तिची संभावना, ‘‘मी माझ्या आयुष्यात सर्व प्रकारच्या स्त्रियांना डेट केले आहे, पण तुझ्याइतकी कुरूप स्त्री मी कधीही पाहिली नाही,’’ अशा शब्दांत करते.

मुराकामी यांचे प्रकाशक, शिंचोशा पब्लिशिंग कंपनीने, ‘द टेल ऑफ काहो’चे वर्णन त्यांची स्त्री नायिका असलेली पहिली संपूर्ण कादंबरी असे केले आहे. मुराकामींनी यापूर्वी लघुकथांमध्ये ्त्रिरयांना पात्र म्हणून चित्रित केले आहे. त्यांच्या ‘1 द84’ या तीन भागांच्या कादंबरीतील दोन नायिकांपैकी एक स्त्री होती. मुराकामी यांना त्यांच्या स्त्री पात्रांवरून सातत्याने टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यासंदर्भात ‘पॅरिस रिव्ह्यू’ला दिलेल्या बहुचर्चित मुलाखतीत, त्यांनी म्हटले होते, ‘माझ्या कथांमध्ये ्त्रिरया या एक माध्यम असतात. पुढे काहीतरी घडामोड होणार आहे, याचा संदेश त्या देतात. त्यामुळेच माझा नायक त्यांच्याकडे जात नाही, त्या स्वत:च त्याच्याकडे येतात.’ ‘द टेल ऑफ काहो’ विषयी फेब्रुवारीत ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत, मुराकामी यांनी, ‘एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करणे हा माझ्यासाठी अगदीच नवा अनुभव होता. लिहिताना मीच ती स्त्री झालो होतो,’ असे म्हटले होते. ही कादंबरी आजवरच्या कादंबर्‍यांच्या तुलनेत सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

जपानमधील समकालीन लेखकांमध्ये अग्रगण्य मानल्या जाणार्‍या ७७ वर्षीय मुराकामी यांनी आपल्या ४७ वर्षांच्या साहित्यिक कारकीर्दीत एकूण १५ कादंबर्‍या लिहिल्या आहेत. याआधी त्यांची ‘द सिटी अँड इट्स अनसर्टन वॉल्स’ ही कादंबरी २०२४ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यांच्या साहित्याचा सुमारे ५० भाषांमध्ये अनुवाद झाला असून त्यापैकी ‘नॉर्वेजियन वुड’, ‘द विंड-अप बर्ड क्रॉनिकल’, ‘काफ्का ऑन द शोर’ आणि ‘1 द84’ या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत. ‘द टेल ऑफ काहो’ ३५२ पानांची असून तिची ई-बुक आवृत्तीही ३ जुलै रोजीच प्रसिद्ध होणार आहे.