‘चौर्‍यांयशीच्या शिलालेखा’बद्दल राजवाड्यांनी जो ३८ पानी लेख १९०६ साली ‘ग्रंथमाले’मधून प्रकाशित केला होता, त्यातल्या आणखी दोन रंजक नोंदींबद्दल थोडक्यात माहिती घेता येईल. पहिली नोंद होती, पंढरपूरच्या दुसर्‍या संभाव्य नावांबद्दलची. त्यांनी लिहिले, ‘पंढरपुराला फागनिपूर असे दुसरे एक नाव होतेसे दिसते. ‘फागनि’ हे फाल्गुनि या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे.

फाल्गुन महिन्याला हिंदीत फागन म्हणतात. फाल्गुनि हे सध्याचे पंढरपूर व गोपाळपूर यांच्यामधील ओढ्याचे अथवा नदीचे नाव असावे. त्या ओढ्याजवळ असणारे जे गांव ते फागनिपूर. परंतु हे नाव पंढरपूर ह्या नांवापेक्षा फार जुने दिसते; इतके जुने की शक ११९५मध्ये (इसवी सन १२७३ मध्ये) प्रौढ भाषेने गांवाच्या नांवाचा उच्चार करावयाचा असला म्हणजे पंढरी, पंढरपूर ह्या सापेक्षतेने आधुनिक नावांना टाकून फागुनिपूर असे जुने अतएव प्रौढ नाव उच्चारीत व लिहीत’…

आणखी एका पर्यायी नावाबद्दलचा सप्रमाण खुलासा करीत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘बाकी शक ११९५त फागनिपुराचे लौकिक व व्यावहारिक नांव ‘पंडरिगे’ होते, असे म्हणण्याला आधार आहे. विठोबाच्या देवळातील सोळखांबीच्या पुढे गणपतीच्या पुढील दोन खांबांवरील एका आडव्या शिळेवर तिन्ही बाजूंनी कोरलेला एक लेख आहे व चौर्‍यांयशीच्या शिळेच्या पाचपन्नास वर्षे पूर्वीचा आहे. त्यांत श्रीविठ्ठलाचे देऊळ ज्या गावांत आहे त्याला पंडरिगे म्हणून म्हटले आहे. म्हणजे ११९५ पूर्वीपासून ह्या गांवाचे नांव पंडरिगे होते, हे उघड आहे.

हिपरगे, कवलगे, बिळगे वगैरे कर्नाटकी ग्रामनामांप्रमाणेच हे पंडरिगे नांव कानडी आहे. त्यावरून ‘पंडरिगे विठाबाई। मला ठाव द्यावा पायीं।’ ह्या अभंगातील ‘पंडरिगे विठाबाई’ ह्या शब्दाचा अर्थ यथास्थित लागतो. ‘पंडरिगे विठाबाई’ म्हणजे पंडरिगे गांवची विठाबाई!’ राजवाड्यांनी त्या लेखात केलेली दुसरी रंजक, लक्षवेधी नोंद होती विठोबाच्या मूर्तीची विटेवरती मूळ स्थापना करणार्‍या पुंडलीकाबद्दलची. त्यांनी लिहिले, ‘ज्ञानेश्वर व हेमाद्रि यांच्याहि अगोदर पुंडलीक झाला. त्याच्या मातापित्यांची नावे शुद्ध मराठी आहेत, ती पंढरीची राहणारी होती.

चौर्‍यांयशीच्या शिलेच्या अगोदरच्या एका लेखात पुंडलीकाचे नाव व विठोबाच्या मूर्तीची विटेवरती मूळ स्थापना त्याने केल्याची कथा आलेली आहे. हा अगोदरचा शिलालेख चौर्‍यांयशीच्या शिळेपूर्वी ३०-४० वर्षे खोदला गेला होता, तेव्हा जर पुंडलीकाची गोष्ट कथारूप झाली होती, तर पुंडलीकाला लौकिकांत संतपणा प्राप्त होऊन बरीच म्हणजे पाचपन्नास, कदाचित शंभरदीडशे वर्षे झाली असली पाहिजेत.

पुंडलीक हा अर्वाचीन मराठी संत मंडळातला पहिला होय. ‘पुंडलीकवरदे हरिविठ्ठल’ हा पुंडलिकाच्या नांवाचा गजर समाराधनांतून दररोज गावगन्ना अठरापगड जातींत दुमदुमत आहे. अभंग, ओवी, आर्या, श्लोक, भूपाळी, संस्कृत शिलालेख वगैरे नाना स्थली ह्या भगवद्भक्ताचे नाव पदोपदी आढळत आहे. अशा ह्या महापुरुषाचा नेमका काल ठरविणे मात्र अगत्याचे आहे…’

anand47.hardikar@gmail.com