‘शक ११९५मध्येे (इसवी सन १२७३मध्ये) रामचंद्र यादव राज्य करीत असताना (पंढरपुरातील) विठोबाच्या देवळाची मोठी चलती होती, हे ह्या (चौर्यांयशीच्या) शिलालेखातील देणग्यांवरून स्पष्ट दिसते’, असे सांगून राजवाड्यांनी पुढे त्या मंदिरावरील व आतील मूर्तीवरील गंडांतरांचा संक्षिप्त आढावासुद्धा घेतला. त्यांनी लिहिले, ‘यादवांचे राज्य गेल्यावर पुढे शंभरदीडशे वर्षांनी यवनांनी ह्या देवळाचा आणि आंतील मूर्तीचा भंग करण्याचा प्रयत्न केला; तेव्हा अनागोंदी येथील तत्कालीन राजाने विठोबाची मूर्ति हंपीस नेली व तिची स्थापना त्या शहरीं केली, अशी एक लोकवार्ता आहे. ती खरी आहे असे हंपी येथील एका शिलालेखावरून दिसून येते…’
राजवाड्यांनी त्यानंतर तो शिलालेख जसाच्या तसा उद्धृत केला आणि पुढे लिहिले, ‘या शिलाशासनावरून असे दिसते की, शक १४३५ श्रीमुखनामसंवत्सराच्या पूर्वी (इसवी सन १५१३च्या) वर्ष दोन वर्षे पंढरपुराहून विठोबाची मूर्ति विजयनगरच्या कृष्णदेवाने आणून हंपीला स्थापन केली… पुढे यवनांची क्रूरदृष्टि किंचित कमी झाल्यावर एकनाथाचा आजा जो भानुदास त्याने हंपीहून ती मूर्ति (पंढरपुरास) परत आणिली असावी. कर्नाटकांतील इतर मोठमोठ्या क्षेत्रांतून विठोबाची देवळे फारच विरळा आढळतात. प्रख्यात असे विठोबाचे देऊळ हंपीसच तेवढे एक आहे. ते कृष्णदेवाने शक १४३५ मध्ये बांधून तेथील पूजेअर्चेची व उत्सवाची व्यवस्था लावून दिली. हंपीच्या देवळात पंढरपुराहून नेलेली विठोबाची मूर्तिच बसविली किंवा दुसरी एखादी मूर्ति बसविली, ह्याचा निर्णय भानुदासाच्या हकीकतीवरून करता येतो. हंपीच्या देवळात दुसरी एखादी मूर्ति बसविली असावी, असेच मानावे लागते…’
विठोबाच्या मूर्तीवरील नंतरच्या गंडांतरांबद्दलची माहिती देत राजवाड्यांनी लिहिले, ‘दुसरे मोठे गंडांतर शक १५८१ (इसवी सन १६५९मध्ये) अफझलखानाच्या हाते येण्याचा समय आला होता. परंतु असे सांगतात की बडव्यांनी ऐन वेळी मूर्ति पंढरपुराहून वीस मैल लांब माढे गावी नेऊन ठेविली. पुढे अफझलखानाच्या वधानंतर ती मूर्ति परत आणली व ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यास विठोबाचे स्वतंत्र देऊळ व मूर्ति स्थापण्यात आली… अफझलखानानंतर विठोबाच्या मूर्तीला तिसरे गंडांतर, अवरंगझेब पंढरपुरापासून पंधरा मैलांवर असणार्या माचनूर गावी येऊन राहिला, तेव्हा येण्याचा समय आला. त्यावेळी प्रल्हाद बडव्याने मूर्ति जवळच्याच एका गावी नेऊन बचाविली… त्यापुढे आजपर्यंत मूर्तीवर विशेष गंडांतर काही आलेले नाही…’
चौर्यांयशीच्या शिलालेखाबद्दलचे राजवाडे यांचे लेखन त्यातील दुर्मीळ अशा नम्रतेमुळेही लक्षणीय मानावे लागते. एरव्हीच्या वागण्यात बरेचसे उग्र व तापट असणार्या राजवाड्यांनी या लेखाबद्दल मात्र नरमाईची भाषा वापरली आणि म्हटले, ‘मला काही अक्षरे नीट लागली नाहीत, ती दुसर्या कोणालातरी लागतील; कित्येक स्थळी शब्दांचे मी जे अर्थ केले आहेत, त्याहून उत्तम अर्थ दुसरा कुणीतरी करील व ह्या सगळ्यांचा फायदा आणखी जुने लेख वाचण्यासाठी होईल!’
anand47.hardikar@gmail.com
