पानिपतच्या लढाईच्या परिणामांची चर्चा करताना राजवाड्यांनी थोड्याशा विस्ताराने लिहिलेला आणखी एक मुद्दा म्हणजे इंग्रजांबरोबर सुरू झालेली स्पर्धा. त्यांनी लिहिले, ‘बंगाल्यात व मद्रासेत इंग्रजांची सत्ता कायमची स्थापिली गेली. १७६१च्या पुढे हिंदुस्थानची पातशाही मिळविण्याची चढाओढ इंग्रज व मराठे यांच्यामध्ये लागली. तिची आस्ते आस्ते वाढ पुढे १७९६पर्यंत होत होती… नाना फडणिसाच्या शहाणपणाने इतर संस्थानांप्रमाणे मराठ्यांना इंग्रजांनी गिळले नाही, इतकेच काय ते श्रेय नानाच्या मुत्सद्देगिरीला देता येते. परंतु इंग्रजांची संस्कृती मराठ्यांच्या संस्कृतीहून श्रेष्ठ होती, ही गोष्ट लक्षात आणिली असता एवढेदेखील श्रेय मिळवणे म्हणजे मोठीच कर्तबगारी करणे होय, असे नि:पक्षपाताने कबूल करणे भाग पडते…’

राजवाडे यांच्या या विवेचनाशी त्यांच्या या प्रस्तावनेमधल्याच महाराष्ट्र धर्माबद्दलच्या विवेचनातले नाना फडणिसाबद्दलचे वाक्य जोडले म्हणजे त्यांना नाना का मोठे वाटत राहिले, हे स्पष्ट होते. त्यांनी लिहिले होते, ‘हिंदू धर्माची प्रस्थापना, गोब्राह्मणांचा प्रतिपाळ, स्वराज्याची स्थापना, मराठ्यांचे एकीकरण व त्यांचे पुढारपण या महाराष्ट्र धर्माच्या मुख्य अंगांचा उच्चार शिवाजी राजांच्या तरुणपणी जसा स्पष्टपणे झालेला दिसतो, तसाच खड्र्याच्या लढाईनंतर नाना फडणिसाने निजामाशी केलेल्या तहातही दिसून येतो. त्या तहात धर्म, गोब्राह्मण व स्वराज्य ह्यांच्या संरक्षणार्थ कलमे आहेत.’

नानाचा असा गौरव करण्याकडे जरी राजवाड्यांचा कल दिसत असला, तरी आपल्या पराभवाची मीमांसा करताना संस्कृतीचा वृथा अभिमान बाळगण्याचा त्यांचा पिंड नव्हता. युरोपीय संस्कृतीची महाराष्ट्राच्या संस्कृतीशी तुलना करून ती कमी दर्जाची होती, असा निष्कर्ष काढताना त्यांचा स्वदेशाभिमान मुळीच आड आला नाही, ही बाब आज अधोरेखित करण्याजोगी आहे. या संदर्भातील दोन उल्लेख अतिशय महत्त्वाचे.

‘मराठ्यांच्या संस्कृतीत प्रथम व्यंग म्हटले म्हणजे त्यांना छापण्याची कला माहीत नव्हती व ती माहीत करून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. १४९८च्या ११ मे रोजी (वास्को द) गामाने हिंदुस्थान शोधून काढिले. तेव्हापासून १७६०पर्यंत फिरंग्यांच्या व मराठ्यांच्या मुलाखती अनेक ठिकाणी झाल्या. वलंदेज (डच) व डिंगमार (डेन) या लोकांनाही मराठे ओळखत असत. मुंबई, सुरत, बाणकोट, विजयदुर्ग, राजापूर, दाभोळ वगैरे ठिकाणी इंग्रजांचीही जानपछान मराठ्यांना झाली होती. मुंबईतील परभू, शेणवई, पारशी, भाटे व वाळुकेश्वराचे छत्रे, भातखंडे वगैरे ब्राह्मण पुजारी व बैरागी इंग्लिश लोकांशी हरहमेश (नेहमीच) दळणवळण ठेवीत. कित्येकांना चांगले इंग्रजी लिहिता व बोलता येत असे. त्यांनी छापील पुस्तके पाहिली होती, यात संशय नाही. नाना फडणिसाच्या दफ्तरात छापील इंग्रजी नकाशे अद्यापही आहेत… असे असून म्हणजे युरोपातील सर्व देशांचे लोक दारी उभे असूनदेखील मराठ्यांनी छापण्याची कला कशी घेतली नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते.

मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यात योग्य कल्पनांचे बी पेरण्यास या कलेचाच प्रवेश महाराष्ट्रात झाला पाहिजे होता. ज्याअर्थी मराठ्यांनी ही कला उचलली नाही, त्याअर्थी त्यांच्या ग्राहकशक्तीच्या कीर्तीला बराच कमीपणा येतो, हे निर्विवाद आहे,’ असे राजवाड्यांनी म्हटले.

मराठ्यांमधील उणिवांबद्दलची निरीक्षणे नोंदवताना त्यांनी पुढे लिहिले, ‘मुद्रणकलेसारखा उघडउघड डोळ्यांवर येणारा गुण ज्या लोकांच्या ध्यानात आला नाही, त्यांचे भूगोलाचे व इतिहासाचे ज्ञान कोते असावे, यात नवल नाही…परंतु ज्या वस्तूंची मराठ्यांना दरघडीस जरूर लागत असावी असा आपण तर्क करितो त्यांपैकीही काही वस्तू मिळविण्याची मराठ्यांनी इच्छा दर्शविली नाही व प्रयत्नही केला नाही. धुळपांना व आंग्र्यांना लोहचुंबकाची व तारवे बांधण्याच्या गोद्यांची विशेेष जरूर होती. या दोन्ही गोष्टी त्यांनी इंग्रजांच्या गलबतांतून व मुंबईत पाहिल्या होत्या. परंतु त्या स्वत: बनवण्याची उत्कट इच्छा त्या प्रांतातील लोकांना किंवा पुणे येथील मुत्सद्द्यांना झाली नाही, हे मोठ्या कष्टाने कबूल करावे लागते. या इतक्या बाबींत मराठ्यांचे पाऊल मागे होते…’

 anand47.hardikar@gmail.com