हरीश एस. वानखेडे
‘होमबाउंड’ केवळ कथा सांगत नाही. तो प्रेक्षकांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जबाबदारीची जाणीव करून देतो. भयानक वास्तवातून समाज मुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत म्हणून उद्युक्त करतो…
अकॅडमी अवॉर्ड्सच्या (ऑस्कर) प्रदीर्घ इतिहासात आजवर भारताचे केवळ तीन चित्रपट- ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’- हे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ या श्रेणीतील अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. जगात सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करणारा देश असूनही, हे मुख्य पारितोषिक भारतासाठी स्वप्नच राहिले आहे. यावर्षी ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (एफएफआय) अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांच्या यादीचा (ज्यामध्ये ‘सुपरबॉइज ऑफ मालेगाव’ आणि ‘बेंगॉल फाइल्स’चा समावेश होता) आढावा घेतला आणि नीरज घेवान यांच्या ‘होमबाउंड’ची ऑस्करसाठी भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व म्हणून निवड केली होती. ‘होमबाउंड’ला १५ चित्रपटांच्या लघुयादीत स्थान मिळाल्याने अंतिम पाच चित्रपटांतही स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र परीक्षकांनी त्याला पुढील फेरीत स्थान दिले नाही.
‘होमबाउंड’ची ऑस्करसाठी झालेली निवड समाजमाध्यमांवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. बशारत पीर यांच्या २०२० मधील ‘न्यू यॉर्क टाइम्स’मधील निबंधावर आधारित हा चित्रपट शोएब आणि चंदन या (ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांनी प्रभावीपणे साकारलेल्या) दोन मित्रांच्या प्रवासावर भाष्य करतो. हे दोघे २०२० च्या भीषण टाळेबंदीचा सामना करताना दाखवले आहेत. हा चित्रपट पारंपरिक ‘आर्टहाऊस’ सिनेमा नाही. गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक भेद या विषयांवरील चित्रपटांमध्ये अनेकदा सहज दिसणारी घोषणाबाजी किंवा राजकीय वक्तव्ये टाळल्याबद्दल या चित्रपटाचे कौतुक होत आहे. कोविडच्या आपत्तीत जेव्हा मानवी जीवनाचे रक्षण करणार्या सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या, तेव्हा मानवी जिद्द आणि चिकाटी कशी टिकून राहिली, याचे हे अंगावर शहारे आणणारे चित्रण आहे. जरी ऑस्करच्या ज्युरींनी ‘होमबाउंड’चा प्रवास थांबवला असला, तरी या चित्रपटाने सामाजिक वास्तवाचे चित्रण, त्यातील धाडसी व अस्सल पात्रे आणि सिनेमात डोकावणारी सामाजिक जाणीव या विषयांवर नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
ऑस्करसाठीची पूर्वतयारी
चित्रपटातील धाडसी वास्तववाद, उत्तम अभिनय आणि भावस्पर्शी सामाजिक नाट्याव्यतिरिक्त, कान चित्रपट महोत्सवात मिळालेल्या नऊ मिनिटांच्या ‘स्टँडिंग ओव्हेशन’मुळे (टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना) हा चित्रपट जागतिक चर्चेचा विषय ठरला. ही मानवंदना चित्रपटाच्या दर्जेदार कलात्मकतेची आणि सुजाण प्रेक्षकांच्या मनाला भिडणार्या त्यातील भावनिक आशयाची पावतीच होती. ‘मसान’साठी कानमध्ये आधीच दोन पुरस्कार जिंकलेल्या नीरज घेवान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट वर्तुळात एक प्रतिष्ठित दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. कलात्मक जाणिवा आणि खिळवून ठेवणारे सामाजिक कथानक यांची सांगड घालण्याची त्यांची हातोटी जागतिक स्तरावर आकर्षित करणारी आहे. प्रभावशाली कलाकार, समीक्षक आणि चित्रपट अभ्यासकांनी या चित्रपटाची ‘नववास्तववादी’ (निओ-रिअलिस्टिक) सामाजिक नाट्यातील एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती म्हणून प्रशंसा केली होती, त्यामुळे हा ऑस्करसाठी एक प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दिग्गज चित्रपट निर्माते मार्टिन स्कोर्सेसे यांचे ‘एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर’ म्हणून या चित्रपटाशी जोडले जाणे; यामुळे हॉलीवूडमध्ये या चित्रपटाला मोठी ‘सॉफ्ट पॉवर’ (सांस्कृतिक प्रभाव) प्राप्त झाली. शेकडो प्रवेशिकांमुळे भारावून गेलेल्या ऑस्कर ज्युरींचे लक्ष वेधून घेण्यात स्कोर्सेसे यांचा पाठिंबा मोलाचा ठरेल आणि ‘होमबाउंड’ला हवी ती संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. चित्रपटाच्या या सुरुवातीच्या वातावरणनिर्मितीमुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. जरी या पाठिंब्यामुळे ज्युरींचे लक्ष वेधले गेले असले, तरी चित्रपटाची कलात्मकता, सामाजिक संदेश आणि धाडसी कथानक यांमुळेच हा चित्रपट स्पर्धेत वरच्या स्थानावर पोहोचला आणि अंतिम १५ च्या शर्यतीत सामील झाला.
