Two things fill the mind with ever- increasing wonder and awe…: the starry heavens above me and the moral law within me.- Kant
‘माझ्या मनाला सदोदित स्तिमित आणि अवाक करणाऱ्या गोष्टी दोनच… वर चांदण्यांनी दाटलेलं आकाश तर माझ्या आतली नैतिकतेची जाणीव’- इमॅन्युएल कांटच्या थडग्यावर कोरलेले हे शब्द त्याच्या समन्वयी तत्त्वज्ञानाचा गाभा नेमकेपणाने मांडतात. मनुष्याच्या द्विधा प्रकृतीचं काव्यात्म वर्णन करणाऱ्या या विधानाचे अनेक अन्वयार्थ लावता येतात. चांदण्यांनी दाटलेलं आकाश म्हणजे विराट भौतिक वास्तव जे मनुष्याला त्याच्या क्षुल्लकतेची, सान्तपणाची (finitude), परायत्ततेची (heteronomy) आठवण करून देतं; तर दुसऱ्या बाजूला अंतरंगात उफाळून येणारी नैतिकतेची भावना, विवेकाचा आवाज म्हणजे स्वातंत्र्याचं, स्वायत्ततेचं, प्रतिष्ठेचं, अनंताचं द्योतक आहे.

कांटच्या दृष्टीनं मनुष्याचं चरित्र सान्त असलं तरी त्याच्यातलं विवेकी नैतिक तत्त्व अनंताचा निर्देश करणारं आहे. त्यामुळे मनुष्य फक्त वस्तूंपैकी एक वस्तू ठरत नाही. असणं ( being) आणि नसणं (nothingness) मध्ये मनुष्य फक्त घडत नाही, तर बनत (becoming) असतो. त्याच्या विवेकशील बनण्यात तो सक्रिय ज्ञाता, कर्ता म्हणून अतीततेच्या आणि अनंताच्या संपर्कात येत असतो. मनुष्याची ही विवेकशील बनण्याची प्रक्रिया स्वातंत्र्याच्या संकल्पनेशिवाय मांडता येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची संकल्पना कांटच्या फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलजीचं सारभूत तत्त्व आहे.

कांटच्या थडग्यावर कोरलेल्या या विधानात कांटप्रणीत मानवतेची संकल्पनासुद्धा ध्वनित होते. ही संकल्पना त्याच्या विवेकी नीतिशास्त्राचं अधिष्ठान आहे. उदा.- भौतिक विश्वाविषयी धर्मशास्त्र आणि मिथकशास्त्रांमध्ये मानवी समूहनिहाय अनेकविध धारणा आढळतात, पण आधुनिक विज्ञानात मात्र या भौतिक विश्वाचं समूहनिरपेक्ष, वस्तुनिष्ठ आणि वैश्विक आकलन असतं. त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनानं पाहिल्यास, मानवी मनाच्या तळाशी असणारे विवेकी नीतिनियम एकमय मानवता सूचित करतात. त्यामुळे खासगी आणि ऐतिहासिक फरक विवेकी पातळीवर अदृश्य करून सार्वत्रिक वैश्विक नीतिशास्त्राची मांडणी करता येते, असा युक्तिवाद कांट करतो.

मानवी स्वभावातल्या नैसर्गिक, विवेकेतर तत्त्वासोबतच निसर्गातीत विवेकी तत्त्व सूचित करणारं, वैश्विक नीतिशास्त्राचा निर्देश करणारं कांटचं आशयघन अवतरण त्याच्या ‘क्रिटीक ऑफ प्रॅक्टिकल रीझन’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शेवटी आढळते.

याआधी आपण पाहिलं की ‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’मध्ये कांट तीन मूलभूत प्रश्न उपस्थित करतो : मला काय ज्ञात होऊ शकतं? मी कसं वागायला पाहिजे? कशाविषयी आशावादी असणं माझ्यासाठी इष्ट आहे? पहिल्या प्रश्नाची अर्थात मानवी ज्ञानाच्या शक्यता आणि मर्यादांविषयी विस्तृत ज्ञानशास्त्रीय चर्चा करून दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ‘माणूस म्हणजे नेमकं काय?’ हा चौथा प्रश्न कांट ‘क्रिटीक ऑफ प्रॅक्टिकल रीझन’ या ग्रंथात चर्चेसाठी घेतो. ‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’ या पहिल्या क्रिटीकात कांटनं ज्ञाता म्हणून मनुष्याच्या क्षमता, शक्यता, मर्यादांवर बोट ठेवलंय : अनुभवांच्या कक्षेबाहेर पडून जगाचं अंतिम स्वरूप, मानवी स्वातंत्र्य, ईश्वराचं अस्तित्वसारख्या अतीततादर्शक गोष्टींविषयी मानवी बुद्धी ठामपणे ज्ञानात्मक दावे करते तेव्हा आपोआप अंतर्विरोधांमध्ये अडकून पडते. अशा मूलभूत अंतर्विरोधात्मक दाव्यांना कांट ‘अॅन्टिनोमी ऑफ ह्यूमन रीझन’ म्हणतो.

