सी. पी. राधाकृष्णन, भारताचे उपराष्ट्रपती
जगावर वित्तीय मंदीचे सावट पसरले असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने प्रगती करत आहे. पूर्वी अत्यंत दुर्बळ असलेला आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरला असून तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपली आर्थिक प्रगतीही सर्वसमावेशक आहे…

जेव्हा मी तिरुप्पुर इथे एक विद्यार्थी म्हणून शाळेत शिकत होतो, त्या वेळी माझी माझ्या देशाविषयी अनेक स्वप्ने होती. माझ्या मनात सतत प्रश्न येत असत: भारत आपले वैभव पुन्हा केव्हा प्राप्त करेल? जागतिक पटलावर शक्तिमान देश म्हणून भारताचा उदय केव्हा होईल? आपल्या देशातील गरीब आणि वंचित मुलांना प्रतिष्ठेचे आयुष्य कधी जगता येईल? मला आज याचा अत्यंत आनंद आहे, की माझ्या बालपणी केवळ माझ्या मनात येत असलेले विचार आता प्रत्यक्षात उतरत आहेत.

मी स्वत: कायम, स्वामी विवेकानंदांच्या वचनांचे स्मरण स्वत:ला करून देतो. ते म्हणत, ‘‘उठा, जागे व्हा आणि आपले उद्दिष्ट साध्य होत नाही, तोपर्यंत थांबू नका’’. तमिळनाडूच्या भूमीवरून स्वामी विवेकानंदांनी काढलेल्या या उद्गारांमध्ये देशभक्ती आणि समजाविषयीची काटिबद्धता जागृत करण्याची ताकद आहे. जेव्हा भारताचे संपूर्ण सामर्थ्य जागृत होईल, त्या वेळी आपल्या देशात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता निर्माण होईल. गेल्या दशकात, देश उत्साह आणि दृढनिश्चयाने कार्यरत झाला आहे. संत थिरुवल्लूवर यांनी सांगितलेले सत्य आपल्या डोळ्यांसमोर साकार होताना बघण्याची संधी आज आपल्याला लाभली आहे. ‘‘जे आपल्या दृढनिश्चयात पक्के असतात, त्यांनाच, त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यात यश मिळते,’’ गेल्या दशकात, भारताने जगाचे लक्ष वेधणारी प्रगती साध्य केली आहे.

आज जगावर मंदी आणि अनिश्चिततेचे सावट पसरले असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र, वेगाने प्रगती करत आहे. सरकार आणि जनतेचा उत्साह, हेच या प्रगतीमागचे कारण आहे. एका अत्यंत दुर्बळ अस्थिर अर्थव्यवस्था असलेला आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरण्याच्या मार्गावर आहे. आपली आर्थिक प्रगतीही सर्वसमावेशक आहे. 

गेल्या एका दशकात सुमारे २५ कोटी भारतीय गरिबीतून वर आले असून आज ते प्रतिष्ठेचे जीवन जगत आहेत. बेघर लोकांठी चार कोटी घरे बांधण्यात आली आहेत. १२ कोटी लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो आहे. आपण भारताला ६० महिन्यांत उघड्यावर शौचाच्या शापातून मुक्त करण्याचा संकल्प केला होता आणि ६० कोटी लोकांनी तो पूर्णही केला. ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’अंतर्गत २.३ कोटी रुपये खर्चून ८० कोटी नागरिकांना पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे.

मी अगदी तरुण वयापासून पाहिले होते, की ग्रामीण भागांत पुरेशा वैद्यकीय सुविधा नसतात. तेथील रुग्णांच्या वेदना पाहून दु:ख होत असे. आज आपल्या देशात, ‘आयुष्मान भारत योजना’ लागू केली जात असून, त्याद्वारे देशातील प्रत्येकाला, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परिणामी ४४ कोटी लोकांना आज पीएम-आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, प्रत्येक पाच लाख रुपयांचा विमा मिळाला आहे. गेल्या केवळ एका वर्षात अडीच कोटी लोकांना, या योजनेअंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. 