‘होमबाउंड’ प्रबळ दावेदार का होता?
ग्रामीण पार्श्वभूमी आणि अपारंपरिक पात्रे असूनही, या चित्रपटातील सामाजिक वास्तववाद आणि मानवी नात्यांची संवेदनशील मांडणी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भावेल अशी अपेक्षा होती. ऑस्करची स्पर्धा अत्यंत तीव्र होती, विशेषत: कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी पुरस्कार मिळवणार्या ‘सिरात’ सारख्या दिग्गज स्पॅनिश चित्रपटाचे आव्हान समोर होते. तरीही, ‘होमबाउंड’मध्ये एक वेगळीच जादू होती, जी त्याला विजेत्यांच्या यादीत स्थान मिळवून देऊ शकली असती. हा चित्रपट न निवडणे, हा खरं तर अकॅडमी अवॉर्ड्सचाच तोटा आहे. ‘होमबाउंड’ हा अलीकडच्या काळातील एक महत्त्वाचा चित्रपट का ठरतो, याची तीन प्रमुख कारणे आहेत- साधी पण खिळवून ठेवणारी कथा, खोल भावनिक गुंतवणूक आणि वास्तवाचे भान. हा चित्रपट भारतीय संस्कृतीशी जोडलेला असताना जागतिक स्तरावरही मानवी भावनांना स्पर्श करतो.
सामाजिक वास्तववाद
‘होमबाउंड’ हा भारतातील समकालीन सामाजिक परिस्थितीचा अत्यंत वास्तववादी आणि भावनिक वेध घेणारा चित्रपट आहे. पाश्चात्त्य प्रेक्षक सहसा भारतीय सिनेमाला एकतर ‘लगान’ आणि ‘बाहुबली’सारख्या भव्यतेशी जोडतात किंवा ‘स्लमडॉग मिलेनियर’सारख्या गरिबीचे प्रदर्शन करणार्या चित्रपटांशी. मात्र, हा चित्रपट या दोन्ही टोकांच्या पलीकडे जाऊन एक नवा मार्ग शोधतो. ८०च्या दशकातील ‘दामुल’सारख्या समांतर चित्रपटांमध्ये ग्रामीण गरिबी किंवा जातिव्यवस्थेचे जे अतिनाट्यीकरण दिसले, ते यात टाळण्यात आले आहे. त्याऐवजी, हा चित्रपट केवळ मेहनतीच्या जोरावर आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारू पाहणार्या दोन तरुणांची भावनिक गोष्ट सांगतो. राजकीय प्रचाराचा किंवा अवाजवी भावुकतेचा आधार न घेता, कष्टकरी वर्गाला सोसाव्या लागणार्या मानसिक वेदनांचे हे एक प्रामाणिक चित्रण आहे.
उदारीकरणानंतरच्या भारतातील सामाजिक आणि राजकीय संस्थांमधील बदलांचे दर्शन आपल्याला येथे घडते. हा चित्रपट आर्थिक विकासातील त्रुटी आणि स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला येणारे दु:ख मांडतो. उपेक्षित तरुणांच्या आकांक्षा आणि वर्ग-जाती-लिंगाच्या प्रश्नांची गुंफण ज्या प्रभावीपणे यात केली आहे, त्यामुळे हा चित्रपट भारतीय ‘निओ-रिअलिझम’ प्रकारातील एक उत्कृष्ट नमुना ठरतो.