मानवी स्वातंत्र्याविषयी अंतर्विरोधात्मक निष्कर्षांकडे नेणारी तिसरी अॅन्टिनोमी कांटच्या मनुष्यविषयक संकल्पनेच्या केंद्रभागी आहे. भौतिक जगाचं आणि त्याचाच भाग असणाऱ्या मनुष्याचं स्वरूप न-नैतिक (non- rational) असल्यानं वैज्ञानिक ज्ञान कार्यकारणभावाच्या तत्त्वानुसार यांत्रिक पद्धतीनं उलगडा करतं. त्या दृष्टीनं मानवी स्वातंत्र्य अप्रस्तुत ठरतं. याउलट, मनुष्याच्या नैतिक कृतीसाठी मानवी स्वातंत्र्य अनिवार्यच असतं. कारण मानवी स्वातंत्र्याशिवाय मनुष्याला नैतिक कृती करणं, जबाबदार ठरवणं, त्याची स्तुती किंवा दोष देणं अतार्किक ठरेल. वैज्ञानिक ज्ञानव्यवहारातली नैसर्गिक कारणता आणि मानवी नैतिक कृतीसाठी लागणारं स्वातंत्र्य यांमधला पेच सोडविण्यासाठी कांट वास्तवाची विभागणी दोन जगांमध्ये – अर्थात ‘फेनोमेना’ आणि ‘नुमेना’ मध्ये करतो. फेनोमेनन किंवा साधनं म्हणून मनुष्याचा यांत्रिकपणे उलगडा होऊ शकतो. पण नुमेनन किंवा साध्यं म्हणून यांत्रिक स्पष्टीकरणापलीकडे जाऊन स्वातंत्र्याचा विचार करावा लागेल. अशा रीतीने कांट विज्ञानाच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता नैतिक व्यवहाराचं क्षेत्र निश्चित करतो.

पहिल्या क्रिटीकानंतर सात वर्षांनी लिहलेल्या ‘क्रिटीक ऑफ प्रॅक्टिकल रीझन’मध्ये कांट विवेकी कर्ता म्हणून मनुष्याच्या क्षमता, शक्यता आणि मर्यादांची चर्चा करतो. थोडक्यात, कांटचं समग्रलक्षी तत्त्वज्ञान फक्त ज्ञानशास्त्रीय पैलूपर्यंत मर्यादित न राहता प्रबोधनपर्वाला अनुरूप मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कर्तव्यप्रधान विवेकी नीतिशास्त्राची मांडणी करतं. कदाचित त्यामुळं ‘क्रिटीक ऑफ प्रॅक्टिकल रीझन’चा उल्लेख ‘मानवी स्वातंत्र्याचं पुस्तक’ असाही केला जातो. कारण या पुस्तकात कारणतेच्या चौकटीत आकार घेणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानासोबतच एक विवेकी कर्ता म्हणून मानवी व्यक्तीला प्रतिष्ठा प्रदान करणाऱ्या कर्तव्यप्रधान नीतिशास्त्रासाठी स्वातंत्र्याची शक्यता आणि अनिवार्यतेची तार्किक आधारानं मांडणी करण्यात आली आहे.

कांटची ‘फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलजी’

‘माणूस म्हणजे नेमकं काय?’ हा फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलजीतील कळीचा प्रश्न प्रत्येक तत्त्वज्ञाच्या मांडणीत अनुस्यूत असतो. त्यात प्राप्त मानवी अवस्थेसोबतच वांच्छित अवस्था आणि त्या दिशेनं जाणारी वाट दर्शवलेली असते. कांटची फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलजी आणि त्या अनुषंगानं आकार घेणारं नीतिशास्त्र यांत आंतरिक संबंध आहे. ज्ञानशास्त्रीय चर्चा करताना आपण पाहिलं की कांटच्या दृष्टीनं मानवी ज्ञान हे अनुभवनिरपेक्ष साक्षात्कार किंवा इंद्रियसंवेदनांना नकारात्मक प्रतिक्रिया नसून , ‘रचनात्मक प्रतिसाद’ आहे – मानवी बुद्धीचा सक्रिय सहभाग त्यात अनुस्यूत आहे. त्याचप्रमाणे मानवी कृतीसुद्धा जगण्याच्या अनिवार्यतेला दिलेली फक्त नकारात्मक प्रतिक्रिया नसून रचनात्मक प्रतिसाद ठरतो. त्यामुळे ज्ञान आणि कृतीच्या पातळीवरील मानवी बुद्धीचं रचनात्मक योगदान मनुष्याला स्वायत्त ज्ञाता आणि कर्ता म्हणून प्रतिष्ठा प्रदान करतं. कांटची फिलॉसफिकल अॅन्थपॉलजी निष्क्रिय, स्थितिशील, परायत्त नसून सक्रिय, गतिशील आणि स्वायत्त आहे. अशा मानवी प्रकृतीचा आधार दैवी आदेश, सामाजिक रूढीपरंपरा किंवा विवेकेतर खासगी सुखवादी घटक नसून मानवी विवेक आहे.

लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्यानुसार, मानवी प्रकृती द्विधा अर्थात विवेकेतर आणि विवेकी तत्त्वांनी बनलेली आहे. या दोन टोकांमधली तारेवरची कसरत करणारा माणूस हा कांटच्या तत्त्वचिंतनाचा विषय. कांटच्या भाषेत सांगायचं तर, अनुभवांतून जाणारा ‘स्व’ (empirical, phenomenal ego) कारणतेच्या मर्यादेत घडतो (gets constituted) तर अनुभवातीत ‘स्व’ (transcendental noumenal ego) स्वातंत्र्याच्या अवकाशात बनत ( becomes) असतो. ही दुहेरी रस्सीखेच मानवी द्विधा प्रकृतीचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जातं. अनुभवातून जाणारा ‘स्व’ साहजिकच खासगी, नैसर्गिक, तात्कालिक गरजा, इच्छा, आकांक्षा, वासनासारख्या विवेकेतर घटकांनी प्रभावित होऊन वागत असतो. तर अनुभवातीत विवेकशील ‘स्व’ सार्वत्रिक वैश्विक चिरकालिक नैतिकतेला बांधील असल्यानं स्वत:तल्या विवेकी आदेशाचं पालन करत कर्तव्यबुद्धीने वागतो. त्यामुळे कांटचं नीतिशास्त्र प्रयोजनवादी, परिणामवादी, उपयुक्ततावादी, सुखवादी नसून विवेकवादी आहे.

कांटच्या मांडणीत मनुष्याचा अंतिम थांबा ज्ञान नसून कृती आहे. कारण कृतिशीलतेतच मनुष्याला त्याच्या मानवतेचा बोध होतो. त्यामुळे फक्त ज्ञानी असणं पुरेसं नाही. कांटच्या दृष्टीनं मानवता फक्त एक अमूर्त कल्पना किंवा अप्राप्य क्षितिज नसून प्रत्येक माणसात अस्तित्वात असणारं वैश्विक तत्त्व आहे. त्यामुळे वागताना आपण कधीही असं कृत्य करता कामा नये जे इतरांनी आपल्या बाबतीत करू नये असं आपल्याला वाटतं. मनुष्यानं असं कृत्य करावं ज्याला आपोआप वैश्विक नियमाचा दर्जा प्राप्त होईल. कांटचं बिनशर्त विवेकी नीतिशास्त्र आदेश देतं : act in such a way that you treat humanity, whether in your person or in the person of any other, never merely as means to an end, but always at the same time as an end.

साधन- साध्य हा भेद कांटच्या नीतिशास्त्राचा गाभा आहे. माणसाचं फक्त साधन असण्यात त्याची परायत्तता दडलेली आहे. तर स्वायत्ततेमुळे साध्य म्हणून त्याला मूलभूत अर्थ प्राप्त होतो. प्रगल्भ सदसद्विवेकबुद्धीच्या मदतीनं मनुष्याला स्वत:मध्ये आणि इतरांमध्ये फक्त साधनच नव्हे तर साध्य अर्थात ‘आत्मप्रतिष्ठा असलेलं स्वायत्त अस्तित्व’ दिसत असतं. कांट स्पष्ट करतो की नैतिक व्यवहारासाठी परायत्तता नैतिकतेचा मृत्यू ठरते. नैतिक वागणुकीला लागणारी अनुभवातीत सामग्री प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात असल्यानं नैतिकता बाहेरून कोंबणं तर्कविसंगत आहे. कांटचा वांच्छित समाज (Reich der Zwecke) म्हणजे असा नैतिकदृष्ट्या प्रबुद्ध समाज जिथं प्रत्येक व्यक्ती स्वनियमनासाठी पात्र ठरतो. अशा प्रबुद्ध समाजाचे सदस्य स्वत: घालून दिलेल्या विवेकी आदेशाच्या अंतर्गत स्वत:ला आणि इतरांना साधन म्हणून नव्हे तर साध्य म्हणून पाहतात. थोडक्यात, कांटच्या नीतिशास्त्राचं प्रयोजन ज्ञानी असणं नव्हे तर कृतीतून स्वातंत्र्याचा आविष्कार करणं आहे. अर्थात, इतरांची स्वायत्तता मान्य केल्याशिवाय माणूस स्वत: खऱ्या अर्थानं स्वायत्त ठरत नसतो. Was ist Aufklä rung? या छोटेखानी निबंधात कांट नमूद करतो की तत्कालीन समाज परायत्ततेतून पूर्णत: बाहेर पडून स्वायत्त झालेला नसला तरी, मानवतेची कष्टप्रद नागमोडी वळणांची वाटचाल त्याच दिशेनं होत आहे. आधुनिक माणूस प्रबोधनपर्वाच्या आश्वासनानुसार खरंच स्वायत्त झाला की त्याच्या परायत्ततेच अधिक भर पडली याविषयी पुढील लेखात.