हरीश एस. वानखेडे (‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक)
डोळे बंद करा आणि समकालीन भारताच्या ‘साऊंडट्रॅक’चा मागोवा घ्या. गजबजलेला रस्ता असो, रेडिओ चॅनेल असो किंवा समाजमाध्यमे स्क्रोल करताना येणारी पोस्ट असो, बॉलीवूडच्या झगमगत्या आणि हाय-ग्लॉस ऑर्केस्ट्रेशनशिवाय (वाद्यवृंदाशिवाय) सुटकाच नाही. लग्न समारंभातील डिजेच्या तालावर थिरकणारे भांगडा-पॉपचे फ्युजन असो किंवा रिक्षातून घुमणारे प्रेमाचे किंवा विरहाचे नवीनतम साऊंडट्रॅक, चित्रपट संगीत हा आपल्या रोजच्या जगण्याचा श्वास झाला आहे.
तरीही, आपण चित्रपट आणि संस्कृतीच्या परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास करतो किंवा भारताच्या भरभराटीस आलेल्या संगीतविश्वाकडे एका संवेदनशील दृष्टीने पाहतो, तेव्हा अस्वस्थता दाटून येते. एक अब्जावर लोकसंख्या असलेला आपला देश सूर, ताल, गाण्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे, तरीही आपल्या संस्कृतीतील विचलित करणारी मोठी पोकळी म्हणजे सिनेमाच्या जगाशिवाय अस्तित्वात असलेले कोणतेही मुख्य प्रवाहातील लोकप्रिय संगीतविश्व (इंडिपेंडंट पॉप म्युझिक इंडस्ट्री) आपल्याकडे नाही.
पाश्चात्त्य जगात चित्रपट आणि संगीत हे दोन स्वतंत्र, भरभराटीस आलेले उद्योग म्हणून चालतात. मात्र, भारतात बॉलीवूड दीर्घकाळ सर्वसमावेशक आणि गिळंकृत करणार्या ‘सूर्यासारखे’ काम करत आले आहे; ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक स्वर, कलाकार आणि संगीतकाराला आपल्या सिनेमॅटिक कक्षेत ओढून घेते, तर दुसरीकडे स्वतंत्र संगीताला ऑक्सिजन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवते.
भारतीय संगीतविश्वाची पार्श्वभूमी
आपण या मक्तेदारीपर्यंत कसे पोहोचलो, हे समजून घेण्यासाठी भारतीय चित्रपट हा संगीत आणि गाण्यांना हॉलीवूडपेक्षा किती वेगळ्या पद्धतीने हाताळतो, हे पाहावे लागेल. हॉलीवूड जेव्हा ‘म्युझिकल’ या संकल्पनेबद्दल बोलते, तेव्हा सहसा तो एका विशिष्ट प्रकारचा चित्रपट असतो, जसे की ‘ब्रॉडवे’ रूपांतर किंवा ‘ला ला लँड’ सारखा एक स्टाईिलश चित्रपट. मुख्य प्रवाहातील अमेरिकी चित्रपट वाळवंटात तीनदा वेशभूषा बदलणार्या पार्श्वनर्तकांबरोबर अचानक सहा मिनिटांच्या गाणे-नृत्याच्या दृश्यासाठी कथानक थांबवत नाहीत.
याउलट, भारतीय सिनेमाने खूप जुना आणि अधिक नाट्यमय वारसा आत्मसात केला आहे. १९३० च्या दशकात जेव्हा आपले चित्रपट मूकपटांवरून बोलपटांकडे (‘टॉकी’कडे) वळले, तेव्हा चित्रपटकर्त्यांनी थेट संस्कृत नाट्यशास्त्र, १९व्या शतकातील पारशी रंगभूमीचा मेलोड्रामा आणि नौटंकी, तमाशा, जत्रा यांसारख्या सजीव प्रादेशिक लोककलांचा वारसा स्वीकारला. या देशी कलाप्रकारांमध्ये पात्रे भावना केवळ शब्दांत व्यक्त करत नव्हती, तर ती गाऊन दाखवत होती. गाणे हे भावनिक सत्याचे एक सशक्त माध्यम होते.
अनेक पिढ्यांच्या ओघात बॉलीवूड संगीताचे हे महाकाय साम्राज्य जन्माला आले. नौशाद, आर. डी. बर्मन आणि नंतर ए. आर. रहमान यांसारख्या दूरदर्शी संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट संगीत एखाद्या स्पंजसारखे झाले. त्याने शास्त्रीय राग, मातीतील लोकसंगीत, वेस्टर्न जॅझ, डिस्को आणि इलेक्ट्रॉनिक बीट्स आत्मसात करत एक अप्रतिम ‘सांस्कृतिक व्याकरण’ तयार केले, ज्याचा उद्देश प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करणे हा होता. पण इथेच खरी शोकांतिका दडलेली आहे- बॉलीवूड संगीत इतके अफाट यशस्वी झाले की, त्याने या परिसंस्थेतील इतर सर्व गोष्टींना बाजूला सारले आणि गुदमरून टाकले.
