ज्ञात इतिहासातल्या सर्वाधिक उष्ण काळात आपण जगतो आहोत. २०२५ साली हवामान बदलामुळे आशिया खंडात हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. जे गरीब देश आज हवामान बदलाच्या झळा सोसताहेत त्यांना कुणी वाली नाही, कारण जे देश प्रदूषण करत प्रगत आणि श्रीमंत झाले आहेत ते आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. ट्रम्प यांच्या मते हवामान बदल हे एक थोतांड आहे. भविष्यातले लोक आताच्या या निर्नायकी वास्तवाकडे कसं पाहतील? ते आताच्या समाजाविषयी काय विचार करतील?
ब्रिटिश लेखक इयन मक्यूवन आपल्या ‘व्हॉट वुई कॅन नो’ या कादंबरीत असा प्रयत्न करतो. कादंबरीतला काळ २११९-२०चा आहे. अनेक देशांत राजकीय निर्नायकीमुळे परिस्थिती चिघळली आहे. काही मर्यादित स्वरूपाची अणुयुद्धं होऊन गेली आहेत (उदा. भारत-पाकिस्तान अणुयुद्धात दहा लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत.). अस्मानी-सुलतानी संकटांमुळे जगाची लोकसंख्या निम्मी झाली आहे. समुद्राची पातळी इतकी वाढली आहे की न्यू यॉर्क आणि मुंबईसारखी शहरं समुद्राखाली बुडाली आहेत. ब्रिटन म्हणजे आता केवळ काही छोट्या बेटांचा समूह आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था शक्य तितक्या उंचावर हलवल्या गेल्या आहेत. अमेरिकेत आता सरकार नसून यादवी आहे; लहानमोठ्या गटांमध्ये टोळीयुद्धं सुरू आहेत. जगभरच्या इंटरनेटची सूत्रं नायजेरियातून हलवली जातात. ऊर्जाबचतीसाठी इंटरनेटच्या वापरावर कठोर मर्यादा आहेत. हवाई वाहतूक क्वचित वापरली जाते. जागतिकीकरणाचा प्रवास उलटा होऊन जगभरातल्या पुरवठा साखळ्या ठप्प आहेत. लोकांना स्थानिक उत्पादनंच वापरावी लागतात. त्यामुळे ब्रिटनमधल्या लोकांना चहा-कॉफी-चॉकलेटसारखे पदार्थ दुर्लभ झाले आहेत. जिवाणूंद्वारे उत्पादित प्रथिनं लोकांची दैनंदिन पोषणाची गरज भागवत
या काळातले लोक एकविसाव्या शतकाकडे कसं पाहतात? तर त्यांच्या मते मानवजात तेव्हा आपली शहाणीव विसरून गेली होती. हवामान बदलाचे परिणाम भोगावे लागत असूनही परिस्थितीवर मात करण्यासाठीची राजकीय इच्छाशक्तीच हरवून बसण्याचा तो काळ होता. माणसं भोगवादात इतकी मश्गूल होती की आपल्या जीवनशैलीमुळे पृथ्वीचं किती नुकसान होतंय याचं त्यांना भानच राहिलेलं नव्हतं. ‘डीरेंजमेंट’ या नावाने एकविसावं शतक आता ओळखलं जातं.
यावरून ही विज्ञान काल्पनिका असावी असा समज होईल, पण यात विज्ञान नाही. वरचं वर्णन ही कादंबरीची केवळ पार्श्वभूमी आहे. त्यातलं खरं नाट्य वेगळंच आहे. मक्यूवनच्या इतर अनेक कादंबऱ्यांप्रमाणेच इथेही मानवी नातेसंबंध केंद्रस्थानी आहेत; त्याबरोबरच वाचकाची उत्कंठा ताणून धरणारी रहस्यं आणि त्यांचा धक्कादायक उलगडाही इथे आहे. अशा सगळ्या वातावरणात आपली आयुष्यं जगत राहणारी आणि ती अर्थपूर्ण करायचा प्रयत्नही करत राहणारी माणसं आपल्याला इथे भेटतात.
टॉम मेटकाफ हा बाविसाव्या शतकातला साहित्याचा प्राध्यापक-संशोधक १९९०-२०३० या कालखंडाचा अभ्यासक आहे. एकविसाव्या शतकातल्या माणसांची आयुष्यं बाविसाव्या शतकात खासगी राहिलेली नाहीत. त्यांनी पाठवलेला प्रत्येक ईमेल, व्हॉट्सअॅप मेसेज आणि समाजमाध्यमांवरची प्रत्येक पोस्ट, त्यांच्या किराणा मालाच्या पावत्या, इ. सामग्री आता संशोधकांना उपलब्ध झाली आहे. त्यातून त्यांच्याविषयी काय कळू शकतं? कादंबरीच्या शीर्षकात उपस्थित प्रश्नाची एक बाजू या प्रचंड माहितीसाठ्यातून येते.
