‘इंडियाची इडा’ हा अग्रलेख (११ मे) वाचला. भाजपला ४० टक्के मतेही घेता आली नाहीत, हे खरेच, पण उर्वरित मते विरोधकांच्या स्वत:च्याच कर्माने कशी विखुरली गेली, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता निघून चालली आहे. ‘इंडिया’ आघाडीची स्थापना ही केवळ एका राजकीय पक्षाची सोय नव्हती, तर तो प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठीचा शेवटचा श्वास होता. पण दुर्दैवाने आघाडीची वीण उसवली जात आहे. तमिळनाडूतील काँग्रेस-द्रमुकचा पेच असो किंवा ममता बॅनर्जींची भूमिका, यातून एकच स्पष्ट होते की, विरोधकांना शत्रूच्या ताकदीपेक्षा स्वत:च्या मर्यादांची भीती अधिक वाटते आहे.
संसदेत महिला आरक्षणाच्या आड मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक रोखणे, हा विरोधकांच्या एकीचा अपघाती विजय होता की जाणीवपूर्वक रणनीती, हा प्रश्न आता उपस्थित होतो. जेव्हा संकट अंगाशी येते, तेव्हाच विरोधक ते शिंगावर घेतात, ही त्यांची हतबलता आहे. पण ही शिंगे एकमेकांत अडकली तर भाजपचा झंझावात रोखणे अशक्य आहे. आता प्रश्न केवळ भाजपला हरवण्याचा नाही, तर स्वत:ला राजकीय नकाशावरून पुसले जाण्यापासून वाचवण्याचा आहे. ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच उरलेले नाही, त्यांनी आता मोठेपणाचा मुखवटा उतरवून नमते घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. तमिळनाडूच्या राजकीय नाट्याने हे सिद्ध केले आहे की, विरोधकांचा अहंकार भाजपसाठी सर्वात मोठे वरदान ठरतो आहे. आता या पक्षांनी स्वत:च्या मर्यादा ओळखून सामूहिक अस्तित्वासाठी एक पाऊल मागे घेण्याचे शहाणपण दाखवावे.
– परेश बंग, मूर्तिजापूर (अकोला)
…अन्यथा भाजपची पीडाच गोड वाटेल
‘इंडियाची इडा’ हा अग्रलेख वाचला. २०२४च्या पीछेहाटीनंतर खडबडून जागा झालेला भाजप आकाश पाताळ एक करून पुढील निवडणुकांच्या नियोजनाला (यात यंत्रणा व निवडणूक आयोग हे नेहमीचे यशस्वी कलाकारही आले!) लागला. त्याचवेळी विरोधक मात्र काल्पनिक यशाच्या आशेने एकमेकांतच लढण्यात मश्गूल होत मूळ शत्रू विसरले. सत्ताधारी विरोधकांसारखे आक्रमक व तडफदार, तर विरोधक सत्ताधार्यांसारखे अहंकारी व सुस्तावलेले असे आक्रीत भारतात मागील काही वर्षांपासून दिसू लागले आहे. यातून बलाढ्य भाजपसमोर सततच्या पराभवाने नामशेष होत चाललेले दुर्बल विरोधी पक्ष ही भारतीय लोकशाहीसाठी चिंताजनक बाब उद्भवली आहे. विरोधकांचे ऐक्य हा या राजकीय परिस्थितीच्या कोंडीतून एकच मार्ग आहे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे त्याची ‘इडा’ नाडी काँग्रेसच्या हाती असली तरी निष्क्रियता झटकून लोकांत जाणे व भाजपसमोर कटाक्षाने एकास एकच उमेदवार उभा करणे या इतर दोन नाड्या एकवटल्या नाहीत तर काँग्रेसच्या इडेपेक्षा भाजपची पीडाच मतदारांना गोड वाटत राहील.
– अरुण जोगदेव, दापोली
अहंकार बाळगला, तर पराभव निश्चित
‘इंडियाची इडा’ हा अग्रलेख वाचला. ‘इंडिया’ आघाडीकडे भाजपला रोखण्याची क्षमता आजही आहे, पण त्यासाठी अहंकार सोडून राजकीय वास्तववाद स्वीकारणे गरजेचे आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३६.५ टक्के मते मिळाली. सलग तिसर्यांदा सत्ता मिळवूनही ४० टक्क्यांचा टप्पा गाठता आला नाही. याचाच अर्थ ६० टक्क्यांहून अधिक जनता आजही भाजपच्या विरोधात आहे. एका सामान्य मतदाराला पर्याय हवा आहे. पण विरोधकांचा अहंकार त्याला तो देत नाही. ही ६० टक्के मते विखुरलेली राहणे हाच भाजपच्या विजयाचा खरा मार्ग आहे.
