बाळाजी बाजीरावाने ‘महाराष्ट्र धर्माचा प्रसार व ब्राह्मणपद बादशाहीची स्थापना करण्यासाठी’ महाराष्ट्राबाहेर काय काय आणि केव्हा केव्हा खटपटी केल्या, याचे विवेचन केल्यानंतर राजवाड्यांनी त्या पेशव्याच्या खुद्द महाराष्ट्रातील खटपटीचा साक्षेपी आढावा घेतला. त्यांनी लिहिले, ‘बाळाजी बाजीरावाने पेशवाईची वस्त्रे १७४० मध्ये घेतली. ती त्याला महत्प्रयासाने प्राप्त झाली; कारण रघोजी भोसल्याने बाबूजी नाईक बारामतीकराला पेशवाई देववण्याचा घाट घातला होता, परंतु महादोबा पुरंधरे व गोविंदराव चिटणीस यांच्या मदतीने बाळाजीने कशी तरी पेशवाई मिळवली.

या वेळी जो त्रास झाला, त्याचा सूड बाळाजीने अंत:स्थ रीतीने उगवून घेतला. इहिदे आर्वैन रौद्री नामसंवत्सरी म्हणजे इ.स. १७४० मध्येच कोल्हापूरचे संभाजी महाराज सातारला आले असता त्यांच्याशी बाळाजी बाजीरावाने एक गुप्त करार केला. त्यात कलम होते, ‘शाहूमहाराज यांचा जीवात्मा आहे, तो बाह्यात्कारी त्यांचे सेवक, अंतर्यामी स्वामींचे. शाहूमहाराजांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्यांवर स्वामींची (सत्ता) आणि आम्ही सेवक स्वामींचे…’

असा गुप्त करार करण्यामागे बाळाजी बाजीरावाचा सातारच्या तत्कालीन शाहू महाराजांवर सूड उगवण्याचाच केवळ हेतू नव्हता; त्यामागे वेगळीच कल्पना होती. ती स्पष्ट करताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘कोल्हापूरची व सातारची गादी एक करावी व सर्व सत्ता आपल्या हाती ठेवावी, हा बाळाजीच्या मनातील दुहेरी हेतू होता. ही एकी करण्याची कल्पना शाहूराजाच्या डोक्यात शिरली नाही, त्यामुळे त्याने ‘करवीरचे न करने’ म्हणून बाळाजीला आज्ञा केली. हा हेतू साध्य झाला असता, तर मराठ्यांचे राज्य एकछत्री झाले असते, अशी बाळाजीची योजना होती. परंतु शाहूच्या हट्टामुळे व अज्ञानामुळे बाळाजीला हा आपला फारा दिवसांचा हेतू एकीकडे ठेवावा लागला व शाहूच्या आज्ञा त्या वेळेपुरत्या तरी शिरसा मान्य कराव्या लागल्या. त्या आज्ञा मान्य करण्यात बाळाजीचे अतोनात नुकसान झाले.

दोन्ही राज्ये एक होण्याची आयती संधी येत होती, ती गेली ती गेलीच; परंतु स्वत:ची सत्ता कायम राखण्यासाठी त्याला नंतर खूप धडपड करावी लागली.’  बाळाजी बाजीरावाला करावी लागलेली ती धडपड म्हणजे अंतर्गत सत्तासंघर्ष. त्यामध्ये शाहूंशी त्याचे असणारे वितुष्ट जसे सामावलेले होते, तशाच शाहूंच्या मृत्यूनंतर गादीवर बसवलेल्या रामराजांच्या संदर्भातील हालचालीदेखील होत्या. त्या चढाओढीचा तीन पानांमध्ये अगदी संक्षेपाने आढावा घेतल्यानंतर राजवाड्यांनी आपली मते नोंदवली.

 ‘महाराष्ट्रात अव्वल प्रतीचे घराणे म्हटले म्हणजे सातारच्या छत्रपतींचे. त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी बाळाजीने बर्‍याच खटापटी केल्या… १७५०पासून १७६१पर्यंत परराष्ट्रांशी केलेल्या तहांतही सातारच्या छत्रपतींचे नाव आढळत नाही. जेथे तेथे बाळाजी बाजीरावाचेच नाव प्रमुखलेले दिसते… रामराजा ताराबाईच्या मुठीत राहून बाळाजीच्या धडपडीकडे उदासीनपणे पाहत होता. त्याच्या नैसर्गिक कर्तृत्वहीनतेमुळे त्याला हे औदासीन्य पत्करावे लागले. रामराजा खुळा आहे, अशी इतर लोकांप्रमाणे बाळाजीचीही खात्री झाली होती. त्याच्याविषयी कोणाच्याच मनात आदरबुद्धी नव्हती. गयाळ (=वेडा, मूर्ख) म्हणून ताराबाई त्याचा द्वेष करी. कर्तृत्वहीन म्हणून सरदारांचे त्यांच्या ठिकाणी प्रेम नसे आणि प्रतिस्पर्धी म्हणून कोल्हापूरकर त्याचा मत्सर करी. एवंच, रामराजा कोणालाच हवा असे वाटत नव्हते. (त्यामुळेच) शाहूराजाच्या इच्छेनुसार बाळाजीने रामराजाला यद्यपि मान्य केले होते, तथापि त्याचा शिक्का चालवण्यात तो धरसोड करीत होता.’

ही सर्व लहानमोठी निरीक्षणे विविध पत्रांचे दाखले देत राजवाड्यांनी नोंदवली आणि पुढे स्पष्ट लिहिले की, ‘सामान्य नीतीच्या दृष्टीने पाहता त्या दुर्बल छत्रपतीचे महत्त्व बाळाजीने संपुष्टात आणले, हे बरेच गर्हणीय (घृणास्पद) आहे; परंतु बुद्धीने व शक्तीने बलिष्ठ अशा पुरुषाच्या किंवा पुरुषांच्या हातांत कोणत्याही राष्ट्राची सूत्रे असणे केव्हाही मोठे हितकर असते, या राजनीतीच्या धोरणाने बाळाजी बाजीरावाच्या प्रयत्नांचा विचार केल्यास झाले ते योग्यच झाले. बाहेर मेहनत करून त्याने बहुतेक हिंदुस्थान व बहुतेक सर्व दक्षिण जिंकून टाकली व आत मेहनत करून सातारचे छत्रपती व त्यांचे राजमंडळ बहुतेक संपुष्टात आणून आपले वर्चस्व सर्वत्र प्रस्थापित केले!’

anand47.hardikar@gmail.com