२०१४ साली एका खासगी बैठकीत सादर झालेल्या पण अप्रकाशित राहिलेल्या एका कवितेचा शोध मेटकाफ घेतो आहे. फ्रान्सिस ब्लंडी नावाचा एक महत्त्वाचा कवी विसाव्या शतकात होऊन गेलेला आहे. आपल्या पत्नीच्या वाढदिवशी तिला भेट म्हणून ही कविता त्यानं सादर केलेली असते. खास बनवून घेतलेल्या चर्मपत्रावर या कवितेची एकमेव प्रत त्यानं स्वहस्ते लिहून काढलेली असते. वाढदिवसानंतर ती कुठे गेली हे अज्ञात आहे. वाढदिवसाच्या पार्टीला मोजकेच पाहुणे उपस्थित असतात. त्यांच्यासमोर सादर झालेल्या या कवितेबद्दल त्यांनी, तसंच खुद्द ब्लंडी आणि त्याची पत्नी व्हिव्हियन यांनी जे जे काही म्हटलेलं आहे ते सगळं मेटकाफ पालथं घालतो. वाढदिवसाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ, कविता वाचली गेली तेव्हाची मन:स्थिती आणि भविष्यात तिचं काय झालं याविषयीचे तपशील मेटकाफ तपासतो. यातून ती कविता, ते लोक आणि त्यांची आयुष्यं यांचं एक ‘राशोमॉन’सारखं बहुआयामी आणि गुंतागुंतीचं चित्र उभं राहतं.
या दोन कालखंडांत काही संवाद घडवण्याचा मक्यूवनचा प्रयत्न आहे. हरवलेल्या कवितेचा शोध घेणारे अनेक संशोधक आहेत. जगात इतके बदल होऊन गेल्यावरही माणसाला एका कवितेचा ध्यास लागणं यात एक गंमत आहे तशीच एक काव्यात्मताही आहे. एकविसाव्या शतकाकडे पाहण्याचा मेटकाफचा दृष्टिकोन असूयेचा आहे, कारण तेव्हाची जगण्याची पद्धत बाविसाव्या शतकातल्या मेटकाफला अप्राप्य आहे. एकविसाव्या शतकातली सुपरिचित फुलं-फळं-भाज्या आणि एकंदरीत निसर्गसृष्टी २१२०मध्ये आढळत नाही. एकविसाव्या शतकातले लोक पर्यटनासाठी शेकडो-हजारो मैल विमानप्रवास सहज करत; त्यांच्या दैनंदिन वापरातल्या वस्तूही जगभरातून येत असत. २१२०मधल्या इंग्लंडचा जगाशी असा संपर्कच नाही. विसाव्या-एकविसाव्या शतकातलं जीवन मेटकाफला गतकातर करतं. तेव्हाचं साहित्यही मेटकाफला गतकातर करतं, पण त्याच्या विद्यार्थ्यांना हे कळतच नाही. त्यांना भूतकाळात रस नाही, कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या दृष्टीने तो वेडेपणाचा काळ होता. तेव्हाच्या माणसांच्या बेजबाबदारपणापायी आणि मूर्खपणापायीच जगावर अवकळा पसरली आहे. अशा परिस्थितीत आपल्या विषयात विद्यार्थ्यांना रस वाटावा यासाठी मेटकाफ धडपडत असतो. एकीकडे हरवलेल्या कवितेचा शोध, तिच्याशी संबंधित माणसं आणि त्यांचा काळ समजून घेण्याची असोशी, आणि त्याच वेळी आपल्या वर्तमानातल्या जगण्याला अर्थ देण्याची धडपड असा तिपेडी गोफ कादंबरीत आहे.
भूतकाळाकडे आपण कसं बघतो? त्याविषयीच्या आपल्या आकलनाला काय मर्यादा आहेत? जर माणसांचे स्वभाव, त्यांचं वर्तन आणि त्यांची विचार करण्याची पद्धत कालातीत असेल तर भूतकाळातून आपल्याला आपल्याविषयी काय कळू शकतं? अशा प्रश्नांना मक्यूवन हात घालतो.
