भारतीय संगीताच्या इतिहासात प्रबंध गायकीनंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या ध्रुपद गायन शैलीचा उगम त्यातील वेगवेगळय़ा पद्धतींमुळे झाला. आताच्या ख्याल संगीतात ज्याला घराणे म्हणतात, त्याच प्रकारच्या शैली ध्रुपद गायनात ‘बानी’ म्हणून ओळखले जात. गौहरबानी, डागरबानी, खंडहरबानी, नौहरबानी यांसारख्या बानी म्हणजेच त्या काळातील घराणे. या प्रत्येक बानीचे वेगळेपण संगीताच्या सादरीकरणात होते. उदाहरणार्थ गौहरबानीमध्ये स्वरांचे महत्त्व, मींड, भावनांचा विचार अधिक, तर खंडहरबानीमध्ये जोरकस पण तरीही अतिशय अलंकृत गमकेला प्राधान्य. उस्ताद अली झाकी हदर या कलेच्या प्रांगणातील ऐन जवानीत असलेल्या रुद्रवीणा वादकाचा अकाली मृत्यू म्हणूनच अतिशय दु:खद. मुळात रुद्रवीणा वादनाचा काळाच्या सरत्या पटलावर असलेला प्रभाव कमी कमी होत चालला असतानाही, त्याच वाद्यावर प्रभुत्व मिळवून लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार न होता, उलट दिशेने प्रवास करणे कलावंत म्हणून फार मोठे आव्हान स्वीकारण्यासारखे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अली झाकी हदर यांनी ते स्वीकारले. कारण त्यांचे काका असद अली खान हे प्रसिद्ध रुद्रवीणावादक होते. खंडहरबानी या शैलीत त्यांचे वादन अतिशय झोकदार आणि आकर्षक असे. त्यांच्याकडून या वाद्याचे शिक्षण घेत असताना अली झाकी यांना या वाद्यात गोडी वाटू लाागली खरी; परंतु ते ३८ वर्षांचे असतानाच असद अली खान यांचे निधन झाले. इतक्या लहान वयात एका अर्थाने पोरके झालेले अली झाकी हदर यांनी आपल्या वादनावर लक्ष केंद्रित केले, परंतु काळाचे फासे त्यांच्या बाजूने पडत नव्हते. काकांना सरकारने दिलेल्या घरात बराच काळ राहून, सरकारदरबारी या वाद्याचे महत्त्व ते पटवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे असद अली खान यांचे घर त्यांना सोडावे लागले. अशा हलाखीत परंपरेने जमा होत गेलेल्या अनेक मौल्यवान चीजवस्तूंची विक्री करण्यावाचून त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. मुळात स्वातंत्र्यानंतरच्या काळात अभिजात संगीताची हळूहळू परवड होऊ लागली. त्याआधी संगीताला मिळत असलेला आश्रय हळूहळू आटत चालला आणि हे संगीत लोकाश्रयावर विसंबून राहू लागले. त्यातही रुद्रवीणेसारख्या वाद्याचे महत्त्व सारंगीसारख्या वाद्याप्रमाणेच कमी होऊ लागले. अशाही परिस्थितीत हेच वाद्य झंकारत ठेवणे हे कर्मकठीण होऊ लागले. त्यामुळे उस्ताद अली झाकी हदर यांच्यासारख्या कलावंतावर नव्याने रुजत चाललेल्या अभिरुचीमुळे कला टिकवून ठेवण्याची जबाबदारी अधिकच वाढली. संगीत ही विक्रीयोग्य वस्तू बनत गेल्याने लोकप्रिय संगीताची चलती सुरू झाली. अभिजात संगीताच्या प्रांतात हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढय़ाच कलावंतांचे जगणे सुसह्य झाले. अनेकांना आपली कलात्मकता आणि त्यातील सर्जनाची आस टिकवून ठेवणेही अवघड बनत चालले आहे. नव्याने अभिजात संगीतच करू इच्छिणाऱ्या युवकांना अभिजाततेबरोबरच उपयोजित संगीताला शरण जावे लागत आहे. अशा वेळी ऐन पन्नाशीत अली झाकी हदर यांचे निधन या संगीतासमोरील प्रश्न अधिक गहिरे करणारे आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of indian music after singing popular ali zaki hadar ysh
First published on: 13-09-2023 at 00:05 IST