आजार असाध्यच असल्यास उर्वरित आयुष्याचा ‘दर्जा’ हा आयुष्याच्या लांबीपेक्षा महत्त्वाचा आहे याचं भान हवं..

डॉ. जयदेव पंचवाघ

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

जीवनात वैद्यकीय शास्त्राचं स्थान नेमकं काय असावं, त्याकडून असलेल्या अपेक्षा कुठपर्यंत ताणल्या जाव्यात, याचा विचार प्रत्येक व्यक्तीनं निदान स्वत:पुरता तरी करणं आवश्यक असल्याचं मला वारंवार वाटतं. आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा इतिहास जर तपासला, तर ते मानवी इतिहासाच्या मानानं इतकं नवजात आहे की काळाच्या तुलनेत बघायला गेल्यास, त्याचा जन्मसुद्धा धड झाला आहे की नाही, असा प्रश्न पडावा. पृथ्वीवर मनुष्यप्राणी साधारण दोन लाख वर्षे अस्तित्वात आहे. डायबेटिस नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक असलेलं इन्सुलिन १९२१ साली, फ्रेडरिक बॅटिंग, चार्ल्स बेस्ट आणि जॉन मॅकलेड या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम तयार केलं. याचा वैद्यकीय वापर १९२३ सालानंतर सुरू झाला. इन्सुलिननिर्मितीच्या पद्धतीत त्यानंतर हळूहळू सुधारणा होत गेली. त्याहीआधी डायबेटिसमुळे अनेक लोक अपंग होत. अनेकांना अकाली मृत्यू येई.  भारतीयांच्याच नव्हे तर सर्व जगाच्या लाडक्या असणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं शरीर डायबेटिसनं पोखरून निघालं होतं. ती घटना फार पूर्वीची नाही. १९०२ साली वयाच्या ३९व्या वर्षी ते गेले; त्याही वेळी मधुमेहावर अ‍ॅलोपॅथीमध्ये चांगले उपचार नव्हते. संसर्गजन्य रोगांबाबत बोलायचं झालं तर ‘पेनिसिलिन’ या प्रतिजैविकाचा (अँटिबायोटिकचा) शोध १९२८ साली अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आणि १९४४ सालानंतर त्याचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू झालं. या घटनेच्या आधी चांगल्या दर्जाचं अँटिबायोटिक उपलब्ध नव्हतं. गेल्या केवळ पन्नास वर्षांत नवनवीन अँटिबायोटिक तयार झालेली आहेत. इन्सुलिन व अँटिबायोटिक यांचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे, याच दोन प्रकारच्या औषधांमुळे पन्नासेक वर्षांत माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. शस्त्रक्रियांसारख्या उपाययोजना शक्य झाल्या आहेत.

जन्म, व्याधी, मृत्यू इत्यादी निसर्गाच्या कालचक्रातील घटना आहेत. त्यातील जरा, व्याधी व मृत्यू यांचा स्वीकार निसर्गाचा भाग म्हणून करण्याची वृत्ती अनेक वर्ष आपल्यात बाणली गेली होती, याचा विसर मानवाला झपाटय़ानं पडत चाललेला रोजच मला दिसतो. याचा अर्थ असा नाही की, आधुनिक वैद्यकशास्त्राचा उपयोग आपण करू नये. एवढंच वाटतं की, विविध व्याधींवर काही प्रमाणात आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत उपाय करण्याचं ते फक्त एक साधन आहे, याचं कुठे तरी भान राखलं जावं. वैद्यकीय शास्त्राकडून विशिष्ट अपेक्षा ठेवण्याची एक समंजस आणि सुसंस्कृत भूमिका असावी. या संदर्भात रोजच विविध प्रकारचे अनुभव येत असतात; पण काही घटना स्मृतीत खोलवर रुतून बसलेल्या राहतात. दोन-एक वर्षांपूर्वीची गोष्ट. इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये माझ्या एका रुग्णाला बघण्यासाठी मी माझ्या सहकारी डॉक्टरबरोबर चाललो होतो. तेवढय़ात, शेजारच्या एका रुग्णाच्या मुलाचं जोरजोरात बोलणं ऐकू आलं म्हणून थांबलो. नेमकं काय झालं असं विचारलं- त्या मुलाचं वय साधारण ५५ वर्ष. हा अमेरिकेतून आला होता. वडील वय ८९ वर्षे, तीन आठवडय़ांपासून अ‍ॅडमिट होते. त्यांना मेंदूचा गंभीर आजार झाला होता आणि त्यावर ‘शर्थीचे’ उपाय चालले होते. रोज निरनिराळय़ा डॉक्टरांचं मत त्यांचा हा अमेरिकेहून आलेला मुलगा घेत होता. एका डॉक्टरांचं मत दुसऱ्यांकडून प्रमाणित करून घेत होता. सर्व प्रकारचे उपचार करून थकले होते. एवढे करूनही वडील कसे बरे होत नाहीत, म्हणून तो तिथल्या डॉक्टरांशी वाद घालत होता. परिस्थिती एका बाजूनं गंभीर तर दुसऱ्या बाजूनं विनोदी आहे असं मला वाटलं. ज्या व्यक्तीनं ८९ वर्षे आयुष्य उपभोगलं आहे, तिला तिच्या अंत:काळात विविध नळय़ा घालून व कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन बळजबरीनं जिवंत ठेवण्यातला अर्थ मला कळण्याबाहेरचा होता. ‘वडील बरे कसे होत नाहीत’ म्हणून डॉक्टरांशी भांडणं ही तर त्यावरची कडी होती.

