हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनीच हवाई दलाला लढाऊ विमानांची नितांत गरज असल्याचे त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत पुन्हा सांगितले, हे बरे झाले. हवाई दलामधून मिग-२१ लढाऊ विमाने निवृत्त झाल्यानंतर ही गरज अधिक ठळकपणे जाणवते आहे. दरवर्षी ३६ ते ४० लढाऊ विमाने हवाई दलामध्ये दाखल होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हवाई दलाला लढाऊ विमानांची आवश्यकता असल्याचे गेली कित्येक वर्षे सातत्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. विविध अहवालांतून त्यावर भाष्य केले जात आहे. या संदर्भात ‘अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू’ असले, तरी प्रत्यक्षात लढाऊ विमानांची संख्या फारशी वाढलेली नाही. हवाई दलामध्ये ४२ लढाऊ स्क्वाड्रन्सना मंजुरी आहे. वास्तविक, दोन आघाड्यांवरील आणि बदललेल्या युद्धपद्धतीचे आव्हान पाहता यापेक्षाही अधिक स्क्वाड्रन्सची गरज असताना सध्या स्क्वाड्रन्सची संख्या ३०पेक्षाही कमी झाली आहे. यापूर्वी ४२ स्क्वाड्रन्सच्या जवळपास विमानांची संख्या १९७१च्या सुमारास होती. यावरून लढाऊ विमानांच्या कमतरतेबाबतची समस्या किती गंभीर आहे, हे लक्षात यावे. जगभरात जी युद्धे होत आहेत, त्यामध्ये हवाई वर्चस्व आणि हवाई क्षेत्रातील युद्धनीतीचाच वापर होत आहे. यावर, ‘क्षेपणास्त्र, ड्रोन, मानवरहित विमाने यांचे महत्त्व वाढतानाच्या काळात लढाऊ विमानांची आवश्यकता किती?’असे मत सामरिक क्षेत्रातही काही लोक मांडताना दिसतात. मात्र, हवाई युद्धपद्धतीत लढाऊ विमानांचे महत्त्व निर्विवाद आहे. मानव आणि यंत्र यांमध्ये यंत्रामागील मानव अधिक महत्त्वाचा असतो, हे सातत्याने सिद्ध झाले आहे. शत्रूवर हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जरब बसविण्यासाठी लढाऊ विमानांची जागा दुसरे कुणी घेऊ शकत नाही. सध्याच्या बदलत्या युद्धपद्धतीत हवाई दलाचे आणि हवाई शक्तीचे हे महत्त्व सिंग यांनीही सांगितले.
लढाऊ विमानांची चणचण भरून काढण्यासाठी बहुउद्देशीय लढाऊ विमाने, हलके लढाऊ विमान तेजस एमके१ए, मार्क-२ विमाने प्रस्तावित आहेत. पाचव्या पिढीचे विमान तयार करण्याचा प्रकल्पही सुरू आहे. पण या सार्या प्रकल्पांना उशीर होत आहे. राफेल विमानखरेदीचा निर्णय या वर्षात होऊ शकतो, असे सिंग म्हणाले. तसेच, रशियादेखील सुखोई-५७ विमान देण्यास तयार आहे. मात्र, त्याचा निर्णय राजकीय स्तरावर झालेला नाही. या सार्या बाबींमध्ये विमानांचे इंजिन आपण बनवू शकत नाही, ही सर्वांत मोठी अडचण आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेला मर्यादा आहेत. इंजिननिर्मितीत विदेशांवरील अवलंबित्व भारताने तातडीने दूर करायला हवे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या अचूक हल्ल्यांनी हवाई हल्ल्यांची आणि हवाई सुरक्षेत भारताची सरस कामगिरी सार्या जगाने पाहिली. ही कामगिरी पाकिस्तान आणि चीननेही पाहिली आहे. त्यामुळे भारताला नामोहरम करण्यासाठी, विशेषत चीन, त्या दिशेने अधिक प्रयत्न करणारच नाही, असे नाही. याचमुळे आपल्यालाही आणखी आधुनिक होण्याची गरज आहे. पाचव्या पिढीची लढाऊ विमाने चीन पाकिस्तानला देत असल्याचे वृत्त आहे. या बाबीवरही सिंग यांनी चिंता व्यक्त केली. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेवर भाष्य करताना त्यांनी आताच्या काळात आत्मनिर्भरता हेच सर्व समस्यांना उत्तर असल्याचे मान्य केले; पण हा दूरचा टप्पा असून, हे साध्य करण्यामध्ये अनेक आव्हाने असल्याचेही त्यांनी सांगितले. एका रात्रीत आत्मनिर्भरता येत नसल्याचे परखड भाष्य त्यांनी केले.
हवाई दलात पुरेशी लढाऊ विमाने असण्यातील आणखी एक मोठी समस्या म्हणजे अतिशय संथ खरेदी प्रक्रिया. जागतिक पटलावरील अनिश्चिततेचे वातावरण आता नवसामान्य बाब होऊ लागली असताना आणि आपण आजही मोठ्या प्रमाणावर विदेशावर शस्त्रांसाठी अवलंबून असताना खरेदीमधील ही संथ प्रक्रिया जीवघेणी ठरू शकते. या खरेदीतील ही त्रुटी टाळण्यासाठी बर्याचदा मोठे व्यवहार थेट दोन देशांमध्ये सरकारने केले आहेत. मात्र, या अपवादाचा वापर प्रत्येक वेळी करावा लागू नये. देशांतर्गत जलद विमाननिर्मितीची क्षमता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड वर्षाला २० ते २४ तेजस एमके१ ए विमाने तयार करू शकते. मात्र, यामध्ये पुन्हा पुरेशा इंजिनपुरवठ्याची गरज आहे. हवाई दलाचा ९४ वा वर्धापन दिन ८ ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या प्रमुखांनी लढाऊ विमानांबाबत केलेले परखड वक्तव्य सरकारच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरावे.
