हरीश एस. वानखेडे , ‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक
हिंदी चित्रपटसृष्टीतील १९९० नंतरच्या काळावर नजर टाकल्यास, पडद्यावरील मुस्लीम व्यक्तिरेखांच्या सादरीकरणात एक अस्वस्थ करणारा बदल दिसून येतो. जागतिक स्तरावर ९/११ नंतर निर्माण झालेली दहशतवादाची भीती आणि देशांतर्गत राजकारणात उजव्या विचारसरणीचा झालेला उदय यांमुळे, हिंदी चित्रपटसृष्टी आज एका विशिष्ट साच्यात अडकलेली दिसते. ‘द काश्मीर फाइल्स’, ‘छावा’ किंवा ‘धुरंदर’सारख्या चित्रपटांतून मुस्लीम व्यक्तिरेखांना निर्दयी, हिंसक किंवा समाजासाठी धोकादायक म्हणून चित्रित करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अशा प्रकारच्या चित्रण शैलीला आज ‘हिंदुत्ववादी चित्रपट’ असे नाव दिले जात असून, हे केवळ व्यावसायिक यश नसून, एका नियोजित अजेंड्याचा भाग असल्याचे स्पष्ट होते. हे चित्रपट अतिरंजित नाट्य आणि द्वेषाच्या माध्यमातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम एखाद्या घातक शस्त्रासारखे करत आहेत.

मात्र, हे वास्तव १९९० पूर्वीच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील मूळ मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. एक ऐतिहासिक विसंगती अशी की, पडद्यावर ‘सद्गुणी मुस्लीम’ ही प्रतिमा कोणत्याही शांततामय काळात निर्माण झाली नव्हती, तर ती १९४०च्या दशकातील अत्यंत अस्थिर राजकीय वातावरणात जन्माला आली होती. तो काळ म्हणजे भारत-पाकिस्तान फाळणीच्या वावटळीचा आणि हिंदू-मुस्लीम यांच्यात निर्माण होत असलेल्या दुफळीचा होता. असे असूनही, त्या काळातील चित्रपटसृष्टीने समाजात द्वेष पेरण्याऐवजी, एकोपा आणि माणुसकीची मूल्ये जपली.

मुस्लिमांच्या आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला चालना देण्यासाठी चित्रपट माध्यमाचा एक नैतिक घटक म्हणून वापर करण्याची ही परंपरा, जातीय ध्रुवीकरण आणि हिंसाचाराने व्यापलेल्या राजकीय वातावरणाला आव्हान देणारी एक प्रभावी सर्जनशील शक्ती होती. हिंदी चित्रपटसृष्टीने बराच काळ हे वैशिष्ट्य जपले आणि राजकीय प्रचाराचे उघड साधन होणे टाळले. मात्र, बदलत्या परिस्थितीत हिंदी चित्रपटसृष्टीचे हे मौल्यवान नैतिक चारित्र्य आता लयास जाऊ लागले असून, ते उजव्या विचारसरणीच्या राजकीय अजेंड्याचा प्रसार करण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरू लागले आहे.

फाळणीच्या छायेतील निधर्मी मूल्ये

१९४० चे दशक भारतीय इतिहासात अत्यंत अस्थिर होते. द्वि-राष्ट्र सिद्धांत जोर धरत होता, एका बाजूला मुस्लीम लीगची पाकिस्तानची मागणी होती, तर दुसर्‍या बाजूला हिंदुत्ववादी विचारांकडून ‘हिंदू राष्ट्रा’ची हाक दिली जात होती. अशा काळात बॉलीवूडचा धार्मिक विद्वेषाचे माध्यम म्हणून वापर केला जाणे, सहज शक्य होते. अनेक मुस्लीम कलाकारांवर तर स्वत:ची ओळख लपवण्याचा दबावही होता. परंतु, बॉम्बे सिनेमातील कलाकारांनी अशा जातीयवादी दबावाला बळी न पडता आपली सर्जनशीलता आणि बौद्धिक स्वायत्तता जपली.

