आधुनिकतेची आस जपूनही भारतीयत्वाचा शोध अनेक कलावंतांनी १९५०-६० च्या दशकापासून घेतला; त्यात साहित्यिक तर होतेच पण बी. व्ही. कारंत आणि इब्राहीम अल्काझींसारख्यांनी नाट्यक्षेत्रात, हुसेन/रझा/ गाडे/ बाकरे आदी ‘प्रोग्रेसिव्ह’ चित्रकारांपासून ते प्रभाकर बरवेंपर्यंत अनेकांनी चित्रकलेच्या क्षेत्रात आधुनिकता आणि भारतीयता यांचा मेळ शोधला. वास्तुरचनेच्या (आर्किटेक्चर) क्षेत्रात तर बाळकृष्ण दोशी, चार्ल्स कोरिआ, राज रेवाल, अच्युत कानविंदे अशी फळीच आधुनिकता- भारतीयता यांच्या संगमाची विविध रूपे साकारताना दिसली. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात कर्तृत्व दाखववलेल्या अशा या वास्तुरचनाकारांच्या पिढीचा अखेरचा दुवा शंकर कानडे यांच्या ६ डिसेंबर रोजी झालेल्या निधनाने लोपला आहे.

शंकर कानडे हे १९३७ साली सोलापूर जिल्ह्यात जन्मले. वास्तुकला शिकण्यासाठी मुंबईत आले आणि ‘जेजे’ कला महाविद्यालयातून त्यांनी पदविका मिळवली. शिक्षण घेत असतानाच वास्तुरचनेतल्या आधुनिकतावादाची- ‘मॉडर्निस्ट आर्किटेक्चर’ची ओळख या संस्थेच्या ग्रंथालयात ‘बाउहाउस आर्किटेक्चर’ची, वॉल्टर ग्रोपियस यांच्या वास्तुरचनांची पुस्तके पाहून-वाचून झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर अहमदाबादला बाळकृष्ण दोशी यांच्याकडे ते काम करू लागले. तेव्हा चंडीगढ उभारणारे ल कॉर्बुझिए, अहमदाबादचे ‘आयआयएम’ साकारणारे लुई कान अशा युरोपीय आधुनिकतावादी वास्तुरचनाकारांची ये-जा भारतात होती. स्थानिक बांधकामसामग्रीला प्राधान्य द्यायचे, विषम हवामानाचा विचार करून हवा खेळती ठेवायची आणि नैसर्गिक प्रकाशालाही वाव द्यायचा ही भारतात हेमाडपंती वास्तुरचनेपासून पाळली जाणारी पथ्ये हे युरोपीयही कमी-अधिक प्रमाणात पाळत. दुसरीकडे लॉरी बेकर हे भव्यतेऐवजी उपयुक्ततेला, स्थानिकतेला महत्त्व देत होते. कॉर्बुझिए ते बेकर या मोजपट्टीवर शंकर कानडे यांनी स्वीकारलेला मार्ग बेकर यांच्याकडे अधिक झुकणारा होता. त्याच्या खुणा त्यांनी १९८५ पासून बेंगळूरुमध्ये स्वतंत्रपणे केलेल्या कामात दिसू लागल्या. त्यांचे धाकटे बंधू नवनाथ कानडे हे अमेरिकेत पाउलो सोलेरी या फ्यूचरिस्ट वास्तुरचनाकाराकडे उमेदवारी करून १९९० मध्ये बेंगळूरुला आले. या दोघा भावांनी ‘शिल्प सिंदूर’ ही संस्था (फर्म) स्थापन केली. एका गाळ्यातून सुरू झालेल्या ‘शिल्प सिंदूर’ने प्रचंड, भव्य कामांच्या फंदात न पडता उपयुक्त, मानवी वावर-वापराच्या सहजपणाला प्राधान्य देणाऱ्या वास्तुरचना केल्या.

या वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण म्हणजे बेंगळूरुची ‘जलवायू वसाहत’. सुमारे दोनशे घरांची ही वसाहत शेजार जपणारी, प्रत्येकाला अंगण आणि पायी वा सायकलने ये-जा करणाऱ्यांना वाटा- पायवाटा देणारी आणि मुख्य म्हणजे अजिबात ‘सरकारी वसाहत’ न वाटणारी! परवडणारी घरे बांधायची तर देखभालखर्चही कमी व्हायला हवा, म्हणून कर्नाटकात मुबलक मिळणारा कडाप्पा दगडाच्या फळ्या सिमेंटच्या खांबांत खोवून, दोन कडाप्पा फळ्यांना सिमेंटची बळकटी देणारे नवे तंत्र त्यांनी शोधले. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील नागज येथे कानडे बंधूंनी स्वत:साठी बांधलेले घर हाही वास्तुरचनेचा वस्तुपाठ ठरला. या भावांपैकी नवनाथ गेल्याच वर्षी वारले. शंकर यांना २०१० पासून दिसत नव्हते, ऐकूही कमी येत होते, तरीही तरुणांशी बोलण्याची संधी ते सोडत नसत. कानडे यांच्या पुढल्या (१९४७ ते ६० मध्ये जन्मलेल्या) फळीतले नरेंद्र डेंगळे यांच्यासारखे अगदी थोडेजण काचाबिचा न वापरता, कानविंदे व दूरान्वयाने कानडे यांचा वारसा जपत आहेत.