शेतकर्‍यांनी, कठीण परिश्रम करून, देशात ३५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन केले आहे, ज्यामुळे भारत, जगात अन्नधान्याचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा उत्पादक ठरला आहे. भारताने जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या तांदूळ उत्पादक देश म्हणून स्थान मिळवले आहे. देशातील स्त्री शक्तीला आता देशाच्या प्रगतीत आपले संपूर्ण योगदान देण्याच्या संधी खुल्या झाल्या आहेत. तीन कोटींपेक्षा अधिक महिला आता ‘लखपती दीदी’ आणि ‘नमो ड्रोन दीदी’ झाल्या आहेत. कृषी, औषध निर्माण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत महिला पुढे येत आहेत. आता सैन्यदलांमध्येही महिलांना कायमस्वरूपी पदे मिळत आहेत, त्या युद्धजन्य कारवायांमध्येही सहभागी होत आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लागू झाल्यामुळे संसद आणि राज्य विधानसभांमध्ये, महिलांचा सहभाग वाढणार आहे. देशभरात सुमारे दोन कोटी एलपीजी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत.

जेव्हा आपण युवा पिढीला उत्साहाने स्टार्टअप्ससाठी पुढे येताना बघतो, त्या वेळी मला राष्ट्रभक्त कवी सुब्रह्मण्यम भारती यांची कविता आठवते- ‘‘या, या, या आणि तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण करा; संपूर्ण देश एकोपा आणि समृद्धीसह उदयाला येऊ दे; या, या, या आणि काही भव्यदिव्य साकार करा.’’ युवकांसाठी १३ नव्या आयआयटी देशात केवळ गेल्या १० वर्षांत स्थापन झाल्या, त्यामुळे देशातल्या आयआयटीची संख्या २३ पर्यंत पोहोचली आहे. आयआयएम संस्थांची संख्याही, १३ वरून २१ पर्यंत वाढली आहे. तर एम्सची संख्याही तिपटीने वाढून, सातपासून २३ पर्यंत पोहोचली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या, ३८७वरून ८२३वर आणि वैद्यकीय शिक्षणाच्या जागा ५१ हजार ३४८ वरून एक लाख, २९ हजार ६०३ वर पोहोचल्या आहेत.

आपण आज जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाही उभारतो आहोत. रेल्वेचे विद्युतीकरण जवळपास ९९ टक्के पूर्ण झाले आहे. देशभरात, १६४ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. विमानतळांची संख्या ७४ वरून १६३ पर्यंत, म्हणजे दुपटीने वाढली आहे, तसेच ‘उडान योजने’मुळे, सर्वसामान्यांना विमानप्रवास करणे शक्य झाले आहे.

तमिळनाडूसाठी एका दशकापूर्वी, रेल्वेची आर्थिक तरतूद ८८० कोटी रुपये इतकी असे, ती आता, वर्ष २०२६-२७ मध्ये, ७,६०० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तमिळनाडूमध्येच रामेश्वरम आणि पंबन दरम्यान देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट असलेला नवा पंबन पूल साकारला जाणे, ही तिथल्या जनतेसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पूल, आध्यात्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधी घेऊन येणारा आहे. मग जम्मू आणि काश्मीरमधला चिनाब पूल असो वा आसामचा बोगीबिल पूल भारत अद्भुत पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे.

भारतभर जागतिक दर्जाचे महामार्ग उभारण्यात आले असून, अगदी दुर्गम गावांपर्यंतही रस्ते संपर्क मजबूत करण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या १० वर्षांत चार हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या १० वर्षांत सुमारे ७,२०० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान स्वत: ‘प्रगती’ या मंचाअंतर्गत या कामावर बारीक देखरेख ठेवत असल्यानेच ही विकासकामे शक्य झाली आहेत.