गांधी आणि नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष-राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित होऊन, चित्रपट निर्मात्यांनी सिनेमा हे शांतता आणि समन्वयाचे साधन म्हणून वापरले. त्यांनी मुस्लीम सम्राटांना किंवा व्यक्तिरेखांना केवळ आक्रमक किंवा धार्मिक कट्टरपंथी न दाखवता, त्यांना संस्कृतीचे रक्षणकर्ते आणि सहिष्णू शासक म्हणून सादर केले. हे चित्रपट केवळ ऐतिहासिक काळाचे चित्रण नव्हते, तर तो एका मोठ्या सांस्कृतिक संघर्षाचा भाग होता, ज्याद्वारे समाजमानसात तुटलेली माणुसकी जोडण्याचे काम केले जात होते.

सांस्कृतिक समन्वयाचा पाया

‘पुकार’ (१९३९), ‘शहंशाह अकबर’ (१९४३), ‘शहंशाह बाबर’ (१९४४), ‘मुमताज महल’ (१९४४), ‘हुमायून’ (१९४५) आणि ‘शहाजहान’ (१९४६) यांसारख्या चित्रपटांनी मध्ययुगीन भारताला एक ‘समन्वयी कालखंड’ म्हणून दाखवले. मेहबूब खान यांच्या ‘हुमायून’ चित्रपटात सम्राट आणि त्यांचे राजपूत सरदार यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध ज्या प्रकारे दाखवले आहेत, ते आजच्या इतिहासाच्या विकृत मांडणीला चपराक देणारे आहे. वजात मिर्झा यांच्या ‘शहंशाह बाबर’मध्ये बाबरला एक ‘विद्वान आक्रमक’ नाही, तर या भूमीवर प्रेम करणारा आणि तिला समृद्ध करू पाहणारा राजा म्हणून दाखवले आहे.

या चित्रपटांची भाषाही हिंदुस्तानी होती, ज्यात हिंदी आणि उर्दूचा सुंदर संगम होता. गांधीजींना अभिप्रेत असलेली ही हिंदुस्तानी भाषा एका वैविध्यपूर्ण समाजाला एकत्र बांधण्याचे काम करत होती. मुन्शी शाम यांची पटकथा आणि खेमचंद प्रकाश यांचे संगीत असणे, हे त्या काळातील हिंदू-मुस्लीम एकतेच्या व्यावसायिक भागीदारीचे प्रतीक होते. हे चित्रपट जाणीवपूर्वक अशा प्रकारे तयार केले जात होते की, ज्यामुळे इतिहासातील चुकीचे समज दूर व्हावेत आणि दोन्ही समुदायांत प्रेमाचे, विश्वासाचे नाते घट्ट व्हावे.

७०-८०च्या दशकातील वैविध्य

१९४० च्या दशकाचा वारसा पुढे १९७० आणि ८० च्या दशकातही कायम राहिला. या काळात मुस्लीम व्यक्तिरेखांना केवळ एकआयामी रूपात न मांडता, त्यांना मानवी छटा देण्यात आल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कुली’ (१९८३) चित्रपटातील इक्बाल खानची व्यक्तिरेखा. हा केवळ एक मुस्लीम तरुण नव्हता, तर तो कामगार वर्गाचा आवाज होता, जो अन्यायाविरुद्ध लढत होता.

तसेच, ‘सलीम लंगडे पे मत रो’ (१९८९) हा चित्रपट मुस्लीम समाजातील अंतर्गत संघर्षावर आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा एक मास्टरपीस होता. त्यात सलीम ही व्यक्तिरेखा कोणत्याही उपकाराच्या लाटेवर स्वार नसून, ती संघर्षातून आपली ओळख शोधणारी आहे. त्याचबरोबर ‘कुर्बानी’ (१९८०) सारख्या चित्रपटांत अमजद खान यांनी साकारलेल्या पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेने मुस्लीम पात्राला आधुनिकतेची स्टायलिश चौकट दिली. या चित्रपटांतून मुस्लीम पात्रे ही केवळ धर्माच्या प्रतीकांपुरती मर्यादित न राहता, ती या देशाच्या मुख्य प्रवाहातील एक जिवंत आणि धडपडणारा घटक म्हणून समोर आली.

