‘पानिपतच्या तिसर्‍या युद्धाच्या वेळी राष्ट्रीयत्वाची आधुनिक कल्पना हिंदुस्थानात सर्वत्र पसरली नव्हती’, हे ऐतिहासिक वास्तव राजवाड्यांना मान्य होते. ‘ती कल्पना पसरवण्याचाच तर मराठ्यांचा मुख्य प्रयत्न होता’, असे सांगून त्यांनी पुढे म्हटले, ‘महाराष्ट्रधर्माची पताका घेऊन मराठे १६४०मध्ये जे निघाले, ते तिला आस्ते आस्ते हिंदुस्थानात सर्वत्र हिंडवीत असता १७६१मध्ये त्यांच्यावर हा (पानिपतमधील पराभवाचा) घोर प्रसंग आला… महाराष्ट्रधर्मात स्वराज्यस्थापनेचा व गोब्राह्मणप्रतिपालनाचाही अंतर्भाव होतो.

त्यासाठी राष्ट्रातील लोकांची एकी झाली पाहिजे व त्या एकीचा पुढाकार घेण्यास कर्त्या लोकांनी पुढे सरसावले पाहिजे. ही गोष्ट त्यावेळच्या मराठ्यांच्या स्पष्टपणे ध्यानात आली होती… मराठ्यांखेरीज हिंदुस्थानातील इतर लोकांच्या ध्यानात ही गोष्ट अगदीच आली नव्हती असे नाही. हिंदुधर्माची स्थापना व गोब्राह्मणांचे प्रतिपालन केले पाहिजे, ही कल्पना शीख लोकांच्या व बुंदेल्यांच्या डोक्यांत अकबराच्या वेळेपासून, कदाचित त्याच्याही पूर्वी आली होती, असे म्हणण्यास आधार आहे. परंतु ही कल्पना साक्षात सिद्ध करून दाखविण्यास जी तडफ, जो निश्चय, जी (एक)जूट व जे पुढारपण लागते, त्याचे अस्तित्व या लोकांच्या ठायी होते, असे इतिहासावरून दिसत नाही. सुदैवाने या गुणांचे अस्तित्व त्या काली मराठ्यांच्या अंगी होते.’

‘मराठ्यांच्या अंगी वसणार्‍या त्या गुणसंपदेमुळे महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना सुखाचे दिवस दृष्टीस पडले. परंतु महाराष्ट्राबाहेरीला प्रांतांतील लोकांना त्या सुखाचे वाटेकरी लगेच होता आले नाही.’ राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘खरे म्हटले असता अवरंगझेबाच्या कारकिर्दीत यवनांच्या सत्तेला उतरती कळा लागली होती; तेव्हा मराठ्यांप्रमाणे हिंदुस्थानातील इतर लोकांनी उठाव करून आपल्या प्रांतात स्वराज्याची स्थापना करून धर्माचे प्रतिपालन करावयाचे. परंतु हा पराक्रम त्या लोकांच्या हातून झाला नाही… शिवाजीच्या प्रोत्साहनाने बुंदेलखंडात छत्रसालाने काही वेळ यवनांच्या विरुद्ध कंबर बांधली होती, हे खरे आहे; परंतु मराठ्यांच्याप्रमाणे टिकाव धरून बसण्याइतका चिवटपणा बुंदेल्यांच्या अंगी नसल्यामुळे स्वराज्याचे बी त्या प्रांतात जसे रुजावे, तसे रुजले नाही. महाराष्ट्राबाहेरील हिंदुस्थानातील इतर प्रांतांची ही अशी स्थिती होती.’

‘अशा लोकांना यवनांच्या कचाट्यातून सोडवून आपल्या अमलाखाली आणावे, असा महाराष्ट्रातील कर्त्या लोकांनी विचार केला. १७२०च्या पुढे मराठ्यांनी आपल्या सत्तेचे जाळे जे सर्वत्र हिंदुस्थानभर पसरवले, त्यामागे हाच मुख्य विचार होता; परंतु सोडवलेल्या प्रांतांमध्ये आपली सत्ता कायम करण्यासाठी जे उपाय योजिले पाहिजेत, ते १७२०पासून १७६०पर्यंत योजिले गेले नाहीत. खुद्द महाराष्ट्रात १६४०पासून १७०७पर्यंत स्वराज्यस्थापनेसाठी जे उपाय योजिले गेले, त्यांचा उपयोग महाराष्ट्रेतर प्रांतांत १७२०पासून १७६०पर्यंत जे मुत्सद्दी झाले, त्यांनी केला नाही…’ राजवाड्यांनी महाराष्ट्रीय नेतृत्वाच्या उणिवेवर नेमके बोट ठेवले.

अधिक स्पष्टीकरण देताना त्यांनी पुढे लिहिले, ‘स्वराज्यस्थापनेची कल्पना महाराष्ट्रातील विचारी पुरुषांच्या मनात जेव्हा प्रथम आली, तेव्हा स्वधर्मासंबंधी प्रेम व यवनांसंबंधी द्वेष महाराष्ट्रातील सामान्य जनांच्या मनात भरवून देण्याकरता कथा, पुराणे, यात्रा वगैरे संस्थांच्या द्वारे कित्येक पिढ्या प्रयत्न चालू होते. त्यामुळेच लोकमत जागृत झाले आणि सर्वांची एकजूट बनवण्याचे बिकट कृत्य साध्य होऊ शकले.

परप्रांतीय लोकांच्या मनात महाराष्ट्रधर्माविषयी प्रेम उत्पन्न करण्याकरता कोणत्याही संस्था पेशव्यांनी स्थापलेल्या दिसत नाहीत किंवा त्या कामी कोणा महापुरुषाचे साहाय्य घेतलेलेही आढळत नाही… कथा, पुराणे, यात्रा वगैरे संस्था १७व्या शतकातल्याप्रमाणे १८व्या शतकातही चालू होत्या, परंतु सतराव्या शतकातील जिवंतपणा अठराव्या शतकातील कथापुराणांत राहिला नव्हता… ग्रंथसमूहाचा, धर्मव्याख्यानांचा, साधुसंतांचा व यात्राजत्रांचा उपयोग राष्ट्रातील लोकांच्या मनाला नीट वळण देण्यास केवढा मोठा होतो, ही गोष्ट शिवाजीच्या मनात जशी बिंबली होती, तशी बाळाजी बाजीरावाच्या मनात भरलेली दिसत नाही. शिवाजी व बाळाजी यांच्यामधील महदंतर हेच होय!’ 

anand47.hardikar@gmail.com