पूर्व-माध्यमिक आणि उत्तर-माध्यमिक शिष्यवृत्ती योजनांचा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत आहे, तर एकलव्य मॉडेल निवासी शाळांमुळे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना ृफायदा झाला आहे. सीमावर्ती गावे, जी पूर्वी भारतातील शेवटची गावे मानली जात होती, ती आता भारतातील पहिली गावे ठरली आहेत आणि त्यांचा विकास ‘व्हायब्रंट व्हिलेजेस योजने’अंतर्गत केला जात आहे. मला आठवते, पंतप्रधानांनी ईशान्येकडील राज्यांना देशाची ‘अष्टलक्ष्मी’ म्हणून संबोधले होते. अलीकडेच मी नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांना भेट दिली असता तिथे वाहतूक सुविधा तसेच पायाभूत सुविधांमध्ये झालेली मोठी प्रगती मला पाहायला मिळाली.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यात देशाने साधलेली प्रगती आपला ऊर अभिमानाने भरून टाकणारी आहे. आज तंत्रज्ञानापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे. कोविड-१९ साथीच्या काळात भारताने लस विकासाच्या प्रयत्नांमध्ये आघाडी घेतली आणि स्वदेशी लशी विकसित करून त्या अतिशय वेगाने सर्वांना मोफत उपलब्ध करून दिल्या. भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून जगातील १०० हून अधिक देशांना लशी पुरवल्या- भारताची ही कृती जागतिक इतिहासात नोंदली गेली आहे.

‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताने अवकाश संशोधनाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक कंपन्या भारताला आपले केंद्र म्हणून निवडत आहेत, ज्यामुळे गुंतवणुकीत अनेकपटींनी वाढ होत आहे. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातही भारत जगासाठी एक आदर्श म्हणून उदयास येत आहे. मोबाइल फोन उत्पादनातही आपण जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळवले आहे. एकेकाळी मोबाइल फोन आयात करणारा आपला देश आज ३०० कोटी अमेरिकन डॉलर्स किमतीचे मोबाइल फोन निर्यात करत आहे. ही सर्व यशस्वी कामगिरी पुढच्या पिढीसाठी समृद्ध भविष्याचा मजबूत पाया ठरणार आहे.

अनेक दशकांपासून आपल्या देशासमोर केवळ दहशतवादाचेच नव्हे, तर फुटीरतावादी चळवळी आणि डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादाचेही आव्हान उभे होते. धाडसी धोरणात्मक निर्णय आणि कायद्याचे प्रभावी पालन यांमुळे आज देशात शांतता प्रस्थापित झाली असून, या हिंसाग्रस्त भागांमध्येही विकासाची दारे खुली झाली आहेत.

स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत आपण विकसित देश म्हणून अग्रगण्य महासत्ता बनावे आणि जगाला दिशा दाखवणार्‍या स्थानावर पोहोचावे, असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर निश्चित केले आहे. कठोर परिश्रमाचा हा काळ म्हणजेच ‘अमृत काळ’ आहे. ज्या प्रकारे त्या वेळी प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या हृदयात स्वातंत्र्याची तळमळ होती, त्याचप्रमाणे आजच्या तरुणांच्या मनात देशाच्या विकासाचा विचार दृढ झाला पाहिजे. त्यातून उच्च आदर्श आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून युवाशक्ती पुढे आली, तर २०४७ मध्ये आपण विकसित भारताचे स्वप्न साकार झालेले पाहू शकू.

या काळात ‘‘माझ्या बंधूंनो, आपण सर्व कठोर परिश्रम करूया. ही निद्राधीन होण्याची वेळ नाही. भारताचे भविष्य आपल्याच प्रयत्नांवर अवलंबून आहे,’ हे स्वामी विवेकानंदांचे शब्द-आपल्याला प्रेरणा आणि दिशा दोन्ही देतात. चला, आपण सर्व जण आपल्या कठोर परिश्रमांतून विकसित भारत घडवण्यासाठी एकत्र काम करू या.