इतिहास म्हणजे जणू सार्वजनिक कुरण. जोपर्यंत पुढील संशोधन आधीच्या मिथकांचा पर्दाफाश करत नाही, तोपर्यंत कुणीही त्या कुरणात शिरून इतिहास लिहू शकतो किंवा त्याचे पुनर्लेखन करू शकतो. आर्यांचा वंश श्रेष्ठ वंश होता आणि त्यांनी भारतावर आणि इतर देशांवर आक्रमण करून त्यांना ‘सुसंस्कृत’ केले, हे असेच एक मिथक. इंडो-आर्यन स्थलांतराच्या बरेच आधी भारताच्या अनेक भागांत भरभराटीला आलेल्या प्राचीन संस्कृती होत्या; उदा. तमिळनाडूतील कीझाडी आणि इतर ठिकाणच्या उत्खननांमधून इ.स.पू. ३५०० या काळात समृद्ध संस्कृती अस्तित्वात होती, हे स्पष्ट झाले आहे.

इतिहासाचे विकृतीकरण करणारे भरपूर

राजकारण्यांना इतिहासाची छेडछाड करायला खूप आवडते. भाजपने (आणि सरकारने) काँग्रेसवर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप करून हिवाळी अधिवेशनात दिवसभर चर्चेचा आग्रह धरला. दोन्ही पक्षांच्या वक्त्यांनी ‘इतिहासाची’आपापली आवृत्ती मांडली; तो विकृत इतिहास होता. या इतिहास-विकृतीकरणाचे प्रमुख सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते म्हणाले:

‘‘१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर, ब्रिटिश साम्राज्य अस्थिर झाले होते आणि भारतावर विविध पद्धतीने दबाव लादत होते, अन्याय करत होते. अशा वेळी बंकिमदांनी अधिक तीव्र प्रत्युत्तरातून आव्हान दिले आणि त्या अवज्ञेतूनच ‘वंदे मातरम्’ जन्माला आले… १५ ऑक्टोबर १९३७ रोजी लखनौहून मोहम्मद अली जिना यांनी ‘वंदे मातरम्’विरोधात नारा दिला. मुस्लीम लीगच्या निराधार विधानांना ठामपणे प्रत्युत्तर न देता तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली. जिना यांच्या विरोधानंतर अवघ्या पाच दिवसांनी, २० ऑक्टोबर १९३७ रोजी, नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जिना यांच्या भावनेशी सहमती दर्शवली… (नेहरू म्हणाले) ‘मी ‘वंदे मातरम्’ गीताची पार्श्वभूमी वाचली आहे. मला वाटते की ही पार्श्वभूमी मुसलमानांना चिथावणी देऊ शकते. दुर्दैवाने, २६ ऑक्टोबर १९३७ रोजी काँग्रेसने ‘वंदे मातरम्’वर तडजोड केली आणि आपल्या अधिकारात त्याचे तुकडे केले. इतिहास साक्ष आहे की काँग्रेस मुस्लीम लीगपुढे झुकला आणि पक्षाने तुष्टीकरणाचे राजकारण स्वीकारले. आयएनसी (काँग्रेस) आता एमएमसी (मुस्लीम लीगझ्रमाओवादी काँग्रेस) झाली आहे.’’

अमित शाह म्हणाले की, या राष्ट्रीय गीताच्या विभाजनामुळे तुष्टीकरणाचे राजकारण सुरू झाले आणि त्यातूनच फाळणी झाली. कल्पनाशक्तीची ही उडी अत्यंत हास्यास्पद होती.

संक्षिप्त इतिहास

१८७०चे दशक : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या गीताच्या काही कडव्यांची रचना केली; ती कडवी अप्रकाशित राहिली.

१८८१ : हे विस्तृत गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले.

१९०५ : रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रवादी निषेध मोर्चांचे नेतृत्व करताना हे गीत गायले; त्यानंतर ‘वंदे मातरम्’ राजकीय घोषणाच बनले.

