वि. का. राजवाडे यांना मनस्ताप देणारा मेणवली दप्तराबद्दलचा तो प्रसंग अपवादात्मक नव्हता. त्यांच्या सहनशक्तीची कसोटी पाहणारे असे प्रसंग त्यांच्या पाचवीलाच पुजले होते. वाईत मुक्काम असताना राजवाडे एका वकील मित्राच्या घरी रात्री झोपण्यासाठी जात असत. त्या वकिलांच्या वाड्याच्या पुढील दरवाजावर एक माडी होती, तिला स्वतंत्र जिना होता. त्यामुळे घराच्या आतल्या भागाशी त्या माडीचा कसलाच संंबंध येत नसे. केव्हाही ये-जा करायला सोयीचे जात असे. एकदा असा प्रकार घडला की, त्या वकिलांच्या बायकोची नथ नाहीशी झाली. घरात सगळीकडे शोधूनही ती सापडेना, तेव्हा वकिलांनी सरळ राजवाड्यांवरच आळ घेतला – ‘तुम्हीच घेतली असणार, बर्या बोलाने परत देऊन टाका, नाहीतर…’ वगैरे वगैरे. राजवाड्यांनी परोपरीने सांगून पाहिले, पण वकीलसाहेब ऐकून घ्यायला तयारच होईनात.
या बाचाबाचीची बातमी राजवाड्यांचे मित्र अंतोजीपंत जोशी यांच्यापर्यंत पोहोचली. ते धावतपळत त्या वकिलांच्या घरी गेले. त्यांनी वकीलसाहेबांना बाजूला घेऊन राजवाड्यांवर संशय घेणे कसे वेडेपणाचे आहे, ते समजावून सांगितले. मुळात त्या वकिलांना राजवाड्यांबद्दल आदर वाटत होता, त्यामुळे त्यांचा संशय फिटला; मग त्यांनीच घरात जरा दरडावून चौकशी केली, तेव्हा त्यांच्या बायकोने शेवटी कबूल केले की, एरवी सगळ्यांशी साहेबी तोर्यात वागणारे वकीलसाहेब राजवाड्यांशी तेवढे नम्रतेेने, आदराने वागतात, हे तिला आवडत नव्हते. त्यामुळे तिच्या मनात राजवाड्यांबद्दल तेढ निर्माण झाली आणि त्यांची ब्याद आपल्या घरातून हाकलून दिली जावी, असे वाटल्यामुळे तिने नथ हरवल्याचा कांगावा केला होता. जोशींच्या मध्यस्थीमुळे राजवाडे त्या प्रकरणातून सहीसलामत सुटले खरे, पण वाईला घडलेल्या त्या प्रकाराची पुनरावृत्ती इतरत्रही घडण्याची शक्यता लक्षात घेऊन राजवाड्यांनी नियम ठरवून टाकला, यापुढे कुणाच्याही घरी राहावयाचे नाही!
असेच मनस्ताप देणारे आणखी एक प्रकरण म्हणजे वाईजवळच्याच ओझर्डेे गावातल्या पिसाळ देशमुखांच्या घरातल्या दप्तराबद्दलचे. ते दप्तर सूर्याजी पिसाळाबद्दलचे होते, त्यात खुद्द औरंगजेबाचा सूर्याजीशी झालेला पत्रव्यवहार होता. त्यामुळे औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेल्या स्वारीचा साधकबाधक अभ्यास करता येणार होता. राजवाड्यांनी घराण्याच्या प्रमुखाशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे अनुकूल प्रतिसाद मिळाला. राजवाडे विजापूरकरांच्या ‘ग्रंथमाला’ मासिकाच्या अंकांमधून त्या दप्तरातली कागदपत्रे प्रसिद्ध करू लागले. काही महिने सारे काही व्यवस्थित चालले; परंतु एका पत्रामध्ये सूर्याजीने मराठ्यांना ‘गनीम’ हे दूषण लावल्याचे आढळताच राजवाड्यांना राग आला; त्यांनी प्रामाणिकपणे ते पत्र जसेच्या तसे छापले, परंतु त्यासोबत एक तळटीप लिहिली. ‘सूर्याजी राजद्रोही होता’, असे आपले परखड मत त्यांनी नोंदवले. ती टीप पाहिल्यावर दप्तराचा मालक राजवाड्यांवर संतापला. त्याने दप्तर दाखवायला नंतर ठाम नकार दिला. एवढेच नव्हे, तर त्याने राजवाड्यांना प्रतिप्रश्नही केला, ‘सध्याचे गायकवाड, शिंदे, होळकर वगैरे सगळेच्या सगळे सरदार-दरकदार परक्या इंग्रजांशी सलोख्याने वागतात, त्यांच्या हिताशी समरस होणारी धोरणे अमलात आणतात. तरीही ते राजद्रोही ठरत नाहीत; मग त्या काळात जी सत्ता सार्वभौम होती, तिच्याशी समरस झालेला सूर्याजी पिसाळ मात्र राजद्रोही कसा?’ राजवाड्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याचे महत्त्व सांगून आपले म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण पिसाळ घराण्यातल्या कुणालाही त्यांची भूमिका पटली नाही. उभय पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला, काकाराव पंडितांनी राजवाड्यांना लवचीक भूमिका घेण्याचा आग्रह केला, पण त्यामुळे ते त्यांच्यावरही संतापले. पिसाळ घराणेही अडून राहिले. परिणामी राजवाड्यांना पिसाळ घराण्याच्या दप्तरावरही अर्धवट पाणी सोडावे लागले.
अशा प्रसंगांनंतरही राजवाड्यांनी इतिहास-संशोधनाचे आणि त्यासाठी आवश्यक साधनांच्या संकलनाचे काम थांबवले नाही. एकांतात विचार करत बसले असताना कधीतरी त्यांना आपण अर्थार्जनासाठी काहीही करत नसल्याची खंत वाटे; फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरने जसा आधी भरपूर पैसा कमावला होता आणि मग आपले लेखन छापून प्रसिद्ध करण्यासाठी छापखाना काढला होता, तसे आपणही करायला हवे होते, असेही क्षणभर त्यांना जाणवत असे; पण काही क्षणांतच ते स्वत:ला सावरत व पुढच्या कामाला लागत. ‘मोदवृत्त’मध्ये तयार होत असणारा साधनग्रंथ त्यांना आधार देई!
