नावात काय आहे, या सनातन प्रश्नाभोवती काही जणांच्या जगण्याच्या प्रेरणा दडलेल्या असू शकतात. काही जण अगदीच नावगावाचा मागमूसही न ठेवता एखादं भव्यदिव्य काम उभारून जातात. वेरुळ – अजिंठ्यांची लेणी कोरणारे कोण? नाही सापडत उत्तर. शोधूनही त्या व्यक्तींची ओळखच सापडत नाही. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जगतात नाव हीच कमवायची गोष्ट, असं मानलं जातं. आता तोही निकष राहिलेला नाही. पण नाव नाही मिळालं तरी चालेल, अशी वैराग्य भावना किंंवा प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या वृत्ती जोपासणाऱ्या माणसांच्या प्रेरणा आणि ध्येय वेगळं असतं. उडणाऱ्या ड्रोनची बॅटरी तयार करू, असं एखाद्या अभियंत्याला वाटतं, तेव्हा तो काही आपलं नाव व्हावं म्हणून ते करत असतो असं नाही. निर्हेतुक, पण विशाल ध्येयाने काम करणाऱ्या माणसांची संख्या कमी असेल, पण ते आहेत.

काहीही असो ओळख लागते प्रत्येकाला. अगदी गावाला, गल्लीला, घराला, व्यक्तीला. अशी ओळख मिळते नावातून. ती देणं हे त्याच्या लक्षणांवरून ठरवलं जात असावं. झरी नावाचं गाव आहे. या गावातल्या विहिरीला कदाचित लवकर पाणी लागत असावं, विलासराव देशमुखांच्या बाभळगावमध्ये बाभळी जास्त असतील का? पिंपळगाव, वडगाव, चिंचपूर या नावांमधील झाडांचा उल्लेख आणि तो परिसर अशी त्याची ओळख होती. लक्षणांवरून पडणारी नावं ही काही आजची नाही. आपलं प्रेमच मुळात जुन्यावर अधिक. नाव आणि आडनाव, अशी ओळख अधिक पुरातन हवी, असा आपला आग्रह कायम असतो. ती ओळख अधिक धार्मिक असावी, असे प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केले असावेत. वेद, नाव आणि वेदालंकार हे आडनाव. वेदान्त हेही नाव. अशी नावं धारण करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर पुरातन संस्कृतीचा वारसा दिलेला असतो. असं सांस्कृतिक ओझं अलीकडे फारसं कोणी बाळगत नाही. पण एक-दोन प्रसंगी नाव आणि आडनावाचे उल्लेख करण्यास भाग पाडले जाते. एक म्हणजे विवाह आणि दुसरे म्हणजे मृत्यूनंतरचे क्रियाकर्म. पण नाव आणि खानदान, कुळाचा खेळ किती जुना काय माहीत? तुमचं गोत्र काय किंवा देवक कुठलं तुमचं? ९६ कुळी की ९२ कुळी? असा प्रश्न विचारणाऱ्यांना नावाचा धागा नक्की कोणाशी जोडायचा असतो? आपली सांस्कृतिक ओळख किती जुनी आहे, हे ठसवत नेण्याची ती प्रक्रिया आहे. ती जुनी ओळख विसरू नका, असाही त्यात अर्थ असतो. पण ती ओळख जपल्याने हाती काय लागतं हेच कळत नाही.