मक्यूवन आता ७७ वर्षांचा आहे. १९९८ सालीच बुकर पुरस्कार मिळालेल्या मक्यूवनकडे आज महत्त्वाचा समकालीन लेखक म्हणून पाहिलं जातं. ही त्याची एकोणिसावी कादंबरी आहे. गोष्ट सांगण्याची त्याची जी हातोटी पहिल्या पुस्तकापासूनच दिसत होती, ती अजूनही धडधाकट आहे. कादंबरीतला हरवलेल्या कवितेचा शोध हा ‘ट्रेझर आयलंड’मधल्या खजिन्याच्या शोधाच्या तोडीचा आहे. त्याशिवाय अनेक धक्कादायक घटना कादंबरीत उघडकीला येतात. पुढे काय होणार याची उत्कंठा वाचकाला पुस्तक खाली ठेवू देत नाही. पण ही निव्वळ वाचकाला खिळवून ठेवणारी गोष्ट नाही. कादंबरीतली कोणतीही व्यक्तिरेखा सद्गुणांचा पुतळा नाही. त्या अर्थानं कथेला नायक नाही. कथानकातले रहस्यभेद मेटकाफचं इतिहासाबद्दलचं आकलन खिळखिळं करून टाकतात. प्रचंड दस्तावेज उपलब्ध असूनही त्यांमधून जे दिसतं तसं वास्तवात असेलच असं जर नाही, तर मग इतिहासाचा अन्वयार्थ लावावा तरी कसा? इतिहासाचं भविष्य काय असेल? भविष्यातलं प्रेम कसं असेल? भविष्यातले बुद्धिजीवी किंवा निर्मितीक्षम लोक कसे असतील?
कादंबरीमधून मक्यूवन अशा प्रकारचे प्रश्न उभे करतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरच्या, पण वास्तववादी कादंबरीमधून अस्तित्ववादी प्रश्नांकडे कसं पाहता येईल, हे त्याला उलगडून पाहायचं आहे. एकीकडे मेटकाफचा ध्यास आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य, तर दुसरीकडे भूतकाळातल्या लोकांचे ध्यास आणि त्यांची आयुष्यं या दोहोंना परस्परांत गुंफून त्यांतल्या साम्यस्थळांची जाणीव मक्यूवन मेटकाफला (आणि वाचकालाही) करून देतो. कवी ब्लंडीची पत्नी व्हिव्हियनचा पहिला पती एक निष्णात व्हायोलिन निर्माता असतो, पण पुढे त्याला अल्झायमर्स होतो आणि आपल्या हातातली कला तो विसरून जातो. आजच्या जगालाही एक सामूहिक स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यापायी प्रेम आणि कळवळ्याच्या मानवधर्माचाच त्याला विसर पडला आहे का? आताच्या महासत्ता जगाचे तारणहार होण्याऐवजी जगाचा विनाश करणारी धोरणं अवलंबत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत असताना माणसं छद्माविज्ञानाला बळी पडत आहेत. कोविडदरम्यान अशा छद्माविज्ञानावर विश्वास ठेवून लोकांचे जीव गेलेले जगानं पाहिले आहेत. अशा काळात संवेदनशील माणसाला पुढच्या पिढ्यांविषयीची काळजी भेडसावणं साहजिक आहे. कादंबरीत त्याचं प्रतिबिंब पडतं.
आणि तरीही कादंबरी आशावादी आहे. जगाचा विनाश झालेला नाही. माणसं चिवटपणे जगत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही प्रेम करत आहेत. कविता वाचण्यातून त्यांना आनंद मिळतो. निसर्गाच्या सान्निध्यात ते प्रसन्न होतात. आणि सत्याचा ध्यासही त्यांनी सोडलेला नाही. हवामान बदलाचं आणि निर्नायकी जगाचं भयस्वप्नवत वास्तव, स्मृती आणि इतिहासातून घेतलेला सत्याचा शोध आणि मानवी नात्यांमधलं जवळीक-दुराव्याचं द्वंद्व या सर्वांतून लेखक आपल्यासमोर एक आरसा उभा करतो. त्यात स्पष्ट उत्तरांपेक्षा काही शक्यता दाखवतो. हरवलेली कविता मिळते का, याचं उत्तर मिळण्यासाठी कादंबरी वाचावी लागेल, तशी सत्त्याहत्तराव्या वर्षीही एक लेखक भविष्याबद्दल आशा बाळगून आहे तो कशाच्या जोरावर, याचा प्रत्यय येण्यासाठीही ती वाचायला हवी.
व्हॉट वुई कॅन नो
लेखक : इयन मक्यूवन
प्रकाशक : जोनाथन केप
पृष्ठे : ३०२
किंमत : ६०३ रु.
rabhijeet@gmail.com
