scorecardresearch

Premium

आरोग्याचे डोही : कीटो- किन्तु

कीटो आहार हे कडकडीत पथ्य आहे आणि त्याला माफक व्यायामाची जोड हवी; एवढं मात्र नक्की सिद्ध होऊ शकलं..

diet

डॉ. उज्ज्वला दळवी

‘‘अरे, सकाळपासून तेलाने थबथबलेलं, चीझ-आम्लेट, फ्राइड चिकन असलंच तुझं कीटो काय ते खातोयस तू! भात-भाजी-पोळी नाहीच! मळमळणारच ना! डाएट करायचंच तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला विचारून कर.’’ राधाआजींना काळजी वाटत होती. त्यांचा नातू, श्रीकर याला त्याच्या आवडीचे सग्गळे पदार्थ चापूनदेखील वजन कमी करून देणारा अल्लाउद्दीनचा जादूई खुराक सापडला होता. सगळं मजेत चाललेलं असताना त्याला मळमळू लागलं. अन्नावरची वासनाच गेली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

हे कीटो गौडबंगाल काय आहे?

आपल्या शरीराच्या इंजिनाचं नेहमीचं इंधन म्हणजे ग्लुकोज. भात- भाकरी- पोळी, फळं, फळभाज्या- कंदभाज्या, साखर- गूळ- मध या सगळय़ांतून हे इंधन मिळतं. ते पेशींच्या भट्टय़ांत शिजवायला इन्सुलिनची मदत लागते. म्हणून रक्तातलं ग्लुकोज वाढलं की इन्सुलिनही वाढतं. गरजेपेक्षा अधिक असलेल्या ग्लुकोजपासून चरबी बनवणं आणि ती शरीराच्या बुधल्यात साठवणं हे इन्सुलिनचं काम. वजन कमी करायला ती साठेबाजी थांबवायला हवी. ग्लुकोज देणारे अन्नपदार्थ टाळले तर रक्तातलं ग्लुकोज आणि इन्सुलिनही वाढणार नाही. चरबीची साठेबाजी थांबेल. वजन वाढायचं थांबेल. पण ग्लुकोज टाळून कसं चालेल? मेंदूकडे ग्लुकोजचा साठा नसतो. त्याला सतत बाहेरून रसद यावी लागते. लिव्हर, स्नायू वगैरेंत त्यांचे ग्लुकोजचे खासगी साठे असतात. कडक उपासाच्या दिवशी ते दामाजी त्या कोठय़ा लुटतात आणि मेंदूला तगवतात. २-४ दिवसांत ते साठे संपतात.

 गांधीजींनी तर २१ दिवस उपोषण केलं. त्यांच्या शरीराला- मेंदूला चार दिवसांनंतर इंधन कुठून मिळालं? दोन-चार दिवसांनी शरीर साठवणीतली चरबी वापरायला काढतं. तिच्यापासून स्निग्धाम्लं आणि ग्लिसेरॉल बनवतं. मेंदूखेरीज इतर पेशींना ते इंधन चालतं. मेंदूचे लाड पुरवायला स्निग्धाम्लांपासून ‘कीटोन’ नावाचे पदार्थ बनतात आणि ग्लिसरॉलपासून ग्लुकोज बनतं. मेंदूला ते दोन्ही खाऊ चालतात. सगळं कामकाज चालू राहातं. तसंच चालू राहिलं तर चरबीचे साठे घटतात. वजन कमी होतं. मात्र कीटोन्समुळे तोंडाला दरुगधी येते.  

चरबीपासून तशी कीटोन्स बनायला कडकडीत उपास करायची गरज नसते. रोजच्या आहारातले ग्लुकोज पुरवणारे भात- भाकरीसारखे पदार्थ २० ते ५० ग्रॅमहून कमी असले की झालं. निकड भासली की शरीर अन्नातलं किंवा स्नायूंतलं प्रथिन वापरून त्यापासून ग्लुकोज बनवतं. त्यामुळे होणारी स्नायूंची झीज टाळायला, आपल्या शरीरात न बनणारे, प्रथिनांचे अत्यावश्यक घटक बाहेरून मिळवायला आहारात प्रथिनं असायलाच हवीत. पण मग शरीर त्यांच्यापासूनच ग्लुकोज बनवेल! तसं होऊ नये म्हणून त्यांचं प्रमाणही ७०-७५ ग्रॅमच्या दरम्यानच ठेवायचं. उरलेली पोटपूजा तेल- तूप- चीझ- लोणी, अंडी, काळय़ा पाठीचे मासे, काजू- बदाम- शेंगदाण्यांसारख्या तेलबिया यांसारख्या स्निग्धान्नांवरच भागवायची. मग शरीराचं बहुतांश कामकाज कीटोन्सवर चालतं. चरबी वापरात येते आणि वजन घटतं. तसा आहार म्हणजेच कीटो-डाएट.

