‘सर्वांत उंच, सर्वांत भव्य, लोकांना दिपवून टाकणारे असे एखादे श्रद्धास्थान उभे करायचे आणि त्यातून आपल्या सत्तेला- आपल्या राजवटीला अधिकृतता मिळवायची,’ – हे शब्द हेर्मान कुल्के यांनी भारतातल्या ज्या राजवटीबद्दल वापरले, ती आजची नव्हे. मूळचे जर्मन असले तरी कुल्के हे भारतात दहा वर्षे राहिलेले होते, २०१० मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ दिली होती हे खरे, पण प्रा. कुल्के यांचे हे भाष्य भारताच्या विद्यमान राजकारणाबद्दल नव्हते. उलट, १९६० च्या दशकापासून भारताविषयी केलेल्या अभ्यासाचा परिपाक म्हणून त्यांनी हे विधान केले, ते इसवी तेराव्या ते सतराव्या शतकातल्या भारतीय राजवटींबद्दल!

‘इंडॉलॉजी’- भारतविद्या – हा हेर्मान कुल्के यांचा अभ्यासविषय. जर्मनीच्या फ्रायबर्ग विद्यापीठातून, डॉ. या विषयात संशोधनासाठी ते भारतात पहिल्यांदा आले. चिदम्बरम नटराज मंदिरावर त्यांचे ते संशोधन केंद्रित होते. जर्मनीत भारतविद्येच्या अभ्यासाची परंपरा श्लेगेल व मॅक्समुल्लरपासून, म्हणजे सन १८४० च्याही आधी सुरू झालेली. सुरुवातीला वेद/ पुराणे वा महाकाव्यांची भाषांतरे, मिथकांचा. मग लोकपरंपरांचा अभ्यास अशा मार्गाने पुढे गेलेल्या या अभ्यासपरंपरेत १९६५ मध्ये गुंथर सोन्थायमर यांच्यामुळे, ‘लोकदैवत व आज जिवंत राहिलेली लोकधाटी’ या अभ्यासाचे वळण आले. हाइन्रिख स्टाइनक्रॉन यांनी स्वातंत्र्योत्तर भारताची राष्ट्रीय प्रतीके वा अभिमानबिंदू आणि हिंदू परंपरा यांच्या संबंधांचा अभ्यास केला. हे स्टाइनक्रॉन २००४ मध्ये ‘पद्मश्री’ मिळवणारे पहिले जर्मन इंडॉलॉजिस्ट. त्यांच्यानंतर कुल्केच. आणि दोघेही हायडेलबर्ग विद्यापीठात काही काळ एकमेकांचे सहकारी. कुल्के यांनी मध्ययुगीन राजसत्ता कशा उभ्या राहिल्या, याचा अभ्यास केला. तो विषय शिकवला आणि पुस्तकेही लिहिली. ते काम मोठेच. पण  कुल्के यांनी या अभ्यासशाखेत आणलेले नवेपण म्हणजे, एखाद्या भूभागाचे आराध्यदैवत आणि त्या भागातली राजकीय अधिसत्ता यांच्या सोळाव्या शतकापूर्वीच्या संबंधांचा त्यांनी केलेला अभ्यास.  ओडिशातला ‘जगन्नाथ’ आणि तेथील मध्ययुगीन राजसत्ता यांच्या संबंधांचा कुल्के यांनी केलेला अभ्यास हे त्यांचे  भारतविद्येला मोठेच योगदान मानले जाते. विष्णूचा अवतार मानला जाणारा, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सोबतीनेच दिसणारा जगन्नाथ हा बांधीव देवस्थानातला लाकडी मूर्तीचा देव! ही मूर्ती बदलली जाते, हेच त्याचे वैशिष्ट्य (‘नव कलेवर’ हा इरावती कर्वेंचा लेख त्या वैशिष्ट्यावरच आहे). पण हे असे लाकडी देव तर आदिवासींचे… मग तो इथे एवढ्या मोठ्या देवस्थानात आला कसा, राजमान्य झाला कसा आणि आजतागायत ओडियाभाषकांचे आराध्यदैवत ठरला कसा, हे सारे प्रश्न धसाला लावले ते कुल्के यांनी!  त्यातून मिळालेले तपशील बरेच; पण अभ्यासाची दिशा त्याहून महत्त्वाची. ही दिशा राजेरजवाड्यांच्या आक्रमणांमुळे आदिवासी समाजांच्या झालेल्या नागरीकरणाची, त्यातून अपरिहार्यपणे झालेल्या घर्षण आणि संस्कृतिसंकराची, लोकदैवतांचे परमभक्त आपणच असे लोकांना वाटले तर लोक आपलेही अनुयायी होतील हे ओळखणार्‍या तत्कालीन राजकीय चातुर्याची आणि म्हणून, त्यातून आजवर रुळलेल्या लोकधाटीची. समाजविज्ञान (विशेषत: राज्यशास्त्र) आणि भारतविद्या यांची सांगड घालता येते, हा संदेश हयातभरच्या अभ्यासातून देणारे प्रा. कुल्के १० मार्च रोजी निवर्तले.