परीक्षा आणि निकाल हे समीकरण असण्याऐवजी परीक्षा आणि प्रश्नपत्रिकांतच चुका हे समीकरण का दृढ होत असावे, असा प्रश्न विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना पडत असेल, तर तो अवास्तव नाही. परीक्षा देणारे विद्यार्थी प्रश्नांची चुकीची उत्तरे देऊ शकतात, हे समजूच शकण्यासारखे किंबहुना कोणत्याही परीक्षेबाबत ती सर्वसामान्यच बाब. पण, परीक्षेत प्रश्नच चुकू लागले आहेत आणि एक-दोन नव्हे, तीस-चाळीस! ही सर्वसामान्य बाब कशी काय असू शकते? राज्य सीईटी कक्षाने घेतलेल्या एमएचटी-सीईटी या परीक्षेत २८ वेगवेगळ्या सत्रांत मिळून ४० चुका झाल्याची बाब नेमका हाच प्रश्न उपस्थित करते.
राज्यभरच्या अभियांत्रिकी, कृषी आणि औषधशास्त्र महाविद्यालयांतील प्रवेशासाठी महत्त्वाची ठरणारी एमएचटी-सीईटी ही परीक्षा यंदा १९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत विविध २८ सत्रांत घेण्यात आली. या २८ सत्रांत आलेल्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्नांबाबत काही हरकती असतील, तर त्या नोंदवण्याची मुभा होती. सीईटी कक्षानेच दिलेल्या माहितीनुसार, एकूण १,४१४ हरकती-आक्षेप नोंदवण्यात आले. यातील ४० आक्षेप बरोबर ठरले, म्हणजे तेवढ्या चुका झाल्याचे मान्य करण्यात आले. उत्तराचा एकही पर्याय योग्य नाही, एकाहून अधिक पर्याय योग्य आणि प्रश्नच चुकीचा, अशा तीन प्रकारच्या या चुका आहेत. या ४० पैकी तब्बल २८ चुका गणिताच्या प्रश्नपत्रिकांत आढळल्या असून, भौतिकशास्त्र (७), रसायनशास्त्र (४) आणि जीवशास्त्र (१) अशी इतर विषयांच्या प्रश्नांतील चुकांची संख्या आहे. हे तपशिलात नोंदवण्याचे कारण असे की, या सर्व चुका परीक्षेची जी २८ सत्रे झाली, त्यातील मिळून असल्या, तरी बहुतांश सत्रांत एखादी का होईना चूक झाल्याचे दिसते. याचा दुसरा अर्थ असा की, बिनचूक प्रश्नांचे परीक्षा सत्रच यंदा अतिशय दुर्मीळ होते. आणि ही गंभीर बाब आहे.
एमएचटी-सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा पीसीबी गट (२ लाख ८२ हजार ७३७) आणि पीसीएम गट (४ लाख २२ हजार ८६३) इतकी होती. ही परीक्षा संगणकाधारित, म्हणजे संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवायची, अशी असते. महाराष्ट्रासारख्या माहिती तंत्रज्ञानातील ‘प्रगत’ राज्यात मात्र परीक्षेसाठी एका वेळी सात लाख संगणक उपलब्ध होत नसल्याने एकाच सत्रात सगळ्यांची परीक्षा घेणे शक्य होत नाही! म्हणून मग परीक्षा वेगवेगळ्या सत्रांत घेतली जाते. अर्थातच, त्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. आता या प्रश्नपत्रिकांसाठी अनेकविध प्रश्नांचा समावेश असलेले प्रश्नसंच उपलब्ध असूनही प्रश्नांत चुका कशा होतात, हे न उलगडलेले कोडे. एखादा प्रश्नच चुकीचा असेल, तर मुळात तो कोणत्याही पडताळणीविना प्रश्नसंचात येतो कसा, हाच पहिला प्रश्न. बरे, तरीही तो तसा आला असेल, तर जो परीक्षक प्रश्नपत्रिका तयार करतो, त्याने तो प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यापूर्वी स्वत: सोडवून बघितलेला असतो की नसतो? त्यात शंका असेल, तर त्याची अन्य परीक्षकाकडून पडताळणी होते किंवा कसे? एखाद्याने प्रश्नसंच न वापरता नव्याने प्रश्न तयार केला असेल, तर त्याचीही पडताळणी-फेरपडताळणी व्हायला हवी, ती होते का? उत्तरांचे योग्य पर्याय दिले आहेत ना आणि दिलेल्या पर्यायांत एकापेक्षा अधिक पर्याय बरोबर असू शकतात, या शक्यतेचीही पडताळणी केली जाते की नाही? आणि एवढी प्रक्रिया जर पार पाडली जात असेल, तर मग इतक्या प्रश्नांत चुका आढळतातच कशा?
प्रश्नपत्रिकेतील चुका हा केवळ एमएचटी-सीईटीपुरता मुद्दा नाही. एमबीए-सीईटीच्या प्रश्नपत्रिकांतही यंदा २८, तर बीबीए-बीसीए सीईटी प्रश्नपत्रिकांत पाच चुका आढळल्या. त्यातून एमएचटी-सीईटीच्या एका सत्राची तर यंदा प्रश्नपत्रिकेतीलच तांत्रिक चुकांमुळे फेरपरीक्षा घ्यायची नामुष्की आली. आधीच विविध सत्रांत परीक्षा घेतल्या जात असल्याने, प्रत्येक सत्रातील प्रश्नांची वेगवेगळी काठिण्यपातळी हा विवादास्पद मुद्दा झालेलाच आहे. त्यावर अंतिम स्कोअरसाठी शोधलेली पर्सेंटाइलची मात्रा परिपूर्ण नाही. त्यात आता प्रश्नांत झालेल्या चुकांचे परिमार्जन सरसकट गुण देऊन होणार. म्हणजे निकालावरील वादांना आणखी वाव.
अकरावीचे प्रवेश ऑनलाइन केले, तर तांत्रिक अडचणी, सीईटी बिनचूक घेता येत नाहीत, अशी स्थिती, शिक्षक-प्राध्यापक भरती रेंगाळलेली, शालेय अभ्यासक्रमातील विषयांच्या समावेशाचे नुसते गोंधळ आणि मंत्र्यांच्या घोषणा मात्र बक्कळ. शिक्षणाच्या बाबतीत आधीच्याच चुका काय कमी आहेत? त्यात प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांत वारंवार चुका असल्याने या परीक्षांची विश्वासार्हता ढासळते आहे, याचा शिक्षण खाते विचार करणार की नाही?