पाश्चात्त्य मॉडेल
जगभरात लोकप्रिय संगीत चित्रपटसृष्टीच्या बंधनातून मुक्त होते, तेव्हा ते अगदी वेगळ्या पद्धतीने विकसित होते. दुसर्या महायुद्धानंतर, पाश्चात्त्य लोकप्रिय संगीत हे एकामागून एक अशा अनेक अशांत आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या लाटांमधून बाहेर पडले. १९५० च्या दशकात मॅग्नेटिक टेप, ट्रान्झिस्टर रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या आगमनाने ‘रॉक अँड रोल’, १९७० च्या दशकात ‘पंक्स’ आणि १९८० च्या दशकात ‘हिप-हॉप’ या संगीतप्रकारांना जन्म दिला.
या चळवळी कधीही हॉलीवूडच्या बोर्डरूम बैठकांमध्ये तिकिटे विकण्यासाठी बनवल्या गेल्या नव्हत्या. त्या रस्त्यांवर, भूमिगत (अंडरग्राऊंड) क्लबमध्ये आणि उपेक्षित समुदायांमधून जन्माला आल्या, जसे कृष्णवर्णीय कलाकारांनी अन्याय, राग आणि सामाजिक क्रांतीला आवाज देण्यासाठी जॅझ, ब्लूज आणि रॅपचा शोध लावला. पाश्चात्त्य कलाकार चित्रपट उद्योगापासून पूर्णपणे स्वतंत्र राहून, इंडी लेबल्स, रेडिओ स्टेशन आणि अंडरग्राऊंड ठिकाणांच्या नेटवर्कच्या आधारावर अनेक दशकांची आपली अजरामर कारकीर्द उभी करू शकले (उदा. बॉब डीलन, निव्र्हाना किंवा केंड्रिक लमारसारखे कलाकार).
याउलट, भारतात जर एखाद्या कलाकाराला सन्मानाने जगायचे असेल, व्यावसायिक वितरण मिळवायचे असेल किंवा संपूर्ण भारतातील रसिकांपर्यंत पोहोचायचे असेल, तर त्याला जवळपास प्रत्येक वेळी बॉलीवूडचेच दार ठोठावावे लागते.
९०च्या दशकापासून स्ट्रिमिंग युगापर्यंत
जेव्हा चित्रपटसृष्टीची संगीतावर पूर्ण मक्तेदारी असते, तेव्हा देशाच्या संगीत सर्जनशीलतेचे काय होते? नावीन्य सोन्याच्या पिंजर्यात बंदिस्त होते. चित्रपटांच्या बाहेर, शास्त्रीय हिंदुस्तानी आणि कर्नाटक परंपरा किंवा प्रादेशिक लोकसंगीत यांसारखे पारंपरिक भारतीय संगीत अजूनही आदराचे स्थान राखून आहे, परंतु त्याचे रक्षण अनेकदा संकुचित, उच्चभ्रू आणि पारंपरिक वर्तुळांतून केले जाते. ते अतिशय शैक्षणिक, ताठर आणि एका तरुण, वेगाने डिजिटल होणार्या भारताच्या वास्तव्यापासून खूपच दूर वाटते.
स्वतंत्र कलाकारांनी मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पद्धतशीर दुर्लक्षाचा सामना करावा लागला. नव्वदचे दशक आठवा. एका क्षणासाठी भारताने स्वतंत्र पॉप क्रांतीचा अनुभव घेतला. अलिशा चिनॉय (‘मेड इन इंडिया’), लकी अली आणि सुनिता राव यांसारख्या कलाकारांनी हे सिद्ध केले की, चित्रपटबाह्य पॉप संगीतदेखील राष्ट्रीय मनावर राज्य करू शकते. परंतु, ते टिकवून ठेवण्यासाठी कोणतीही ठोस व्यावसायिक पायाभूत सुविधा, व्हेंचर कॅपिटल किंवा समर्पित टेलिव्हिजन चॅनेल नसल्यामुळे तो प्रयोग कोलमडला.
त्यातील बहुतांश प्रतिभावान कलाकारांनी अखेरीस आपला स्वाभिमान बाजूला सारून बॉलीवूडच्या पार्श्वगायनाकडे धाव घेतली. आज, इंटरनेट स्ट्रिमिंग आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सने आपल्याला अप्रतिम इंडी गायक-गीतकार आणि पर्यायी कलाप्रकार दिले आहेत, जसे प्रतीक कुहाडचे हळवे संगीत किंवा ‘द येलो डायरी’चे रॉड-रॉक. त्यांच्याकडे डिजिटल फॅनबेस (चाहतावर्ग) असला तरी, ते अद्याप मुख्य प्रवाहाच्या अगदी कडेलाच रेंगाळत आहेत. का? कारण मोठा पैसा, अफाट मार्केटिंग बजेट आणि सर्वोच्च राष्ट्रीय प्लॅटफॉर्म्स हे अजूनही चित्रपट तारे आणि चित्रपटांच्या रिलीजशी जोडलेले आहेत.