१९०८ : तमिळ कवी सुब्रमण्य भारती यांनी त्यांच्या ‘एंथैयुम थायुम…’ या कवितेत ‘वंदे मातरम्’ या वाक्यांशाला अमर केले. हे गीत प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या ओठांवर होते.

१९३० चे दशक : सांप्रदायिक राजकारण वाढत होते, त्यामुळे हे गीत वादग्रस्त बनले.

२८-०९-१९३७ : राजेंद्र प्रसाद यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून या गीताला होणाऱ्या व्यापक विरोधाबद्दल चिंता व्यक्त केली आणि काँग्रेसचे धोरण निश्चित केले जावे असे सुचवले. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला, नेताजी बोस यांनी टागोर यांचा सल्ला घेतला.

१७-१०-१९३७ : नेताजी बोस यांनी जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहून काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये या गीतावर चर्चा करण्याची विनंती केली.

२०-१०-१९३७ : नेहरूंनी बोस यांना पत्र लिहिले की, हा वाद जातीयवाद्यांनी निर्माण केला आहे आणि ते या विषयावर टागोर व इतरांशी चर्चा करतील.

२६-१०-१९३७ : टागोर यांनी नेहरूंना पत्र लिहिले की, गीताचा पहिला भाग स्वत:च परिपूर्ण, प्रेरणादायी गुण आहे. जो कोणत्याही धार्मिक समुदायासाठी आक्षेपार्ह नाही.

२८-१०-१९३७ : काँग्रेस कार्यकारिणी समितीने कवितेची पहिली दोन कडवी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली.

जानेवारी १९३९ : महात्मा गांधींच्या उपस्थितीत वर्ध्यात झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणी समितीने हा ठराव पुन्हा एकदा निश्चित केला.

राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रगीतासाठी काही निवडक कडव्यांची निवड करणे यात काहीच वेगळे वा चुकीचे नाही. ‘जन गण मन’, हे आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांच्या दीर्घ कवितेची संक्षिप्त आवृत्ती आहे. अनेक देशांची राष्ट्रगीते ही दीर्घ गीतांची संक्षिप्त रूपेच आहेत.

मोदी यांनी जाणीवपूर्वक हा तपशील टाळला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या पूर्वसुरींचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात किंवा ‘वंदे मातरम्’ हे गीत गाण्यात, ते लोकप्रिय करण्यात सहभाग नव्हता. खरे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या राष्ट्रीय मुख्यालयात ५२ वर्षे राष्ट्रध्वजही फडकावला नव्हता.

चुकीची प्राधान्ये

‘वंदे मातरम्’या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गायली जात आहेत, यावर १९३७ पासून कोणताही वाद नव्हता. मग आत्ताच तो का निर्माण केला जात आहे? संसद आणि सरकारांनी जनतेच्या तातडीच्या प्रश्नांवर आणि देशाच्या भविष्यकालीन महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करायला हवे.

चीनमधील घटनात्मक संस्था रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, अवकाश, महासागर आणि डेटा यांच्या आव्हानांवर चर्चा करतात. याच गोष्टी उद्याचे जीवन बदलणार आहेत. आपल्या संसदेने वर्तमानातील दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, वस्तू व सेवांचे उत्पादन आणि सर्वांसाठी उपलब्धता, आर्थिक स्थैर्य, व्यापार तूट, हवामान बदल आणि इतर प्रश्नांचा विचार करायला हवा. वाढती विषमता, लोकसंख्या, अंतर्गत स्थलांतर, धर्मनिरपेक्षता, विज्ञान व तंत्रज्ञान आणि इतर अनेक प्रश्न उद्यासाठी आपल्यासमोर आहेत.

इतिहासाचे विकृतीकरण वाईट आहेच; पण भविष्याविषयीची ही तुच्छताही अक्षम्य आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

@Pchidambaram_IN