आनंद हर्डीकर
तर्कतीर्थांनी केलेल्या चिकित्सक गौरवापासून साने गुरुजींनी वाहिलेल्या भावपूर्ण काव्यांजलीपर्यंत राजवाडे यांच्या कार्याचे विविधांगी पण ओझरते दर्शन आपण घेतले. आता त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याच्या, चरित्रातल्या विविध घटनांचा आवश्यकतेनुसार कमीजास्त परिचय करून घेऊ या.
राजवाडे घराण्याचे मूळ आडनाव जोशी होते. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्या काळापासून जोशींचा राजवाड्यांशी संबंध येत गेला, त्यामुळे पुढे जोशी राजवाडे झाले, अशी एक आख्यायिका पूर्वी सांगितली जात असे. कोकणातल्या राजवाडी नावाच्या गावाशी या आडनावाचा संबंध असावा, अशी शंका शंकर रामचंद्र तथा ‘आहिताग्नी’ राजवाडे यांनी प्रदर्शित केली होती. शिवशाहीनंतरच्या काळात कोकणातली काही घराणी नशीब काढण्यासाठी देशावर आली, त्यांच्यात राजवाडे हे एक घराणे होते. या घराण्यातले काशिनाथपंत पुण्यात वकिली करत. त्यांच्या पत्नीला – यमुनाबाईंना – आषाढ शुद्ध अष्टमी शके १७८५, दि. २४ जून १८६३ रोजी पुत्ररत्न झाले. त्याचे नाव विश्वनाथ असे ठेवण्यात आले. तो मुलगाच पुढे मोठा कर्तबगार निघाला; ‘इतिहासाचार्य’, ‘पुरातत्त्वभूषण’ वगैरे वगैरे सन्मानदर्शक उपाध्या मिळाव्यात, असे लोकविलक्षण कार्य त्याने उभे केले.
तथापि या संदर्भातला एक गमतीशीर वाद नमूद करण्याजोगा आहे. महापुरुषांच्या जन्मतिथीवरून वर्षानुवर्षे चालणारे वाद आपल्या महाराष्ट्राला नवीन नाहीत. खुद्द शिवरायांच्या जन्मतिथीबद्दलचा वाद हे एक ठळक उदाहरण. विश्वनाथ राजवाडे यांच्या जन्मतिथीवरून नसला, तरी जन्मवर्षावरून संभ्रम निर्माण झाला होता आणि तोसुद्धा दत्तो वामन पोतदार यांच्यासारख्या इतिहासाच्या क्षेत्रातच राजवाड्यांचे शिष्यत्व पत्करून वावरलेल्या एका निकटवर्तीयाने ४ जानेवारी १९२७ रोजी ‘केसरी’त लिहिलेल्या लेखातल्या उल्लेखामुळे उद्भवला होता. राजवाडे यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहणाऱ्या त्या लेखात कसा कुणास ठाऊक, दत्तो वामनांनी जन्मशक १७८५ ऐवजी १७८६ दिला होता.
त्याच महिन्यात ‘ब्राह्मण पत्रिके’चा ‘तिलांजली’ अंक प्रकाशित करण्याच्या खटपटीत असणाऱ्या वा. दा. मुंडले यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. कारण तसेच होते. त्यांना आठवत होते की, सहज गप्पा मारण्याच्या ओघात मुंडले यांनी फलज्योतिषाचा विषय काढला असताना राजवाडे त्यांना म्हणाले होते, ‘‘माझा त्यावर मुळीच विश्वास नाही, पण तुम्हांला करमणूक करून घ्यावीशी वाटली, तर माझी कुंडली करून बघा.’’ मुंडल्यांनी ती संधी साधून राजवाड्यांना त्यांच्या जन्माची वेळ, तिथी, वर्ष विचारले, तेव्हा राजवाडे म्हणाले होते, ‘‘शके १७८५, आषाढ शुद्ध अष्टमी, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास.’’ मुंडल्यांनी त्यांच्या स्मरणवहीत ती नोंद केली, पण पुढे लगेच काही केले नाही.
राजवाडे नेहमी मुंडल्यांना म्हणत, ‘‘मी ८०-९० वर्षांपर्यंत जगणार आहे’’ आणि त्यांच्या प्रकृतीकडे पाहिल्यावर त्यांच्या त्या आशावादी बोलण्याबद्दल शंका घ्यावी, असे कुणालाही वाटले नसते. त्यामुळे मुंडल्यांनी तातडीने कुंडली तयार करवून घेतली नाही. निधनाची बातमी ऐकल्यानंतर मात्र त्यांना वाटले, कुंडली करवून मृत्युयोग तपासून पाहावा. ‘केसरी’त दत्तो वामन पोतदारांनी शके १७८६ लिहिल्यामुळे शंका निर्माण झाली. तिचे निरसन करून घेण्यासाठी त्यांनी पुन्हा पोतदारांनाच गाठले आणि राजवाड्यांच्या बंधूंकडे चौकशी करण्यास सुचवले. प्रा. नानासाहेब राजवाडे यांच्याकडे विश्वनाथपंतांचे विस्तृत जन्मटिपणच सापडले. पोतदारांनी ते मुंडल्यांना आणून दाखवले, स्वत:ची चूक कबूल केली. पुढे मुंडल्यांनी ते जन्मटिपण जसेच्या तसे ‘तिलांजली’ अंकात छापलेसुद्धा. त्यात स्पष्ट उल्लेख आहे-
‘अथ स्वस्तिश्रीनृप शालिवाहन शके १७८५ रुधिरोद्गारी नाम संवत्सरे। उदगयने। ग्रीष्मऋतौ। आषाढमासे शुक्लपक्षे। अष्टमी बुधे…’
मुंडले यांचा संभ्रम दूर झाला, राजवाड्यांचे जन्मवर्ष शके १७८५ हे निश्चित झाले. २४ जून १८६३ ही इंग्रजी तारीख पक्की झाली.
–– आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail
