मणक्यात एखादी गाठ येऊन पाठदुखी सुरू होते, तेव्हा आधी बाकीचे सगळे उपाय करून बघितले जातात. खरे तर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध असलेले योग्य उपचार वेळेत केले तर पुढचे अनेक धोके टाळता येऊ शकतात.

डॉ. जयदेव पंचवाघ

special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
It was seen in paris how a public toilet is being cleaned automatically
VIDEO: पॅरिसमध्ये अशाप्रकारे होते सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता; ‘हे’ खास तंत्रज्ञान आपल्याकडे कधी येणार?
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४

श्रीरंग इनामदार साधारण दोन वर्षांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये येऊन मला भेटला. त्याआधीची दोन वर्षे पाठदुखीने तो त्रस्त होता. जवळच्या डॉक्टरांना त्याने दाखवलं होतं आणि त्याच्या पाठीचा एमआरआयसुद्धा एका वर्षांपूर्वी झालेला होता. पाठीच्या कण्याच्या आत मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) जाण्यासाठी जी पोकळी असते (स्पायनल कॅनॉल) त्या पोकळीत एक साधारण बोराच्या आकाराची गाठ असल्याचं निदान खरं तर त्याच वेळी झालेलं होतं. श्रीरंगला ते निदान व्यवस्थित माहीत होतं. ही गाठ साध्या प्रकाराची असली तरीही ती हळूहळू वाढत जात आहे हेसुद्धा त्याला माहीत होतं. विविध डॉक्टरांकडे त्याचं फिरणं झालेलं होतं. ही गाठ मज्जारज्जूवर दाब आणते आहे आणि वेळेत काढून टाकण्याची गरज आहे हे त्याला सांगण्यात आलं होतं. अर्थातच इतर काही डॉक्टरांनी दुसरे काही उपाय करून बघू, अशा गाठी ‘आपोआप’ वेगवेगळय़ा ‘औषधांनी’, ‘लेपांनी’ बऱ्या झालेल्या आम्ही बघितले आहे, वगैरे गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानुसार त्याचे विविध प्रकारचे उपाय करून झाले होते.

‘मणक्याची शस्त्रक्रिया फार गंभीर किंवा जोखमीची असते’ असा विचार त्याच्या मनात घर करून बसलेला होता. त्या विचाराला आजूबाजूच्या आणि ओळखीपाळखीच्या लोकांनी खतपाणी घातलं होतं. त्यानंतरच्या दोन वर्षांत श्रीरंगची पाठदुखी हळूहळू वाढत गेलेली होती आणि मला भेटण्याच्या आधी दोन ते तीन महिन्यांपासून चालताना तोल जाणे, पाय लपकणे अशा प्रकारचे त्रास त्याला सुरू झाले होते.

खरं तर एमआरआयच्या तपासणीवरून श्रीरंगच्या स्पायनल कॉर्डवर दाब आणणारी ही गाठ ‘न्यूरोफायब्रोमा किंवा श्वानोमा’ या जातीची होती. या गाठी स्पायनल कॅनॉलच्या आत हळूहळू वाढत जातात. या मुळात कॅन्सरच्या नसतात. त्या आकाराने अगदी लहान असतात, त्या वेळेला कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत. मात्र स्पायनल कॅनॉलचा आकार मुळातच अतिशय छोटा असल्याने गाठ वाढत जाईल तसा स्पायनल कॉर्डवर येणारा दाब हळूहळू वाढत जातो. या वाढत जाणाऱ्या गाठीचा दाब स्पायनल कॅनॉलमध्ये वाढत जाऊन पाठदुखी सुरू होऊ शकते. स्पायनल कॉर्डवरचा दाब जसा वाढत जाईल तसं त्यातून हातापायाकडे जाणारे आणि तिकडून मेंदूकडे उलट पाठवले गेलेले संदेश गडबडायला लागतात.

अशा वेळी हातापायामधली शक्ती कमी होणं, मुंग्या येणं, बधिरपणा येणं, जडपणा येणं आणि चालताना तोल जाणं अशी लक्षणं दिसायला लागतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, ती म्हणजे ही लक्षणं सुरू होतात तेव्हा गाठीचा आकार आधीच बऱ्यापैकी वाढलेला असतो. वर नमूद केल्याप्रमाणे गाठ लहान असताना काहीच लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे लक्षणं सुरू होतात तो आजाराचा ‘सुरुवातीचा काळ’.. असं समजणं धोक्याचं असतं.

स्पायनल कॉर्ड (मज्जारज्जू) ही आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची संदेशवाहक केबल असते. ‘बिझीएस्ट स्विच बोर्ड ऑफ द नेचर’ अशा शब्दांत जुन्या काळातील एका प्रसिद्ध न्यूरोसर्जनने तिचं वर्णन करून ठेवलं आहे. या केबलवर दाब वाढत गेला तर त्यातून होणारं संदेशवहन गडबडतं आणि ते ओळखून योग्य वेळी उपचार झाले नाहीत तर त्यातील काही पेशी कायमच्याच नाहीशा होतात. दाब आणखी वाढत गेला तर हळूहळू व्यक्ती खुर्ची पकडते आणि नंतर अंथरूण.

 श्रीरंगच्या पाठीचं दुखणं तीव्र तर होतंच, शिवाय त्या दुखण्याने रात्री-अपरात्री त्याला जाग येत असे. दुखणं पाठीपासून सुरू होऊन दोन्ही बरगडय़ांमध्ये पसरायचं. क्वचित प्रसंगी उभा असताना दोन्ही पायांत करंट आल्यासारखी संवेदना व्हायची. पाठदुखीच्या निदानातले जे ‘रेड फ्लॅग’ समजले जातात त्यातले बरेच गेली दोन वर्ष एक एक करत वाढत चालले होते.

अशा पाठदुखीचं योग्य निदान न करताच औषध देणं आणि घेणं हे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. असं म्हटलं जातं की, एखाद्या आजाराचं अचूक कारण शोधणं हे त्या आजारावर ७० टक्के विजय मिळवण्यासारखं असतं. पाठदुखीची असंख्य कारणं असली तरी त्यातली काही अगदी साधी असतात, तर काही गंभीर स्वरूपाची. याबाबतीत अगदी अचूक असे नियम जरी सांगता येत नसले तरी वारंवार होणारी, अनेक दिवस त्रस्त करून सोडणारी, झोपेतून जागं करणारी, दैनंदिन जीवनाच्या आड येणारी पाठदुखी गंभीर असू शकते. पाठदुखीबरोबर दुखणं किंवा मुंग्या इतरत्र पसरत असतील म्हणजे हातात, पायात किंवा बरगडय़ांमध्ये.. तरीसुद्धा तिच्याकडे विशेष लक्ष देणं इष्ट. ज्या पाठदुखीबरोबर ताप येतो किंवा हातातली किंवा पायातली शक्ती कमी होते, चालताना तोल जाऊ लागतो अशा प्रकारची पाठदुखी किंवा ज्या व्यक्तींना पूर्वी टीबी किंवा कॅन्सर होऊन गेलेला आहे त्यांच्यामध्ये दिसणारी पाठदुखी गंभीर असू शकते.

श्रीरंग इनामदारची मणक्यातील गाठ ही कॅनॉलच्या आत, पण स्पायनल कॉर्डच्या बाहेर होती. अशा गाठी आज उत्कृष्ट न्यूरो मायक्रोस्कोपच्या साहाय्याने पूर्णत: काढता येऊ शकतात. गरज पडल्यास शस्त्रक्रिया सुरू असताना वापरण्यात येणाऱ्या न्यूरो मॉनिटिरग आणि अल्ट्रासोनिक तरंगांनी गाठीच्या पेशी काढता येऊ शकणारं ‘क्युसा’ हे तंत्रज्ञान अशा गाठी काढणं सुलभ करतं. म्हणूनच सर्वसाधारणपणे अशा प्रकारची गाठ योग्य रीतीने आणि योग्य वेळेत (फार लक्षणं सुरू होण्याआधी) काढली तर शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी चालूही शकतो.

 मेंदू किंवा मणक्याच्या अशा शस्त्रक्रियेमध्ये थोडय़ा प्रमाणात धोका असतो, हे शाळेतलं मूलही सांगेल. पण शस्त्रक्रिया न करण्यात १०० टक्के धोका असतो, नव्हे धोक्याची खात्रीच असते, हे मात्र ‘धोका धोका’ म्हणून सांगणारे लोक सोयीस्कररीत्या विसरतात. श्रीरंग इनामदारची गाठ आम्ही न्यूरोसर्जरीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता काढली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी त्याला त्याचा हात धरून हॉस्पिटलच्या आवारात चालवलं. इतके दिवस कानावर आलेल्या गोष्टी आणि मनात बसलेली भीती ही किती चुकीची होती याचा अनुभव प्रत्यक्षच त्याला येत होता.

मणक्यातील गाठी या वेगवेगळय़ा प्रकारच्या असू शकतात. काही गाठी या मज्जारज्जूच्या म्हणजेच स्पायनल कॉर्डच्या आतूनच सुरू होतात तर काही गाठी स्पायनल कॉर्डच्या बाहेर वाढतात. आणि तिच्यावर दाब आणून हळूहळू हातापायाचा पॅरालिसिस घडवून आणतात. मणक्याच्या हाडांपासूनदेखील गाठी तयार होऊ शकतात आणि दाब आणू शकतात. यातल्या सगळय़ाच गाठी साध्या असतात, असे नाही. काही गाठी कॅन्सरच्याही असू शकतात. पण त्यांची लक्षणं लक्षात ठेवली, निदान लवकर झालं आणि योग्य उपचार वेळेत मिळाले तर बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात, हे सर्वानी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

मणक्याच्या गाठी काढण्याचं शास्त्र आणि तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यात झपाटय़ाने सुधारणा झाल्या आहेत. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण गेल्या दहा वर्षांत खूपच वाढत गेलं आहे. हा लेख लिहिण्यामागचं कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांत स्पायनल टय़ुमरच्या जेवढय़ा शस्त्रक्रिया आम्ही केल्या, त्यातल्या जवळ जवळ ७० टक्के लोकांना निदान किमान एक वर्ष आधीपासून त्रास होत होता. त्यांना त्यांच्या आजाराबद्दल माहीत होतं आणि वर्षभराच्या काळात त्यांच्या त्रासामध्ये वाढ होत गेली होती.

या विषयातलं काहीच न कळणारे लोक वेगवेगळी कारणं सांगून या लोकांच्या मनातला भयगंड का वाढीला लावतात, हे मला माहीत नाही. त्याचबरोबर साधे वाटणारे आणि वेगवेगळय़ा ‘पॅथी’चे उपाय करून तर बघा, असं आत्मविश्वासाने यांना का सांगितलं जातं हेही माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. पण आजच्या युगात ज्या गोष्टी वेळेत केल्यामुळे गंभीर पॅरॅलिसिस टाळता येऊ शकतो, त्या गोष्टी चुकीच्या मार्गदर्शनामुळे टाळल्या जाऊ नयेत असं कळकळीनं सांगावंसं वाटतं.

 (मेंदू व मणक्याचे आजार, नवीन संशोधन, भविष्यातील शक्यता या विषयांसंबंधी लोकशिक्षण करणारे व्हिडीओ ‘Dr Jaydev Panchwagh’ या यूटय़ूब चॅनलवर दर आठवडय़ाला विनामूल्य प्रसारित केले जातात.)