तेलकट पदार्थ अधिक काळ पोटात रेंगाळतात. भूक मंदावते. स्नायूंमधल्या ग्लुकोज-साठय़ांत पाणीही असतं. त्या कोठय़ा लुटल्या की ते पाणी लघवीवाटे निघून जातं. कीटोन्समुळेही लघवीत पाणी अधिक जातं. शरीर सुकतं. म्हणून तर श्रीकरचं वजन सुरुवातीला पटकन घटलं होतं. पाण्यासोबत लघवीतून क्षार निघून जातात, भाज्या-फळं कमी खाल्ल्यानं आहारातूनही क्षार कमी मिळतात. पाणी, क्षार कमी झाल्यामुळे थकवा जाणवतो. शिवाय पेशींना नेहमी तत्परतेने सेवेसाठी  हजर असणाऱ्या ग्लुकोजची सवय असते. चरबीपासून कीटोन्स सावकाश, आरामात बनतात. निकडीच्या कामांसाठीही ऊर्जा उशिरा पोहोचते. कामातला उत्साहच हरपतो. रक्तातली चरबी वाढली, इन्सुलिन कमी झालं की रक्तात काही रासायनिक बदल झाल्यानं झोप लागत नाही. मळमळतं, डोकं दुखतं, अंग ठणकतं, चिडचिडेपणा वाढतो. त्या आजाराला ‘कीटो-फ्लू’ म्हणतात. हळूहळू पेशींना नव्या कीटोन-इंधनाची सवय होते. मरगळ जाते. तरी अतिकष्टाची कामं करणं, मॅरेथॉन धावणं कठीणच जातं.

किटो-फ्लू सरल्यावर श्रीकरचं पथ्य व्यवस्थित चाललं होतं. ‘हव्वं तेवढं तेलकट खावं’ असं वाचल्यामुळे तो चमचमीत पदार्थावर आडवा हात मारत होता. पण शरीराच्या गरजेला लागणाऱ्या सगळय़ा कॅलरीज बाहेरूनच दिल्यामुळे साठवणीच्या चरबीला धक्काही लागला नाही. हळूहळू वजन वाढलंच! शिवाय सतत ते तंदुरी चिकन, कबाब खाऊन तो कंटाळला. मग बकाबका आइस्क्रीम खाल्लं. सगळं मुसळ केरात गेलं. अचानक, ‘‘आजी, मला एरंडेल दे गं! चार दिवस पोट साफ झालं नाही. खूप दुखतंय पोटात!’’ तो कळवळला. डॉक्टरांनी बद्धकोष्ठासोबत मूतखडय़ाचंही निदान केलं.  

 पाण्याच्या कमतरतेमुळे, आहारात फायबर कमी झाल्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कीटोन्समुळे रक्तातलं आम्ल वाढतं, हाडं धुपतात, रक्तात कॅल्शियम वाढतं. आहारात मांसाचं प्रमाण वाढल्यानं रक्तात युरिक अ‍ॅसिड वाढतं. मूतखडे होतात. चरबीवाल्या मांसावर, चीझ-लोणी-तुपावर ताव मारल्यामुळे दुष्ट कोलेस्टेरॉल वाढतं. हृदयविकाराची शक्यता वाढते. भाज्या-फळं कमी खाल्ल्यामुळे जीवनसत्त्वांची, क्षारांची कमतरता भासू लागते. म्हणजे कीटो-आहार बाद  करायचा का? पण इतिहास काही वेगळंच सांगतो.

अडीच हजार वर्षांपूर्वी हिपोक्रेटिसपासून आयुर्वेदापर्यंत सगळय़ांनी कडकडीत उपास किंवा लंघन हा अनेक आजारांवरचा खात्रीचा उपाय सांगितला. त्यांच्या निरीक्षणांत कीटोप्रभाव आला असावा. १९२० साली आकडीवर हुकमी औषधं नव्हती. त्या वेळच्या औषधांना दाद न देणाऱ्या फेफऱ्यावर कीटो-आहार लागू पडत असे. मेंदूच्या अल्झायमर्स, पार्किन्सन्स वगैरे आजारांत तिथली ग्लुकोजचा वापर करणारी यंत्रणा बिघडते. कीटो-आहाराने ग्लुकोजचा वापरच टाळला, कीटोन्सवरच भागवलं तर आजाराला बगल देता येईल असं फ्रेंच, अमेरिकी, युरोपीय संशोधकांना वाटलं. त्यांच्या निरीक्षणांतून त्या उपायांचा फायदा होईल, अशी आशा वाटते. पण ते विशिष्ट आजारांपुरतं संशोधन आहे.

