नव्या वर्षात करायची सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे नवं कोरं कॅलेंडर भिंतीवर टांगणं. कितीही स्मार्टफोन येऊ देत, कितीही कंम्प्युटर्स येऊ देत, भिंतीवरच्या कॅलेंडरचं स्थान अढळ आहे- अगदी ध्रुवताऱ्यासारखं. पण याचं हे नवं कोरं रूप एक-दोन दिवसच टिकतं. मग त्यावर ‘घरकामाला येणाऱ्या मावशींचा पगार दिला’, ‘दुधाचे १०१३ रुपये दिले’, ‘आज पेपर मिळाला नाही’, ‘इस्त्रीवाला ४ कपडे शिल्लक’ अशा विविध नोंदी होऊ लागतात आणि ते कॅलेंडर मळतं. मळतं आणि अगदी रुळतं.
या लेखमालेच्या पहिल्या लेखाची सुरुवात याच परिच्छेदाने केली होती! पुढल्याच गुरुवारी हे नवं कोरं कॅलेंडर आपल्या भिंतीवर विराजमान होईल. आणि पुढल्या काही दिवसांतच ते मळेल आणि रुळेल. सगळं काही सालाबादप्रमाणे!
फरक फक्त एकच. तो म्हणजे त्या कॅलेंडरकडे ‘एक काहीसा उपयुक्त तक्ता’ अशा कोरड्या भावनेने न पाहता आपण आता अधिक सजगपणे, अधिक जाणीवपूर्वक पाहू. पहिल्या लेखात कॅलेंडरला काय काय प्रश्न विचारता येतील याची यादीच दिली होती. या वर्षभरात त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली. तेव्हा, कॅलेंडरमधली कित्येक गुपितं आता आपण जाणतो.
१४ जानेवारीला मकर संक्रांत साजरी करताना मकर संक्रमण म्हणजे काय, ते विशिष्ट तारखेलाच का होतं आणि हजारो वर्षांमध्ये ही तारीख कशी पुढेपुढे सरकते आहे आणि का हे सगळं आपल्याला आठवेल. या १२ राशी (आणि पर्यायाने २७ नक्षत्रं) आकाशात नेमकी कुठे असतात हेदेखील माहीत आहे आपल्याला. याच संदर्भात कर्कवृत्त, मकरवृत्त म्हणजे नेमकं काय, त्यांना हीच नावं का आणि त्यांचं महत्त्व काय हेही पाहिलं.
चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा भासमान वेग सूर्याच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या भासमान वेगापेक्षा कमी असतो. काय काय घडतं या एका गोष्टीमुळे! शुक्ल आणि कृष्ण पक्ष होतात, तिथीची व्याख्या करता येते, चांद्र मासाची व्याख्या करता येते. आहे ना लक्षात? याचा आणि संकष्टीचा उपास सोडण्याची वेळ, कृष्णजन्म आणि दिवाळीतलं अभ्यंगस्नान यांचा कसा संबंध आहे हेही पाहिलं होतं आपण.
पौर्णिमेचं चंद्राचं पूर्णत्व, उत्तरायणाचा किंवा दक्षिणायनाचा प्रारंभ, तिथीची किंवा काळाच्या कोणत्याही एककाची समाप्ती ही क्षणिक घटना आहे, हेदेखील माहीत आहे आपल्याला. त्यामुळे आजची तिथी तृतीया आणि आजच संकष्टीचा उपास किंवा क्षय आणि वृद्धी तिथी या गोष्टी कशा घडतात हे जाणतो आपण.
शास्त्रशुद्ध शालिवाहन शकात अधिक आणि क्षय मास कसे ठरतात हेदेखील पाहिलं आहे आपण. तेव्हा पंचांगाच्या तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग या पाचही अंगांची आपण नीट ओळख करून घेतली आहे.
ग्रेगरियन कॅलेंडरचादेखील आपण खोलात जाऊन अभ्यास केला. कोरे ६० दिवस असणाऱ्या पार अगदी पहिल्या रोमन कॅलेंडरपासून कोणकोणते बदल घडत गेले आणि हे ग्रेगरियन कॅलेंडर आकाराला आलं हे पाहणं रंजक होतं. पोप ग्रेगरी यांनी घेतलेले धाडसी निर्णय किती शास्त्रीय पद्धतीने घेतले होते यातून बरंच काही शिकता आलं. व्यापार, व्यवहार आणि राज्यव्यवस्था या कॅलेंडरमागच्या तीन मुख्य गरजा. ग्रेगरियन कॅलेंडर त्या अचूकपणे पुरवतं म्हणून तर ते इतकं सर्वमान्य झालं आहे – किती महत्त्वाची आहे ही गोष्ट!
आपण हिजरी कालगणनाही पाहिली. आता दरवर्षी ईद वेगवेगळ्या महिन्यांत का येते हे कोडं सुटलं असेल. त्याखेरीज आपण जूलियन दिवस क्रमांक, युनिक्स वेळ अशा काही चाकोरीबाहेरच्या कालगणनाही पाहिल्या आणि चंद्रग्रहण, अगस्ती लोप वगैरेंचाही थोडक्यात आढावा घेतला. आदर्श अशी भारतीय राष्ट्रीय कालगणनाही पाहिली आहे आपण.
एवढं सगळं पाहिलं. पण कित्येक गोष्टी पाहायच्या राहिल्याही. उदाहरणार्थ टिळक पंचांग आणि बाकीची पंचांग यांच्यात नेमका काय फरक आहे आणि का किंवा सूर्याचं उत्तरायण-दक्षिणायन असतं तसं चंद्राचंही असतं का किंवा अमेरिकेत डेलाईट सेव्हिंग टाइम म्हणून एक प्रकार आहे. तो नेमका काय आहे किंवा ती आंतरराष्ट्रीय वार रेषा का काय म्हणतात ती नेमकी कुठे असते किंवा भारतीय प्रमाण वेळ, ग्रीनिच मीन टाइम हे सगळे काय प्रकार आहेत या आणि अशा कित्येक गोष्टी अगदी अस्पर्श राहिल्या. असो.
ही लेखमाला संपली. या अनंत अशा ‘काळाचे गणित’ सोपं करून सांगण्याचा एक प्रयत्न मी केला. तो किती बरा-वाईट होता हे येणारा काळच ठरवील. इति लेखनसीमा