काही प्रश्न कूट आहेत. जगावर स्वामित्व कसं मिळवावं आणि ते कसं राखावं हा अर्थशास्त्राचा उद्देश असल्याचं सांगणारा भारतातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक व्यवहारावर ३२ अक्षरी सहा हजार श्लोक लिहिणाऱ्या कौटिल्याचे नाव का कोणी वापरत नसेल? ‘चाणक्य’ अशी बिरुदावली राजकीय पटावर आता चर्चेत असते; पण विष्णुगुप्त असं नाव पुढे फारसं का रुजलं नसेल? खरं तर जाती आणि पोटजातींच्या खेळात नावांची आणि आडनावांची ओळख लपली आहे. त्यातही शाखा- उपशाखा. हे सारं आलं कोठून? हिरण्यकेशी हे कोकणातलं ब्राह्मण, वसिष्ठ, गौतम यांचं धर्मसूत्र होतं म्हणे. धर्मसूत्र आजही जपलं जावं असा आग्रह असणाऱ्या या जाती आहेत. अत्री हे धर्मशास्त्राचे ग्रंथकार होते. आत्रेय धर्माच्या प्रती डेक्कन कॉलेजात आजही आहेत. उशनस यांनी महाभारतात राजनीतिशास्त्रावर ग्रंथ लिहिले. कण्व, कश्यप असे अनेक धर्मग्रंथातून व्यक्त होणाऱ्या कूळ, गोत्रांचे उल्लेख आजही बेटी व्यवहारात केले जातात.

या साऱ्यातून रंगणाऱ्या वर्णवर्चस्वाच्या खेळात नावाच्या बाबतीत दोन प्रकारचा पगडा दिसतो, एक म्हणजे धर्म आणि दुसरे म्हणजे पर्यावरण. विशेषत: महिलांची ओळख पर्यावरणाशी संबंधित असावी अशी रचना असेल का? सर्व नद्यांची नावे आठवून बघा. गंगा, जमुना, भागीरथी, नर्मदा, कावेरी, शरयू, सरिता अशी किती तरी नावे आठवतील. मैत्रयी आणि गार्गी ही नावे अलीकडे जरा पुन्हा पुढे आली. या दोन महिला तपस्वींच्या नावाची भर अलीकडे पडली आहे. पण त्यांचं काम काय होतं, हे माहीतच नाही. पुरुषांच्या नावामध्ये राम, कृष्ण, हरी, शिव सामावलेले. धार्मिक पगडा अधिक. सूर्य आणि तारे त्याची नावेही समाजाने स्वीकारली. ती ऊर्जा आणि तेज अंगी यावे असे मनात असावे एखाद्याच्या. आपल्या मुलाचं नातं थेट ईश्वराशी असावं असं वाटण्याच्या मानसिकतेतून आपल्या पूर्वजांनी आपली नावं ठरवली. मग धर्म कोणताही असो. एखाद्या मोहल्ल्यात मोहम्मद नावाने हाक मारली तर शंभर जण हात वर करतील, अशी स्थिती. जगण्याची ओळखच ईश्वराशी किंवा धार्मिक सर्वोच्च स्तरावर असावी, असं ते तत्त्व.

कूळ, खानदान, जात यातील व्यावसायिक ओळखही बऱ्याचदा टिकलेली दिसून येते. त्या जातीचा इतिहास त्या आडनावात सामावलेला असतो कधी कधी. गावाचा पाटील, देशमुख हे सारा वसूल करण्यासाठी नेमलेली महसुलाची पद्धत होती. अशी कामे करणाऱ्यांची संख्या आणि त्यांचा मानमरातब आडनावामध्ये दिसत राहिला, तर त्यातून वर्चस्व निर्माण करणे सुलभ ठरते, हे अलीकडच्या काळात अधिक सोपे राजकीय गणित ठरल्याने लाखोंच्या सभेत ‘पाटील, पाटील’ अशी घोषणा देणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. अन्यथा जो व्यवसाय ती आडनावे अशी पद्धतही रुजली होती. रंगकाम करणाऱ्याचे आडनाव रंगारी. लोहार, सोनार अशी आडनावेही आहेत. पहिले नाणे पाडणारा कारखाना जिथे तयार झाला ते स्थान टांकसाळ. आता अनेकांचे आडनावच टाकसाळ आहे. पडवळ, जोंधळे ही आडनावे कृषी व्यवसाय सुचविणारी. अनेकदा स्थान किंवा भूमी कोणती हेही आडनावातून दिसते.