कीटो-आहाराचे वेगवेगळे प्रकार वजन घटवायच्या उद्देशानं राबवले गेले ते १९७० नंतरच. ते आहार-तंत्रं पाळल्यास वजन घटतं. हृदयविकाराची निशाणी म्हणून बदनाम असलेली पोटावरची चरबी ओसरते. रक्तातली साखर कमी राहिल्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहातो. कर्करोगाच्या पेशींना त्यांच्या कामकाजासाठी, वाढीसाठी मोठय़ा वेगाने ग्लुकोज वापरावं लागतं. ग्लुकोजवर अवलंबून असलेल्या कर्करोगाची वाढ कीटो-आहाराने मंदावते. कीटोच्या भलेबुरेपणाची सांगड कशी घालायची? शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावं म्हटलं तर आत्तापर्यंतच्या कीटोवरच्या सर्वात दीर्घ अभ्यासाची मुदतसुद्धा फक्त सहा महिने आहे. पण नामांकित संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी तसे चार-सहा महिन्यांचे वेगवेगळे अभ्यास-तुकडे जोडून अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन-गोधडय़ा (मेटा-अ‍ॅनालिसिस) शिवल्या आहेत. त्यांच्यावरून त्यांनी निष्कर्ष काढले आहेत. 

कीटो-पथ्यात अखंडित तपश्चर्या करावी लागते. तिथे धरसोड वृत्तीला, चोरटय़ा बकाण्यांना वाव नाही. रोजच्या माफक पण नियमित व्यायामाचीही जोड लागते. आंतरजालावर कीटोबद्दलची माहिती फार उलटसुलट, दिशाभूल करणारी असते. तो गुणकारी पण अवघड आहार ‘सद्गुरुवाचोनी’  झेपवणं कठीण आहे. अधूनमधून दुष्परिणाम, चुका, लबाडी पकडणारा, नवा हुरूप देणारा गुरू अत्यावश्यक असतो. म्हणून एक डॉक्टर आणि एक आहारतज्ज्ञ अशा द्वयीच्या एकत्रित सल्ल्याने, त्यांच्या नियमित देखरेखीखाली कीटो-पथ्य पाळावं. वजन घटवायला आपल्या वजन-उंची-व्यायामाप्रमाणे गणित करून रोज किती कॅलरीजचा आहार घ्यायचा ते ठरवावं.

 त्या आहारातली २०-५० ग्रॅम कबरेदकं (काबरेहायड्रेट्स) गूळपोळी, साखरभातातून न घेता मिश्र धान्याची भाकरी, पालेभाज्या, गवार-घेवडय़ासारख्या शेंगभाज्या, सफरचंद-बोरासारखी फळं यांच्यातून घ्यावीत. ७५ ग्रॅम प्रथिनं लाल मांसातून, चीझ, दूध, दह्यातून न घेता सोया, मश्रूम्स, शेंगदाणे-काजू-बदाम, काळय़ा पाठीचे मासे वगैरेंतून मिळवावीत. उरलेल्या सर्व कॅलरीज स्निग्धान्नांतूनच घ्याव्या. त्याही शक्यतो शेंगदाणे- तीळ- करडई यांची तेलं, माशांचा काळय़ा पाठीचा तेलकट भाग, शेंगदाणे-काजू-बदाम यांच्यातून मिळवाव्या. त्यांच्यातला स्निग्धांश दुष्ट कोलेस्टेरॉलला प्रोत्साहन देत नाही.बाजारी कीटो-खाद्यं हे नियम पाळतीलच असं नाही. त्यांच्यात वैविध्य नसल्यामुळे आहार एकरुची, कंटाळवाणा होतो. घरी शिजवलं तर त्याच शिध्यातून तऱ्हातऱ्हा बनवून जिभेचे चोचले पुरवता येतील. घाईच्या वेळी झटपट न्याहरीला अंडं, सफरचंद , काजू-शेंगदाणे, ज्वारी-बाजरीच्या लाह्या भरपूर होतात. विज्ञान काही म्हणो, राधाआजींनी श्रीकरचं कीटो-पथ्य हाणून पाडलं. कीटोचा  कुठलाही चाचणी अभ्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक चालला नाही तो तशा आज्यांमुळेच असावा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health keto diet cheese omelet rice vegetable food ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×