दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य ते सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्य! हा आहे भारताचा पॅरालिम्पिकमधील पदकप्रवास. आपण २०१६ मध्ये पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून आठ वर्षांत चार पदकांपासून २९ पदकांपर्यंत मजल मारली आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यावर पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा क्रीडाजगत अजूनही ऑलिम्पिकच्या आठवणींत रमले होते. पॅरिसही त्या भव्य स्वप्नातून जागे व्हायचे होते. पण, पॅरालिम्पिकने आणखी नवे भव्य स्वप्न दिले – क्षमतांचे क्षितिज शारीरिक वा मानसिक अक्षमतेमुळे आक्रसत नाही. स्पर्धेच्या अगदी सुरुवातीला पॅरिसकरांना स्टेडियममध्ये आणण्यासाठी संयोजकांना थोडे कष्ट पडले असले, तरी नंतर ही स्पर्धा केवळ स्टेडियममधूनच नाही, तर जगभरात अनेक पडद्यांवर पाहिली गेली, नावाजली गेली. जगभरातील आठ अब्ज लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचेल, अशी व्यवस्था आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने केली होती. तिचा साहजिकच सर्वंकष बोलबाला झाला आणि आता समारोपानंतरही त्याचे कवित्व शिल्लक आहे. पदकांच्या दृष्टिकोनातून पाहायचे, तर भारतासाठी ही स्पर्धा निश्चितच फलदायी ठरली. आपल्या केवळ चौथ्या स्पर्धेत भारतीयांनी आपली पदकसंख्या सात पटींनी वाढवली. त्यात महिला क्रीडापटूंचाही मोठा सहभाग होता, हे नक्कीच उल्लेखनीय.

हेही वाचा >>> लालकिल्ला : काश्मिरातील गाडली गेलेली पत्रकारिता 

loksatta editorial on union minister nitin gadkari says no more subsidies on electric vehicles
अग्रलेख : विजेला धक्का
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
donald trump kamala harris presidential debate
अग्रलेख : वीज म्हणाली…
Presvu Eye Drops
अग्रलेख : दावा, दवा, दुआ!
loksatta editorial on National Science Awards
अग्रलेख : नंदीबैल नगरी!
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!
iphone 16 Pro models assembling and manufacturing in india
अन्वयार्थ : उत्पादनातील ‘आयफोनिक’ संधी

नेमबाज अवनी लेखरा, भालाफेकपटू सुमित अंतिल या अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकांची कमाई केली, तर नितेश कुमार (बॅडमिंटन), हरविंदरसिंग (तिरंदाजी), धरमवीर नैन, प्रवीणकुमार (उंच उडी) आणि नवदीपसिंग (भालाफेक) यांनीही सुवर्णपदकावर नाव कोरले. ४०० मीटर धावण्याच्या टी-२० प्रकारात (गतिमंदांसाठीची स्पर्धा) कांस्यपदक मिळवणारी दीप्ती जीवनजीची कहाणी प्रातिनिधिक. तेलंगणची ही धावपटू रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आली. लहानपणी तिच्या अध्ययन अक्षमतेमुळे तिला बोल लावले गेले. पण, ही मुलगी धावू लागली, की सगळ्या मर्यादा मागे टाकते, हे ‘अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’शी संलग्न प्रशिक्षक एन. रमेश यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी तिला प्रशिक्षण दिले आणि दीप्ती भारताची स्टार धावपटू झाली. पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्याच अशा कहाण्या आहेत. दोन्ही हात नसलेली अवघी १७ वर्षांची तिरंदाज शीतल देवी, पाय आणि तोंडाच्या साह्याने लक्ष्यवेध करत असलेल्या चित्रफिती अनेकांना प्रेरित करून गेल्या. कांस्यपदक विजेत्या शीतल देवीच्याच गावातील एक १३-वर्षीय अपंग मुलगी तिच्यापासून प्रेरणा घेऊन तिच्याच प्रशिक्षकांकडे तिरंदाजी शिकत आहे. प्रेरणेची ही अशी साखळी तयार होणे हे या स्पर्धेचे वेगळेपण ठरावे. अर्थात, याच जोडीने एकूणच अपंगांबाबतचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन बदलला, तर तेही हवे आहे.

अर्थात, क्षमतांची अत्युच्च कसोटी पाहत असताना त्यातून उद्भवणाऱ्या इजा हाही चिंतेचा विषय आणि पॅरालिम्पिकपटूंच्या बाबतीत तो अधिक गंभीर. मुळात सर्वसाधारण ऑलिम्पिकपटूंपेक्षा पॅरालिम्पिकपटूंना इजा होण्याची शक्यता १.७९ टक्क्यांनी अधिक असते, असे अमेरिकेत झालेला एक अभ्यास सांगतो. यंदाच्या स्पर्धेतही अनेक पॅरालिम्पिकपटूंना या इजांचा सामना करावा लागला आणि तज्ज्ञांच्या मते तर, आता स्पर्धा संपल्यानंतर अनेकांच्या अशा इजा खऱ्या अर्थाने समोर येऊ लागतील. सर्वसाधारण क्रीडापटूंना शरीराच्या खालच्या भागांत इजा होण्याचे प्रमाण अधिक असते, तर दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत हे उलट असते. त्यामुळे शरीराच्या वरच्या भागाच्या स्नायूंवर अतिताण हे इजांचे एक प्रमुख कारण, मात्र अनेक प्रशिक्षक आणि तंदुरुस्ती मार्गदर्शकांना पॅरालिम्पिकपटूंच्या तंदुरुस्तीची शास्त्रशुद्ध देखभाल कशी करायची असते, हे माहीत नसल्यानेदेखील इजा होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर जितका अभ्यास होईल आणि त्यावर मात करण्याचे उपाय समोर येतील, तितका या खेळाडूंचा हुरूप आणखी वाढेल, हे नक्की. आणखी एक मुद्दाही नोंदवला पाहिजे तो असा, की पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक आहेच, पण या स्पर्धेत इतर देशांची कामगिरी काय सांगते? चीनने यंदाच्या स्पर्धेत ९४ सुवर्णपदकांसह तब्बल २२० पदके मिळवून आघाडी कायम ठेवली आहे. ब्रिटनने १२४, अमेरिकेने १०५ पदके मिळविली. आपल्या सक्षम आणि अपंग अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंवर चीन करत असलेला तब्बल ३.२ अब्ज डॉलर्स इतका खर्च हे या यशाचे गमक आहे. तेथील बहुतेक पॅरालिम्पिकपटू ग्रामीण भागातील असून, त्यांचे गुण कमी वयात हेरून त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. हे अमेरिकेतही होत नाही. त्या देशाच्या पॅरालिम्पिकपटूंमध्ये लष्करात कामगिरी बजावताना जखमी झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे. जागतिक वर्चस्वाच्या स्पर्धेत कला, क्रीडा ही क्षेत्रेही अपवाद नसतात. त्यांना कौतुकापलीकडे जाऊन निश्चित धोरणाची अपेक्षा असते. पॅरालिम्पिकमधील विक्रमी कामगिरीला आणखी पुढे नेणे आणि ऑलिम्पिकमधील अपेक्षाभंगावर मात करणे, अशा दोन्हीसाठी हे निश्चित धोरण उपयुक्त ठरणार आहे. त्या बाबतीत क्षमतांचा क्षय होऊन चालणार नाही. अन्यथा, तीच सीमारेषा आपल्या मर्यादा दाखवून देण्यास पुरेशी ठरेल.