शालापत्रका’तून प्रसिद्ध झालेले संस्कृत कवींच्या काव्यावरील विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे लेख इतके लोकप्रिय ठरले की, पुढच्या वर्षी १८७३च्या नाताळच्या सुट्टीत ते आपल्या काही मित्रांसह आळंदीला सहलीसाठी गेले होते, तेव्हासुद्धा चर्चेत त्या लेखांचा विषय निघाला. आळंदीहून परत येत असताना जांभेकर नावाच्या मित्राने चिपळूणकरांना विचारले, ‘तुम्ही एखादे मासिक पुस्तक का बरे काढत नाही?’ पाठोपाठ त्यानेच सुचवले की, ‘त्या मासिकामध्ये कधी नवीन विषय घालावेत आणि कधी शालापत्रकामध्ये संस्कृत कवींविषयी जे निबंध यापूर्वी छापले आहेत, त्यातलेच काही घालावेत’. चिपळूणकरांना ही कल्पना आवडली आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी लगेच ‘ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रात त्या नव्या मासिकाची जाहिरातदेखील दिली. नव्या मासिकाचा – ‘निबंधमाला’ नामक नियतकालिकाचा – पहिला अंक दि. २५ जानेवारी १८७४ रोजी प्रसिद्धही झाला. चिपळूणकरांच्या मनात ती कल्पना पूर्वीपासून घोळत असावी.

मासिकाचा आकार त्या काळातल्या नियतकालिकांसारखाच डेमी द्वादशपत्री होता. पहिल्या अंकाची पृष्ठसंख्या २० होती, तर किंमत होती दोन आणे. ‘पुणे येथील बाबाजी कृष्ण गोखले यांच्या ज्ञानप्रकाश छापखान्यात छापल्याची’ नोंद होती. बहिरंग अगदी साधे होते, अनाकर्षक म्हटले तरीही चालेल. ‘अंक १… मराठी भाषेची सांप्रतची स्थिती… रचणार… विष्णु कृष्ण चिपळोणकर…’ अशी माहिती एकाखाली एक दिली होती. जगन्नाथ पंडिताचा एक संस्कृत श्लोक देऊन नंतर लगेच मराठीबद्दलचा तो निबंध छापलेला होता. शेवटच्या विसाव्या पानावर मुख्य निबंध संपल्यावर धोरणाचे स्पष्टीकरण देणारी एक सूचना होती. भाषाशोधनाबरोबरच मनोरंजन व बोध हा ‘निबंधमाले’चा उद्देश असल्याचे सांगून ‘काम बजावण्यात यत्किंचितही आळस करणार नाही’, ही हमी देण्यात आली होती आणि ‘सत्यनिरूपणाखेरीज दुसरा उद्देश असणार नाही, कोणाच्याही द्वेषबुद्धीने कधीही काही लिहिणार नाही’, वगैरे आश्वासनेही दिलेली होती.

मलपृष्ठावरील मजकुरात मासिकाच्या स्वरूपाबाबतचे स्पष्टीकरण दिलेले होते. ‘जरी नावाप्रमाणे निबंधांनाच मासिकात प्राधान्य देण्यात येणार असले, तरी शेवटी मनोरंजनासाठी काही विनोदी चुटके, सुभाषिते, आख्यायिका, उत्कृष्ट साहित्यातले उतारे वगैरेही समाविष्ट केेले जातील’, असा खुलासा जोडण्यात आला होता.

पहिला अंक फक्त २० पानांचा होता, दुसऱ्या अंकापासूनच ३६ पाने झाली. पंचविसाव्या अंकापासून मासिकाचा आकार डेमी अष्टपत्री करण्यात आला. म्हणजेच दीड पटीने वाढवण्यात आला आणि पृष्ठसंख्या ३२ करण्यात आली. नंतर मात्र कधीही आणखी बदल करण्यात आला नाही. ‘माले’ची वार्षिक वर्गणी अडीच रुपये होती.

त्या काळातला शिक्षणप्रसार आणि वाचकवर्ग यांचा विचार करता ‘निबंधमाले’ला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विष्णुशास्त्र्यांच्याच लेखांमधील काही उल्लेखांवरून स्पष्ट होते. ‘ईश्वरकृपेने सरकारचे मिंधे झाल्यावाचून आणि बड्या मंडळींनी ओशाळगत वागवल्यावाचून आमचे पुस्तक (मासिक) खासे सुरळीत चालले आहे. महाराष्ट्र भाषेविषयी कळकळ, स्वदेशाचा अभिमान किंवा ज्ञानाविषयी उत्कंठा यांनी प्रेरित होत्सात्या (झालेल्या) शेकडो लोकांचा आम्हांस बळकट आश्रय आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतोच आहे’, असे त्यांनी एका समालोचनात म्हटलेले आढळते.

‘महाराष्ट्राच्या जिज्ञासेला, अभिरुचीला, विचारशक्तीला, चिकित्सक दृष्टीला विष्णुशास्त्र्यांच्या निबंधमालेने जे वळण लावले, वाङ्मयीन इतिसहासाच्या व्यासंगाविषयी जी आस्था व गोडी वाचकवर्गात निर्माण केली, ती केवळ अपूर्व आहे’, असा अभिप्राय ग. त्र्यं. माडखोलकर यांनी आपल्या चरित्रग्रंथात व्यक्त केला आहे, तो सर्वार्थाने उचित आहे, असेच म्हणावे लागते. आपल्या या कार्याचे हे महत्त्व खुद्द विष्णुशास्त्र्यांनाच जाणवत असावे. म्हणूनच ‘निबंधमाले’चा बहुधा तिसावा अंक संपवून उठताना त्यांनी आपल्या बंधूंना इंग्रजीत म्हटले होते, ‘I am the Shiwaji of the Marathi language who had not his equal to precede or succeed him!’ स्वत:ला ‘मातृभाषेचा शिवाजी’ म्हणवून घेण्यासारखे त्यांनी काय काय केले होते, ते आता पुढील लेखांकात…