विरोधकांनी एक साधे व्यावहारिक सूत्र पाळणे आवश्यक आहे. जिथे काँग्रेस मजबूत तिथे त्यांनी लढावे, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत तिथे काँग्रेसने मोठेपणा दाखवून मागे राहावे. तमिळनाडूत काँग्रेसने टीव्हीकेबरोबर सरकार स्थापन केले. हा वास्तववादी निर्णय आहे. असाच वास्तववाद संपूर्ण आघाडीने राष्ट्रीय पातळीवर दाखवला, तर ६० टक्के मतदारांना एकसंध पर्याय देणे शक्य आहे. भाजप आधी प्रादेशिक पक्षांशी युती करतो, त्यांची मते वळवतो आणि नंतर त्यांनाच संपवून सत्ता काबीज करतो. एखाद्या प्रादेशिक पक्षाचा मतदार आज एनडीएमध्ये आहे, उद्या तो थेट भाजपचा होतो हे त्या मतदाराला समजते तेव्हा उशीर झालेला असतो. प्रादेशिक अस्मितेला भाजप दीर्घकाळ जगू देत नाही हा इतिहास आहे. जोपर्यंत विरोधक विखुरलेले राहतील, तोपर्यंत भाजप ३७ टक्के मते घेऊनही सत्ता उपभोगत राहील. इतिहास साक्ष आहे की सत्ता बदलते ती विचारांनी नाही… तर एकजुटीने! अहंकार सोडला नाही, तर ‘इंडिया’ आघाडी फक्त नावापुरतीच राहील आणि तो पराभव मतपेटीचा नाही, स्वत:च्या अहंकाराचा असेल!
– संदीप देवरे, कांदिवली (मुंबई)
भाजपला चरफडण्याशिवाय पर्यायच नाही!
‘काँग्रेस विरोधातून भाजपचा विजयला धडा’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख वाचला (लोकसत्ता – ११ मे). नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने ५५ वर्षांची द्रमुकची साथ सोडून सर्वाधिक जागा मिळविणार्या विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाला पाठिंबा दिल्याने भाजपचा व काँग्रेसच्या हितशत्रूंचा पोटशूळ उठला आहे किंबहुना त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही!
काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला असा खोटा गळा पंतप्रधानांनी काढून त्यांनी एकाच वेळी द्रमुकला खिजविण्याचा आणि काँग्रेसला झोडपण्याचा प्रयत्न केला आहे! तात्पर्य काटा द्रमुकला, आक्रंदने मात्र मोदी आणि भाजपचे सुरू झाले आहे! जातीयवादी व प्रतिगामी शक्तींविरोधात लढण्यासाठी जे सज्ज आहेत अशा समविचारी पक्षांशी मैत्री करणे मुळीच गैर नाही! काँग्रेसने सत्तेसाठी आपल्या सिद्धांतांशी तडजोड केलेली नाही! भाजपला चरफडण्याशिवाय आणि हात चोळत बसण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही! त्यातूनच मोदींची आणि भाजपची आदळआपट सुरू झाली आहे. यावरूनच मोदी व त्यांच्या भाजपला आजही काँग्रेसचे भय किती आहे याचाच प्रत्यय येतो.
– श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)
प्रकल्प उभारणे म्हणजे विकास नव्हे
‘न ही ज्ञानेन सदृशं…’ या लेखातून धरणग्रस्तांच्या वेदना, विस्थापन आणि विकासाच्या नावाखाली झालेल्या मानवी संघर्षाचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. मोठे प्रकल्प, धरणे आणि औद्योगिकीकरण यामुळे देशाचा विकास झाला, हे जरी खरे असले तरी त्याची सर्वाधिक किंमत गाव, जमीन, संस्कृती आणि उपजीविका गमावणार्या धरणग्रस्तांनीच चुकवली आहे. विशेषत: कोयना प्रकल्पग्रस्तांचा इतिहास पाहिला, तर आजही अनेक कुटुंबे पुनर्वसन, रोजगार, जमीनहक्क आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करताना दिसतात.
कोयना धरणामुळे हजारो कुटुंबांचे विस्थापन झाले. अनेकांना स्थलांतरित गावांमध्ये शेतीयोग्य जमीन मिळाली नाही. काही ठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव आजही जाणवतो. अनेक धरणग्रस्तांनी आपल्या सुपीक जमिनी, देवस्थाने, सामाजिक नाती आणि सांस्कृतिक ओळख गमावली; मात्र बदल्यात अपेक्षित स्थैर्य मिळाले नाही. काही संशोधन अहवालांनुसार, पुनर्वसित भागांतील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा कमकुवत झाली असून युवकांचे स्थलांतर वाढले आहे.
मानसिक आणि सामाजिक विस्थापनाचाही मोठा प्रश्न आहे. पिढ्यान् पिढ्या ज्या मातीत आयुष्य गेले, त्या भूमीपासून दूर जाण्याची वेदना आजही अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यातून जाणवते. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक लोकांचा सहभाग, सन्मानजनक पुनर्वसन आणि दीर्घकालीन उपजीविकेची हमी या बाबी अनेकदा दुय्यम ठरल्या.
आज हवामान बदल, पाण्याचे वाढते संकट आणि पर्यावरणीय असमतोल यांच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मॉडेलकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. केवळ मोठे प्रकल्प उभारणे म्हणजे विकास नव्हे; तर त्या विकासात स्थानिक माणूस, पर्यावरण आणि सामाजिक न्याय यांना समान स्थान मिळणे आवश्यक आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनुभव हा भविष्यातील विकास धोरणांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे. विकास मानवी चेहर्याचा आणि संवेदनशील असलाच पाहिजे, अन्यथा प्रगतीच्या नावाखाली सामान्य माणूस कायमच उपेक्षित राहील.
– डॉ. किरण अजेटराव, सीबीडी बेलापूर (नवी मुंबई)
