‘डिजिटल अरेस्ट’ या संज्ञेने गेले वर्षभर जगाला भांडावून सोडले. भल्याभल्यांची यात फसगत झाली. अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी गमावली. या भयाचे, त्रासाचे आणि त्यातून बसणार्या आर्थिक फटक्याचे वास्तवदर्शी चित्रण ग्राफिक्सच्या साहाय्याने करणार्या चित्रकार आणि पत्रकारांच्या गटाला पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. या गटात शोधपत्रकार सुपर्णा शर्मा आणि चित्रकार आनंद राधाकृष्णन या भारतीयांसह शोधपत्रकार नताली पिअर्सन यांचा समावेश आहे. ‘ब्लूमबर्ग’मध्ये ‘ट्रॅप्ड’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या वृत्तात ‘डिजिटल अरेस्ट’ झालेल्या एका भारतीय ‘न्यूरॉलॉजिस्ट’चे अनुभव चित्र आणि शब्दांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
मुक्तपत्रकार असलेल्या सुपर्णा शर्मा यांनी गेली तीन दशके विविध नामांकित वृत्तपत्रांसाठी शोधपत्रकारिता केली आहे. गुन्हेगारी, संघर्ष, आपत्ती आणि भ्रष्टाचार यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी वार्तांकन केले आहे. त्यांनी ‘अल जझीरा’साठी २०२३मध्ये केलेली वृद्धाश्रमांवरील मालिका गाजली होती. दिल्लीतील दोन वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर सुपर्णा यांनी कारणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अब्जावधी डॉलर्सच्या महागड्या वृद्धाश्रमांच्या उद्योगातील निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला होता.
शर्मा यांनी त्या वृत्तातून प्रशासकीय अधिकार्यांचे वास्तवावर पडदा टाकण्याचे प्रयत्नही उघड केले होते. भारतातील महिला कुस्तिगीरांनी भाजप नेते बृज भूषण शरण सिंग यांच्यावर केलेले आरोप, त्याविरोधात केलेली आंदोलने आणि त्यानंतर त्यांना सत्तेविरुद्ध उभे ठाकण्याचे भोगावे लागलेले दुष्परिणाम या मुद्द्यांवरही सखोल वार्तांकन केले होते. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’, ‘रोलिंग स्टोन इंडिया’, ‘फ्रंटलाइन’ आणि ‘बीबीसी आफ्रिका’ यांच्यासाठीही वार्तांकन केले आहे.
आनंद आरके हे मुंबईस्थित चित्रकार असून ते ‘ब्लू इन ग्रीन’ आणि ‘ग्राफिटीज वॉल’ या ग्राफिक कादंबर्यांसाठी ओळखले जातात. ‘ब्लू इन ग्रीन’मध्ये एका तरुण संगीतकाराच्या आयुष्यातील तगमग, सर्जनशीलतेचे वेड चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. तर ‘ग्राफिटीज वॉल’ या पुस्तकात मुंबई शहराच्या रस्त्यांवरील सतत बदलणार्या आणि विकसित होणार्या संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर अभिव्यक्ती, बंडखोरी, महत्त्वाकांक्षा या भावनांचे चित्रण केले आहे. आनंद यांनी ‘बूम! स्टुडिओ’, ‘२००० एडी’, ‘टायनी ओनियन’ आणि ‘इमेज कॉमिक्स’ यांसारख्या प्रमुख कॉमिक प्रकाशकांसाठी मुखपृष्ठ रचना केली आहे.
‘ट्रॅप्ड’साठी जाहीर करण्यात आलेला पुरस्कार ‘इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंटरी’ या श्रेणीतील आहे. यापूर्वीच्या ‘एडिटोरियल कार्टूनिंग’ची जागा आता या श्रेणीने घेतली आहे. या निर्णयारून वाद निर्माण झाला असून, ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन एडिटोरियल कार्टूनिस्ट्स’ने ‘एडिटोरियल कार्टूनिंग’ ही एक स्वतंत्र श्रेणी म्हणून पुन्हा स्थापित करण्याची मागणी केली आहे. १५ हजार डॉलर्सचा हा पुरस्कार तीन विजेत्यांना विभागून दिला जाणार आहे.
