साधारण २००२च्या आसपासचा काळ. आफ्रिकेतल्या दुष्काळाची तीव्रता वेगाने वाढत होती. मलावी, मोझाम्बिक, झाम्बिया, झिम्बाब्वेमध्ये परिस्थिती गंभीर होती. लाखो लोक उपासमार सहन करत होते. अन्नाअभावी मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली होती. विविध देशांतून मदतीचा ओघ वाहू लागला होता, पण मिळालेल्या अन्नधान्याचे वितरण मात्र केले जात नव्हते. कारण एकच, पाठवलेल्या अन्न-धान्यात जेनेटिकली मॉडिफाइड (जीएम) वाणे असण्याची भीती. त्यामुळे संबंधित देशांतील नेते आलेली मदत स्वीकारण्यास कचरत होते.

जीएम वाणांच्या संभाव्य धोक्यांचा सामना कसा करावा, यासंबंधीची नियमावली तयार केली जात नाही, तोवर मदत स्वीकारू नये, असा निर्णय त्यांनी घेतला होता. नेदरलँड्सस्थित अन्नसुरक्षा संशोधक हब लेलीव्हेल्ड यांना ही स्थिती अतिशय अमानुष वाटत होती. अशी वेळ यापुढे उद्भवू नये, केवळ सामाईक नियमावलीअभावी भुकेल्यांना अन्नधान्य नाकारले जाऊ नये, म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज लेलीव्हेल्ड यांच्या या कार्याची दखल घेत त्यांनी सुरू केलेल्या ‘ग्लोबल हार्मनायझेशन इनिशिएटिव्ह’ची (जीएचआय) निवड कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘वर्ल्ड फूड प्राइझ’साठी करण्यात आली आहे.

अन्नसुरक्षाविषयक नियमांत एकसूत्रता आणण्यासाठी हब यांच्या पुढाकारातून ‘जीएचआय’ ही ना नफा ना तोटा तत्त्वावरील मोहीम हाती घेण्यात आली. त्यात जगभरातील सोळाशे शास्त्रज्ञ सहभागी झाले. या गुंतागुंतीच्या विषयावर विविध देशांत एकमत घडवून आणणे आणि धोरणकर्त्यांना मार्ग दाखवणे हे मोहिमेचे उद्दिष्ट होते. मोहीम कोणत्याही सरकारच्या वा उद्योगाच्या प्रभाव वा दबावापासून मुक्त राहील, याची काळजी घेण्यात आली.

हब ‘जीएचआय’मुळे ओळखले जात असले, तरीही ते काही त्यांच्या आयुष्यातले पहिले वा एकमेव काम नव्हते. ही मोहीम हाती घेतली तेव्हा त्यांच्या खात्यात युनिलिव्हरमधील ४० वर्षांची कारकीर्द जमा होती. त्यांनी वापरात आणलेली अन्न निर्जंतुकीकरण उपकरणे आणि स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया या संपूर्ण अन्न उद्योगासाठी पथदर्शी आणि मापदंड ठरल्या. ‘जीएचआय’च्या असे निदर्शनास आले की, अन्नधान्याच्या व्यापारावरील निर्बंधांमागे बहुतेकदा सुरक्षाविषयक कारणांऐवजी राजकीय कारणे असतात. ‘जीएचआय’ने अन्नातून उद्भवणारे आजार कमी करण्यासाठी आणि अन्न-धान्यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी विशेष तंत्र विकसित केले. अन्नसुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता दिसल्यास त्याची सूचना लगोलग जगभर पोहोचेल, अशी व्यवस्थाही विकसित करण्यात आली. चीनमध्ये २००८ मध्ये आलेल्या भूकंपानंतर आपत्तीग्रस्त विभागांसाठी सुरक्षितता नियमावली जीएचआयने प्रकाशित केली.

हब यांच्या नावावर अनेक पुस्तके आहेत. ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे ते फेलो आहेत. त्यांनी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. युक्रेनमधील किव्ह येथील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फूड टेक्नॉलॉजीज’ने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे. ‘वर्ल्ड फूड प्राइझ’ ऑक्टोबरमध्ये ा्रदान करण्यात येणार असून पाच लाख डॉलर्स एवढी पुरस्काराची रक्कम मोहिमेला मिळेल.

जगाने अलीकडेच युद्धग्रस्त पॅलेस्टाइनमधील सामान्य नागरिकांचे अन्नाअभावी झालेले हाल पाहिले. जागतिक तापमानवाढीचे गंभीर नैसर्गिक संकट समोर उभे ठाकलेले असताना जगाच्या निरनिराळ्या भागांत संपूर्ण देशच्या देश उद्ध्वस्त करून टाकणारी युद्धे सुरू आहेत. या स्थितीत हब लेलीव्हेल्ड यांच्या कार्याचा आदर्शच तारक ठरेल.