– हेमंत साने

मोबाइलच्या म्हणजे भ्रमणध्वनीच्या पडद्यावर (स्क्रीनवर) बोट टेकवलं की आपल्याला हवी ती क्रिया घडते हा आपला सर्वांचा रोजचा अनुभव आहे. पण कोणतंही बटन न दाबता, बोटाच्या नुसत्या स्पर्शाने हे कसं घडतं याचं आपल्याला नवल वाटतं.

प्रत्येक माणसाच्या बोटावर एक हलकासा विद्युतभार असतो. एक हलकासा विद्युतप्रवाह मोबाइल स्क्रीनच्या खालीसुद्धा वाहत असतो. जेव्हा आपण स्क्रीनवर बोट टेकवतो, तेव्हा आपल्या बोटातील विद्युतभारामुळे स्पर्श केलेल्या स्क्रीनच्या भागाखालील विद्युतप्रवाहात हलकासा बदल होतो. हा बदल आणि बदलाची अचूक जागा, नेमकेपणाने टिपण्यासाठी स्क्रीनच्या कोपर्‍यात संवेदक (सेन्सर्स) लावलेले असतात. हे संवेदक ज्या ठिकाणी स्पर्श झाला, ती जागा मोबाइलमधील प्रोसेसरला अचूक सांगतात. कोणत्या जागेवर स्पर्श झाला तर कोणती आज्ञा पाळायची, याचं ज्ञान या प्रोसेसरला आधीच दिलेलं असतं. जर तुम्ही व्हॉटसॲप चिन्हावर स्पर्श केला, तर तो व्हॉटसॲप उघडतो. तुम्ही डीपीवर बोट टेकवलं तर तो डीपी उघडतो. या तंत्रज्ञानाला ‘कपॅसिटिव्ह टचस्क्रीन’ म्हणतात.

पण एक प्रश्न पडतो की बोट लावल्यावरच मोबाइल आज्ञापालन कसे करतो? पेन, पेन्सिल किंवा हातमोजे घातलेल्या बोटाच्या स्पर्शाने आज्ञापालन का होत नाही? कारण मोबाइलच्या स्क्रीनखाली असलेल्या जाळीतील विद्युतप्रवाह भंग होण्यासाठी एखाद्या विद्युतभाराचा स्पर्शच स्क्रीनच्या वरच्या बाजूने व्हावा लागतो. तो हलकासा विद्युतभार आपल्या बोटांवरच असतो. पेन किंवा पेन्सिलवर नसतो. शिवाय, आपलं बोट ओलं किंवा ओलसरसुद्धा असता कामा नये. बोटावरील पाणी विद्युतवाहक असल्याने ओल्या बोटाच्या स्पर्शाने जाळीतील विद्युतप्रवाह भंग होईलच याची खात्री नसते.

एका बोटाच्या स्पर्शाने एक आज्ञापालन होतं. पण आपण अंगठा व तर्जनी किंवा कोणतीही दोन बोटं स्क्रीनवर टेकवून स्क्रीनवर दिसणारी प्रतिमा लहान किंवा मोठी करू शकतो. म्हणजेच अनुक्रमे झूम आऊट किंवा झूम इन करू शकतो. हे तंत्रज्ञानाचं पुढचं पाऊल आहे. एकाचवेळी दोन बोटं स्क्रीनवर दोन ठिकाणी टेकवून एकमेकांजवळ आणल्यास जाळीतील विद्युतप्रवाहाला ज्या दोन ठिकाणी अडथळा येतो ती ठिकाणे आणि विद्युतप्रवाहाला अडथळा येण्याच्या दिशेचीसुद्धा नोंद घेतली जाऊन स्क्रीनवरील प्रतिमा लहान केली जाते. जेव्हा स्क्रीनवर टेकवलेली बोटं एकमेकांपासून दूर होतात तेव्हा या उलट झालेल्या दिशेचीसुद्धा नोंद घेतली जाऊन स्क्रीनवरील प्रतिमा मोठी होते. काही मोबाइल्समध्ये तर तीन बोटं स्क्रीनच्या सर्वात वरील बाजूला टेकवून ओढत खालपर्यंत आणली तर स्क्रीनशॉट घेतला जातो. आहे ना तंत्रज्ञानाची कमाल?

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org