Premium

अन्वयार्थ: हिमालयासम मैत्रीचे आव्हान..

साधारण १५ वर्षांपूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या एका क्रांतिकारी विचारांच्या व्यक्तीने लगेचच जुना पायंडा मोडीत काढला होता.

narendra modi anvyarth
हिमालयासम मैत्रीचे आव्हान..

साधारण १५ वर्षांपूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या एका क्रांतिकारी विचारांच्या व्यक्तीने लगेचच जुना पायंडा मोडीत काढला होता. तोपर्यंतचे नेपाळी नेते पहिल्या परदेश दौऱ्यासाठी नेहमीच भारताची निवड करत. पण त्यावेळचे नवनियुक्त पंतप्रधान नवी दिल्लीऐवजी बीजिंगला गेले. त्यांचे नाव पुष्पकमल दहल ‘प्रचंड’. आज हेच प्रचंड पुन्हा एकदा नेपाळचे पंतप्रधान बनले असून, यंदा मात्र सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड यांच्याशी झालेल्या भेटीनंतर भारत-नेपाळ मैत्रीला हिमालयाच्या उंचीची उपमा दिली आहे. अशी जिंदादिली स्वागतार्हच. पण माओवादी कम्युनिस्ट असलेल्या प्रचंडसारख्या बेभरवशाच्या नेत्याची भारतमैत्री विचारपूर्वक स्वीकारलेली बरी. वास्तविक सांस्कृतिकदृष्टय़ा नेपाळ हा भारताला जवळचा. नेपाळमध्ये खुष्कीच्या मार्गाने होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भारतमार्गेच होतो. परंतु चीनच्या भक्कम पाठिंब्यावर आणि काही प्रमाणात राजेशाहीविरोधी जनमताचा फायदा उठवत एके काळी मार्क्सवादी, माओवादी आणि लेनिनवादी बंडखोर म्हणवून घेणाऱ्यांनी नेपाळी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला. यंदा माओवादी- लेनिनवादी- मार्क्सवादी किंवा आणखी कुठले तरी वादी अशा भाई-भाईंची नौका फुटली, त्यामुळे शेरबहादूर देऊबांची नेपाळी काँग्रेस आणि प्रचंड यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओइस्ट सेंटर) अशी विचित्र आघाडी सध्या सत्तेत आहे. नेपाळी काँग्रेसचे धोरण नेहमीच भारतमैत्रीचे राहिलेले आहे. त्यामुळेच बहुधा प्रचंड यांची भाषाही अलीकडे बदललेली दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर भारत आणि नेपाळ संबंध अतिशय जुने असले, तरी अलीकडे या संबंधांना नेहमीच चीनच्या अस्वस्थकारक उपस्थितीचा आयाम प्राप्त झाला आहे. नेपाळमध्ये काही काळ कम्युनिस्ट आघाडी सरकारे सत्तेत होती, त्या वेळी चीनने नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली होती. परंतु ही मैत्री अधिक घनिष्ठ होऊ शकली नाही, याची कारणे अनेक आहेत. त्यांतील महत्त्वाचे कारण म्हणजे, मैत्रीनिमित्त ‘घरात’ शिरलेला चीन पुढे सारे काही आपल्याच मर्जीने चालावे असा आग्रह धरू लागतो. भारताच्या राज्यकर्त्यांनी तसा पवित्रा कधी घेतला नाही. त्यामुळे जुजबी विरोध काही वेळा झालेला असला आणि प्रचंडसारखे नेते सुरुवातीस अमेरिकेसह भारताचा उल्लेख भांडवलवादी- विस्तारवादी असा करत असले, तरी हा विरोध फार प्रखर बनला नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Himalaya prime minister of nepal pushkamal dahal prime minister narendra modi india nepal friendship amy