प्रस्थापित चौकटींना आव्हान
दलित समाजाप्रति असलेले जातिभेद आणि मुस्लिमांबद्दलची जातीय भीती आपल्या दैनंदिन सामाजिक आणि राजकीय चर्चेत आता दुर्दैवाने ‘नॉर्म’ (सहज स्वीकारली जाणारी गोष्ट) बनली आहे. हे पूर्वग्रह केवळ विचारांपुरते मर्यादित नसून ते आपल्या सामाजिक आणि वर्गीय संबंधांवर नियंत्रण ठेवतात. ‘होमबाउंड’ हा या वास्तवावर केलेला एक धाडसी प्रहार आहे. याकडे केवळ कोविड टाळेबंदीतील शोकांतिका म्हणून पाहू नये. टाळेबंदीची पार्श्वभूमी ही शोषित समूहांच्या (सबाल्टर्न ग्रुप्स) कथांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीतील प्रस्थापित स्थितीला सुरुंग लावण्यासाठी वापरलेले एक प्रभावी साधन आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात बहुतांश नायक हे उच्चभ्रू सामाजिक स्तरातील आहेत, ज्यामुळे उपेक्षित समूहांच्या समस्या आणि अनुभवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. ‘होमबाउंड’ हा पारंपरिक साचा मोडीत काढतो. मुख्य भूमिकेत दलित पात्र आणि सोबतीला मुस्लीम नायक ठेवून हा चित्रपट जात आणि धर्माच्या परस्परसंबंधांचा अत्यंत प्रगल्भतेने वेध घेतो. बहिष्कृततेमुळे होणार्या खोलवर मानसिक जखमांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. प्रेक्षकांना त्यांच्या स्वत:च्या सामाजिक भीतीचा सामना करण्यास भाग पाडतो.
हा चित्रपट सध्याच्या सामाजिक व्यवस्थेवर केलेले निर्भीड भाष्य आहे. शोषक परिस्थितीतही दलित कर्तृत्व कशा प्रकारे तग धरते, हे दाखवतानाच हा चित्रपट भविष्यातील एका चांगल्या पर्यायी व्यवस्थेची आशा निर्माण करतो. या अदृश्य ओळखींना कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवून घेवान यांनी सिनेमाच्या पारंपरिक सीमा विस्तारल्या आहेत. ‘होमबाउंड’ केवळ एक कथा सांगत नाही, तर तो प्रेक्षकांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जबाबदारीची जाणीव करून देणारा एक नैतिक आरसा आहे; जेणेकरून या भयानक परिस्थितीतून उपेक्षित समाजाची मुक्तता करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत.
भारतीय सिनेमाची नवी सुरुवात
१९५७ पासून अकादमी पुरस्कारांमध्ये आपल्या पहिल्या ‘इंटरनॅशनल फीचर फिल्म’ विजयाची प्रतीक्षा करणार्या राष्ट्रासाठी, ‘होमबाउंड’ हा एक प्रबळ आणि धाडसी दावेदार होता. ऑस्करच्या शर्यतीतून तो बाहेर पडणे ही भारतातील कलाप्रेमींसाठी एक चटका लावणारी गोष्ट होती. ही घटना उत्कृष्ट सिनेमॅटिक दर्जा असलेल्या, धाडसी सामाजिक संदेश देणार्या आणि विलक्षण अभिनयाचे प्रदर्शन करणार्या एका चांगल्या चित्रपटास नकार दिल्यासारखी आहे. ऑस्करमधील ‘होमबाउंड’चे अपयश हे केवळ शोकेसमध्ये सजवली जाणारी एक ट्रॉफी गमावण्यापेक्षा खूप मोठे नुकसान दर्शवते. भारतीय सिनेमा जागतिक स्तरावर आता प्रगल्भ झाला आहे, याचे हे एक लक्षण मानले पाहिजे. भारतीय सिनेमाची ओळख केवळ ‘भव्य देखावा’ (स्पेक्टॅकल) दाखवणारा चित्रपट अशी न राहता, एक ‘आशयघन कलाप्रकार’ (सबस्टॅन्टिव्ह आर्टफॉर्म) म्हणून त्याचा सन्मान होत आहे.
जरी हा चित्रपट ती सोनेरी बाहुली घरी आणण्यात अपयशी ठरला असला, तरी ‘होमबाउंड’ने आधीच एक अधिक महत्त्वाची लढाई जिंकली आहे: या चित्रपटाने जागतिक प्रेक्षकांना त्या ‘अ-दृश्य’ आयुष्यांकडे डोळसपणे पाहण्यास भाग पाडले आहे, ज्यांच्या श्रमावर हे जग चालते. भारतीय सिनेमाच्या प्रगल्भतेचा हा एक नवा अध्याय आहे.
‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक
enarish@gmail.com