कुडाळकर, तडवळकर, भांडारकर, तावशीकर, धाराशिवकर, लातूरकर असे स्थानमाहात्म्य असणारी नावे आपल्याभोवताली असतात. काही नावे, आडनावे, गावाची नावे अपभ्रंशातून निर्माण होतात. मांजरसुंभा नावाचे एक गाव मराठवाड्यात आहे. खरे तर या गावाच्या एका टोकावर उभे राहिले, की त्या सुभ्याचा म्हणजे प्रदेशाचा भाग दिसतो. मूळ उच्चार शब्द होते ‘मंजर – ए – सुभा’ पुढे त्याचे मांजरसुभा झाले. असे अनेक आडनावांचे झाले. उदा. कुळकर्णी आडनावातील ‘ळ’ शब्दाची जागा ‘ल’ अक्षराने घेतली असावी किंवा एक नाव व्यवसायाशी आणि दुसरे कुलधर्माशी जोडलेले असू शकते. पण आडनावाचे मूळ जेव्हा धर्म आणि जातीशी जोडले जाते तेव्हा अस्मिता अधिक भूतकाळात जातात. ती जात वर्णव्यवस्थेत जेवढ्या उंचीवर तेवढा त्याचा अभिमान अधिक, अशी मनोभूमिका आजही बाळगली जातो. त्यामुळे एकाच वेळी आम्ही खानदानी आहोत, असा अभिमानही बाळगायचा आणि त्याच वेळी त्याच जातीसाठी आरक्षणही मागायचे असा यातील विरोधाभास. आडनाव आणि जातीचं रूप एकच आहे, हे मान्य झालं असल्याने पहिल्या नावावरून जात लक्षात आली नाही, तर माणसं थबकतात, मग आडनाव विचारतात. त्यातूनही जात कळालीच नाही तर मग पाहुणेराऊळे विचारून पाहतात. मूळत: जात विचारायची असते. जात ही माणूसपणाच्याही वरचढ ठरते तेव्हा मग आडनाव काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागतो.

महाराष्ट्राच्या पोलीस दलातील एका अधिकाऱ्यास असे करावेसे वाटते, ही राज्याच्या प्रगतीसाठी चांगली बाब. मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर जात संघर्ष एवढा टोकाला गेला की, बीडच्या पोलीस दलातील आडनाव आणि त्यातील जात शोधण्याचा धंदाच अनेकांना लागला. सामाजिक गुंतागुंत वाढत असल्याने या जिल्ह्यातील पोलिसांच्या नावासमोर आडनाव काढून टाकण्याचा निर्णय झाला. नवनीत कॉवत या पोलीस अधिकाऱ्याने आडनाव आणि जात यांचं घट्ट नातं ओळखलं. हा प्रयोग खरं तर धोरण म्हणूनच स्वीकारला पाहिजे.

नावातला धर्म, त्यातील जात सार्वजनिक पातळीवर तशी निरुपयोगीच. पण ती आपण जपतो. किंबहुना त्याचं संघटित रूप दिसत राहावं यासाठी आवर्जून प्रयत्न केले जातात. त्याला राजकीय नेते खतपाणी घालत असताना आडनाव काढून टाकण्याचं एक पाऊल पुढे पडतं. मध्यंतरी बदलीच्या पत्रावरून (टीसी) जात हटविण्याचीही मागणी झाली. पण जिथं जातनिहाय जनगणना किती आवश्यक आहे, हे पटवून दिलं जात आहे तिथे माणूसपण जातीपेक्षा मोठं असतं हे कोण सांगणार? त्यामुळे नावात काय आहे या प्रश्नाचे मूळ शोधणाऱ्या शेक्सपिअरच्या पात्राला नावाबाबतचे हे वर्णवर्चस्ववादी संदर्भ आणि जातीची एवढी गुंतागुंत कळाली असती तर पात्रांची रचनाच बदलली असती. नावात काय आहे हा प्रश्न समोर आलाच, तर किमान नावांमधील जातीचे संदर्भ तरी गळून पडावेत, असा विचार मनाच्या कप्प्यात ठेवायला काय हरकत आहे? पण असे होण्याची शक्यता सध्या कमीच.