वारसा पुसण्याची प्रक्रिया

हिंदी चित्रपटसृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला तो २००० च्या दशकात. या काळात एका बाजूला जागतिक पातळीवरील दहशतवादाची चर्चा आणि दुसरीकडे देशांतर्गत राजकारणात उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव यामुळे पडद्यावरील मुस्लीम व्यक्तिरेखांच्या मांडणीत मोठा बदल घडून आला. २००० नंतरच्या काळात खलनायक हा मुस्लीम धार्मिक ओळख असलेला गुंड म्हणून अधिक ठळकपणे मांडला जाऊ लागला. ‘वॉर’, ‘उरी’, ‘बॉर्डर २’ आणि ‘गदर २’ सारखे चित्रपट मुस्लीम आणि पाकिस्तानी यांना एकच मानून, त्यांना भारताचा कायमचा शत्रू म्हणून चित्रित करत आहेत. मुस्लीम व्यक्तिरेखांना केवळ दहशतवादी किंवा हिंसक गुन्हेगार दाखवून, एक अशी राष्ट्रवादी ओळख तयार केली जात आहे, जी दुसर्‍याच्या तिरस्कारावर आधारित आहे.

हे चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत, तर ते राजकीय ध्रुवीकरणाचे घातक शस्त्र झाले आहेत. एकदा का सिनेमाच्या आरशातून समन्वयाचे स्वप्न पुसले गेले की, तो आरसा केवळ द्वेषाचे प्रतिबिंब दाखवतो. आजचा चित्रपट सहअस्तित्वाकडून विजयाकडे प्रवास करत आहे.

आशेचा किरण

जरी आज द्वेषाचे राजकारण चित्रपटसृष्टीवर वरचढ ठरत असले, तरी काही चित्रपट निर्माते अद्याप त्या निधर्मी वारशाचा दिवा तेवता ठेवत आहेत. ‘माय नेम इज खान’ (२०१०) हा चित्रपट मुस्लीम व्यक्तीच्या अस्मितेचा आणि त्याच्या देशप्रेमाचा संघर्ष अत्यंत संवेदनशीलतेने मांडतो. ‘गली बॉय’मधील ‘मुराद’ची भूमिका एका सामान्य मुस्लीम तरुणाची स्वप्ने आणि त्याच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करते, जी कोणत्याही धार्मिक कट्टरतेपासून मुक्त आहे. इम्तियाज अली यांचा अलीकडचा ‘मैं वापस आऊंगा’ सारखा प्रयोगही याच परंपरेचा एक भाग आहेत, जिथे कथांच्या केंद्रस्थानी माणुसकी आणि भावनांना महत्त्व दिले जाते. ही उदाहरणे हे सिद्ध करतात की, आजही चित्रपटसृष्टीत एक असा गट आहे जो मुस्लीम व्यक्तिरेखांना केवळ ‘व्हिलन’ म्हणून पाहण्याऐवजी, त्यांना मानवी दृष्टिकोनातून पाहतो. परंतु, ही संख्या मुख्य प्रवाहातील हिंदुत्ववादी सिनेमाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

हिंदी चित्रपटांनी आपला निधर्मी आत्मा पुन्हा मिळवण्यासाठी त्या १९४० च्या दशकातील ध्येयधोरणांकडे आणि १९७०-८० च्या दशकातील वैविध्याकडे पुन्हा वळण्याची गरज आहे. जेव्हा सिनेमा इतिहासाचा आणि वर्तमानाचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठी करतो, तेव्हा ती केवळ एक कलाकृती उरत नाही, तर ती एका लोकशाही मूल्याची हत्या ठरते. हा भग्न आरसा आपल्याला हेच सांगतोय की, जर आपण आजच्या या विषारी सादरीकरणाला प्रश्न विचारले नाहीत आणि ‘माय नेम इज खान’ किंवा ‘गली बॉय’सारख्या संवेदनशील कथानकांना प्रोत्साहन दिले नाही, तर आपण पुढच्या पिढ्यांना केवळ द्वेषाचा वारसा देऊन जाऊ. सिनेमा हे माणसांना परस्परांपासून तोडण्याचे शस्त्र न होता, ते जोडण्याचे माध्यम होणे, हीच काळाची गरज आहे.