राजवाड्यांच्या विचारविश्वाचा परिचय करून देणार्या या लेखमालेच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे; कारण त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षातली त्यांची जयंती आज आहे. या विशेष दिवशी त्यांच्या एका दुर्मीळ पत्राबद्दलची माहिती द्यावयाची आहे. हे पत्र दोन अर्थांनी दुर्मीळ आहे. एक म्हणजे ते चक्क इंग्रजीमध्ये लिहिलेेले होते आणि राजवाड्यांनी तर इंग्रजीमध्ये न लिहिण्याचा निश्चय केला होता. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता, काही ग्रंथांचे मराठी भाषांतरही केले होते.
त्यांना इंग्रजी लिहिणे जमण्यासारखे नव्हते म्हणून नव्हे, तर मायमराठीबद्दलच्या प्रेमापोटी व अभिमानापोटी त्यांनी तसा निर्धार केला आणि कटाक्षाने पाळलाही होता. ‘त्यामुळे त्यांच्या कीर्तीचा पाया कमी मजबूत रचला गेला, असे पुष्कळांना वाटते, पण हा महाभ्रम आहे. राजवाड्यांनी कीर्तीची पर्वा न करता आपल्या अजाण देशबंधूंची कदर करून मराठीतच लेखन केले. त्याऐवजी त्यांनी इंग्रजीत रचना केली असती, तर ‘तातडीची भिंत पायावीण रचली’ असे म्हणावे लागले असते’, हे विनोबा भावे यांचे उद्गार या संदर्भात विशेष लक्षणीय ठरतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीमुळे राजवाड्यांचे ते इंग्रजी पत्रही अधिक महत्त्वाचे ठरते.
दुसरे म्हणजे त्या इंग्रजी पत्रात राजवाड्यांनी कधी नव्हे ते एक भाकीत वर्तवले होते. सहाव्या खंडाच्या प्रस्तावनेमध्ये युरोपीय इतिहासकारांवर टीका करताना राजवाड्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, ‘भविष्यकाळात काय होईल, याबद्दल विशिष्ट भाकीत करणे इतिहासाच्या प्रांताबाहेरचे आहे, अशी प्रतिज्ञा करून अधूनमधून तशी भाकिते करण्याची आपली नैसर्गिक चटक या लोकांना आवरता येत नाही’ आणि पुढे ‘इतिहासकारांनी या विशिष्ट भाकीत करण्याच्या हावेपासून अलग राहिल्याविना निर्भेळ सत्य निष्पन्न होणे दुरापास्त आहे’, असा निर्वाळाही दिला होता. त्यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या त्या पत्रातले ते भाकीत विशेष दुर्मीळ मानावे लागते.
‘रिसायतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई यांनी ब्रिटिश रियासतीचे लेखन सुरू करायचे ठरवल्यानंतर त्या प्रकल्पाबाबतच्या काही सूचना राजवाडे यांच्याकडून मुद्दाम मागवल्या होत्या. त्यांचे ते पत्र इंग्रजीतून होते; त्या पत्राला राजवाड्यांनी ९ मे १९०९ रोजी उत्तर पाठवले. विशेष म्हणजे त्यांनी ते चक्क इंग्रजीतून लिहिले होते. छोट्याछोट्या १८ मुद्द्यांचा (जुन्या भाषेत म्हणजे कलमांचा) समावेश असणार्या त्या पत्रामध्ये शेवटचे दोन मुद्दे म्हणजे सरदेसायांना सूचना नव्हत्या, तर काही समकालीन आंतरराष्ट्रीय घटनाप्रवाहांचा उल्लेख आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक भाकीत होते – चाळीस वर्षांनंतर काय घडेल, याबद्दलचे! ‘१९५०साली ब्रिटिश साम्राज्याचा अस्त झालेला असेल!’ (भास्कर वामन भटलिखित राजवाडेचरित्रामध्ये परिशिष्टात पृ.क्र. ६३०-६३२ वर छापलेला त्या मूळ पत्राचा मजकूर जिज्ञासूंनी अवश्य पाहावा. प्रकाशक – राजवाडे संशोधन मंडळ, धुळे.)
समग्र साहित्याच्या अकराव्या खंडाचे संपादक डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी राजवाड्यांचे द्रष्टेपण अधोरेखित करताना प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘ब्रिटिश साम्राज्य १९५० साली संपुष्टात येईल, हे भाकीत राजवाड्यांनी ९ मे १९०९च्या पत्रात केले आहे. सन १७२५पासूनच्या भारतातील आणि युरोपातील घटनांचा साकल्याने विचार करून ते १७व्या कलमात म्हणतात, k1890-1907 Rise of Japan who kills China and Russia in the east. Japan wants colonial empire, so Germany, Japan, America and France are the possible rivals of England and England is weak in Ireland, India, Australia and Canadal आणि १८व्या कलमात म्हणतात, k1950 would see the end of the British Empirelऐस्र्र१ी’… १९०५ च्या रशिया-जपान युद्धात जपानचा जय झाला आणि युरोप-आशिया ऐतिहासिक संबंधांना कलाटणी मिळाली. वंगभंगाची चळवळ सुरू झाली आणि भारतातील ब्रिटिशविरोध वाढतच गेला. १९४४-४५मध्ये नाविकांचे बंड झाले, १९४७साली भारत स्वतंत्र झाला आणि १९५० साली भारताची घटना तयार झाली. असा हा राजवाड्यांचा अलौकिक द्रष्टेपणा त्यांच्या लेखनातून जागोजागी आढळतो.’
anand47.hardikar@gmail.com