ही घटना एखाद्याच्या विक्षिप्तपणाचा भाग म्हणून सोडून देण्यासारखी नाही, कारण अगदी अशाच नाही, तरी तत्सम घटना वारंवार घडताना दिसतात. मेंदूच्या आजारांच्या शाखेत खऱ्या अर्थानं बरे न होऊ शकणारे आजार वारंवार दिसतात. अपघातात गंभीररीत्या मेंदूला मार लागलेले, मणक्याला इजा होऊन कायमचेच पांगळे झालेले रुग्ण, मेंदूतील कॅन्सरच्या पसरलेल्या गाठी, मेंदूचा रक्तपुरवठा बंद झालेले रुग्ण अशी असंख्य उदाहरणे आहेत. शिवाय शर्थीनं प्रयत्न करूनसुद्धा एखाद्या केसमधली गुंतागुंत वाढत जाणं आणि परिस्थिती हाताबाहेरची होणं अशा घटना सर्वच देशांत घडू शकतात व घडतही आहेत. उपचार करणारा व करून घेणारा, दोघंही माणसंच असतात. एक यंत्र- दुसरा मनुष्य किंवा एक देव- दुसरा मनुष्य अशी स्थिती असती, तर गोष्ट वेगळी झाली असती. या सर्व गोष्टींचं भान उपचार करणारा डॉक्टर, ते करून घेणारा रुग्ण, त्याचे नातेवाईक या सर्वानीच ठेवणं गरजेचं आहे.

आणखी एक गोष्ट सर्वच डॉक्टर व रुग्णांनी लक्षात ठेवणं गरजेचं वाटतं. अ‍ॅलोपथी हे वैद्यकशास्त्र प्रत्येक माणसाची रचना व अवयवांचं कार्य हे सर्वसाधारणपणे समानच असते असं गृहीत धरतं किंवा ते गृहीत धरतं असं आपण धरून चाललेलो असतो. यासाठी एक उदाहरण घेऊ- समजा दोन व्यक्ती एकाच वेळी, एकाच प्रकारची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. या दोन व्यक्तींचं वय, लिंग व वजनसुद्धा अगदी समानच आहे असंही समजून चालू. आता जरी आपल्या सर्वाना असं वाटत असलं की डॉक्टरच शस्त्रक्रियेतल्या सर्व घटना नियंत्रित करत असतो, तरी ते खरं नाही. कारण, शस्त्रक्रिया सुरू असताना लागणारी रक्त गोठण्याची क्रिया, शरीर उघडल्यावर त्यात अपरिहार्यपणे आत शिरणाऱ्या जंतूंना मारणारी रोगप्रतिकारकशक्ती, जखम भरून अवयव परत जुळून येण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी खरं तर शरीर स्वत: करत असतं. या शरीरातल्या अंतर्गत क्षमता आहेत. मुख्य म्हणजे या क्षमता दोन व्यक्तींत मोठय़ा प्रमाणात विभिन्न असू शकतात, अगदी त्यांच्या ‘ब्लड टेस्ट’चे रिझल्ट सारखे असले तरी! आता उदाहरणातल्या दोन व्यक्तींकडे वळू. शस्त्रक्रियेआधी रोगप्रतिकारकशक्तीचं द्योतक असलेली चाचणी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण. हे प्रमाण (डब्लूबीसी काऊंट) जरी या दोघांत सारखं असलं, तरी प्रत्यक्ष जंतूंच्या प्रादुर्भावाशी लढण्याची या पेशींची क्षमता पूर्णत: वेगळी असू शकते. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखम भरून येण्याची क्षमतासुद्धा दोन व्यक्तींमध्ये विभिन्न असते. काहींमध्ये जखम लवकर भरत नाही तर काहींमध्ये जखम वेगाने भरून जाडसर व्रण तयार होऊ शकतो. याला ‘किलॉईड’ असं म्हणतात. शरीरावर शस्त्रक्रिया केल्यावर स्रवणारी संप्रेरकं वा इतरही अनेक गोष्टी या व्यक्तीगणिक वेगळय़ा असू शकतात. आणि हे सर्व वय, लिंग, वजन वा इतर वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी समान असलेल्या व्यक्तींमध्ये घडतं. प्रत्यक्षात तर अगदी ढोबळमानानंही दोन व्यक्तींत फरक असतो. व्यक्तीच्या यकृताची एखाद्या औषधाची चयापचय करण्याची क्षमता, व्यक्तीला डायबेटिस असणं किंवा नसणं, एखाद्या औषधाची अ‍ॅलर्जी असणं/नसणं या गोष्टी व्यक्तीगणिक निरनिराळय़ा असतात. आणि म्हणूनच शस्त्रक्रियेतला किंवा इतर उपचारांना एखाद्याचं शरीर कसा प्रतिसाद देतं हे अगणित घटकांवर अवलंबून असतं. हे प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीररचनेतल्या (‘कॉन्स्टिटय़ूशन’मधल्या) फरकावर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं वय वाढताना त्याच्या शरीरात होणारे बदल किती वेगानं होतात ते त्या व्यक्तीच्या जनुकीय गुणधर्मावर ठरतं, हेसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अ‍ॅलोपथीचे शास्त्र सर्वसाधारणपणे हे फरक निश्चितपणे सांगू शकत नाही, ही गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

 विशेषत: वयस्कर व्यक्तींवर उपचार चालू असताना किंवा अत्यंत दुर्धर आजार असताना, त्या व्यक्तीच्या उर्वरित आयुष्याचा ‘दर्जा’ हा आयुष्याच्या लांबीपेक्षा महत्त्वाचा आहे याचं भान असणं महत्त्वाचं आहे असं आवर्जून नमूद करावंसं वाटतं.