मोठा विरोधाभास
चित्रपट उद्योग संगीताकडे केवळ व्यावसायिक मूल्याचे उत्पादन म्हणून पाहतो, ज्याला जतन आणि स्वायत्ततेची गरज आहे अशा कलेच्या रूपात पाहत नाही. दुसरीकडे, या टीकेचा आधार घेत, उच्चभ्रू सांस्कृतिक स्नोब (आडंबरवादी) लोक बॉलीवूड गाण्यांना ‘लाऊड’ (कर्कश), अतिव्यावसायिक आणि ‘मासी’ (सामान्यांची) म्हणून हिणवतात आणि आपला उच्चभ्रू आदर केवळ शास्त्रीय संगीत सभा, एलिट कॉन्सर्ट हॉलसाठी राखून ठेवतात.
तरीही, या आडंबरामुळे मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. चित्रपट संगीताने साध्य केलेले सर्जन आणि दर्जा खरोखरच कौतुकास्पद आहे. बॉलीवूड संगीत हे खर्या अर्थाने भारताचे सर्वात क्रांतिकारी आणि लोकशाहीवादी सांस्कृतिक फ्युजन आहे. सुफी कव्वाली, वेस्टर्न डिस्को बासलाइन, पारंपरिक पंजाबी ढोल आणि इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर्स यांना तीन मिनिटांच्या उत्कृष्टकृतीत अगदी सहजपणे गुंफणारे संगीत इतरत्र कुठे सापडेल?
समस्या बॉलीवूड संगीतकारांच्या कलेमध्ये नाही; तर त्यांना घालून घ्याव्या लागणार्या कथा आणि व्यावसायिक बंधनांच्या बेड्यांत आहे. गाण्याला पटकथेची सेवा करावी लागते. बहुसंख्यांना खूश करावे लागते आणि बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवण्यासाठी सुरक्षित खेळावे लागते, त्यामुळे ते कधीही अस्सल सर्जनशीलता, रॅडिकल, सामाजिक-राजकीय टीका किंवा भूमिगत गर्भातून जन्माला येणारे संगीत इथे तयार होऊ शकत नाही.
एका सार्वभौम आवाजाची साद
आज, भारतीय संगीत एका अभूतपूर्व क्षणाचा अनुभव घेत आहे. पंडित रविशंकर यांसारख्या दूरदर्शी दिग्गजांनी दशकांपूर्वी यासाठीचा मार्ग सुकर केला होता आणि आज ए. आर. रहमान, दिलजीत दोसांझ आणि एम. एम. कीरावानी यांसारखे दिग्गज आंतरराष्ट्रीय स्टेडियम्स भरवत आहेत आणि जागतिक पातळीवर गौरव मिळवत आहेत.
तरीही, या जागतिक यशाच्या आतषबाजीमागे एक डोळे उघडणारे घरगुती वास्तव लपलेले आहे. भारताकडे अजूनही असा कोणताही स्वयंपूर्ण लोकप्रिय संगीत उद्योग नाही जो चित्रपटसृष्टीपासून स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकेल. आपल्या संगीताची ओळख ठरवण्यासाठी केवळ बॉलीवूडवर अवलंबून राहणे एका विशाल अरण्यासारखे आहे, जिथे केवळ एकाच प्रकारच्या उंच झाडाला वाढण्याची परवानगी आहे आणि त्याखालील प्रत्येक रानफुलाचा गळा घोटला जात आहे. एकोणीसाव्या शतकात भारतातील अत्यंत सर्जनशील तरुणांना त्यांचा खरा आवाज शोधता यावा, यासाठी आपल्या सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचे नियम बदलले पाहिजेत. संगीत निर्माते, तंत्रज्ञानात गुंतवणूक करणारे आणि स्ट्रिमिंग कंपन्यांनी चित्रपटबाह्य, स्वयंस्फूर्त संगीतप्रकारांना सक्रियपणे निधी दिला पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.
आपण चित्रपट उद्योगाची मक्तेदारी मोडत नाही आणि स्वतंत्र कलाकारांना वाढण्यासाठी आर्थिक जमीन देत नाही, तोपर्यंत आपले संगीत उत्कृष्ट राहील, पण ते नेहमीच दुसर्याच्या चित्रपटाचे पार्श्वसंगीत म्हणून उरेल. आता भारतीय संगीताने रुपेरी पडद्यावरून खाली उतरून पूर्णपणे स्वत:च्या पायावर उभे राहण्याची वेळ आली आहे.
enarish@gmail.com
