भारतीय महिला क्रिकेट संघाची अनेक दशकांपासूनची विश्वविजेतेपदाची प्रतीक्षा अखेर गतवर्षी संपली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकत इतिहास घडवला. त्या क्षणी मैदानात समालोचक म्हणून उपस्थित असलेल्या झुलन गोस्वामी, मिताली राज आणि अंजुम चोप्रा या माजी खेळाडूही भावुक झाल्या. ‘हा विजय केवळ आमचा नाही, तर भारतीय महिला क्रिकेटसाठी झगडणार्‍या आणि स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवणार्‍या प्रत्येकीचा आहे,’ असे सांगताना कर्णधार हरमनप्रीतने पूर्वसुरींच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. भारतीय महिला क्रिकेटच्या याच दीर्घ, संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचे सखोल चित्रण आदित्य भूषण यांच्या ‘हर स्टोरी, हर ग्लोरी : द मेकिंग ऑफ विमेन्स क्रिकेट इन इंडिया’ या पुस्तकात आढळते.

‘जेन्टलमन्स गेम’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये महिलांना स्वत:चे स्थान निर्माण करणे मुळीच सोपे नव्हते. भारतीय पुरुष संघाने १९३२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, परंतु महिलांना त्यासाठी चार दशकांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर १९७६ मध्ये भारतीय महिला संघाने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या काळात अपुर्‍या सुविधा, आर्थिक मर्यादा, प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष आणि समाजातील पूर्वग्रह अशा अनेक अडथळ्यांना खेळाडूंना सामोरे जावे लागले. यातून खेळाडूंनी कसा मार्ग काढला आणि ऐतिहासिक यश कसे संपादन केले, याचे अभ्यासपूर्ण लेखन आदित्य भूषण यांनी केले आहे. दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने पुस्तकाचा परिचय करून दिला आहे.

पुस्तकाची सुरुवात ब्रिटिश काळातील महिला क्रिकेटच्या प्राथमिक आणि मर्यादित स्वरूपातील सामन्यांपासून होते. पुढे १९७० च्या दशकात भारतात महिला क्रिकेट संघटित स्वरूपात आकार घेऊ लागल्याचे लेखक दाखवतात. मात्र, या सुरुवातीच्या टप्प्यातील सर्वांत मोठे आव्हान होते सामाजिक मानसिकता. क्रिकेट मुलींसाठी नाहीच, अशी धारणा समाजात खोलवर रुजलेली होती. अशा परिस्थितीत महिला खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि खेळावरील निष्ठाच त्यांच्या वाटचालीची खरी ताकद ठरली.

आदित्य भूषण यांनी या पुस्तकात केवळ सामने, धावा किंवा विक्रम यांची नोंद केलेली नाही, तर त्यांनी या इतिहासामागील मानवी कथांनाही महत्त्व दिले आहे. माजी खेळाडूंच्या मुलाखती आणि अनुभवांमुळे पुस्तक अधिक जिवंत व प्रभावी झाले आहे. आर्थिक अडचणी, शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधण्याची धडपड, तसेच प्रवासातील गैरसोयी यावर मात करत भारतीय महिला क्रिकेटला यशाच्या उंचीवर नेणार्‍या खेळाडूंना या पुस्तकातून योग्य तो सन्मान मिळतो.

भारतीय महिला क्रिकेटच्या संस्थात्मक विकासाचाही यात सखोल आढावा घेण्यात आला आहे. १९७६ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला. मात्र, आर्थिक पाठबळाअभावी काही पदाधिकार्‍यांना आपल्या ठेवी मोडाव्या लागल्या, तर काही खेळाडूंनी आईचे दागिने विकून निधी उभारला. तीन वर्षांनी युरोप, वेस्ट इंडिज आणि अमेरिका दौर्‍यासाठीही परिचितांकडून मदत घ्यावी लागली. पुढील दोन दशकांपर्यंत ही आव्हाने कायम राहिली.

सुरुवातीला स्वतंत्र संस्थेच्या आधिपत्याखाली असलेले महिला क्रिकेट २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) समाविष्ट झाले. महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक निर्णायक टप्पा होता. यानंतर खेळाडूंना आर्थिक स्थैर्य, अधिक चांगल्या सुविधा, व्यावसायिक वातावरण आणि व्यापक प्रसिद्धी मिळू लागली. परिणामी महिला क्रिकेटला नवी गती आणि दिशा प्राप्त झाली. विश्वचषक स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाच्या विजयांमुळे महिला क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढत गेली. त्यातही २०१७ चा विश्वचषक विशेष महत्त्वाचा ठरला. भारताने अंतिम फेरी गाठली. याच स्पर्धेमुळे हरमनप्रीत कौर आणि स्मृती मनधाना यांसारख्या खेळाडू प्रकाशझोतात आल्या. मात्र, अंतिम सामन्यातील पराभवामुळे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले.

भारतीय महिला क्रिकेटसाठी २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी पहाट उगवली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक यशामागील प्रवासाचे अभ्यासपूर्ण कथन आणि या विश्वचषकातील प्रत्येक सामन्याचे विश्लेषणही करण्यात आले आहे.
भाषाशैली साधी, प्रवाही आणि वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे. संशोधन आणि कथन यांचा समतोल लेखकाने साधला आहे. मात्र, काही भागांत केवळ एक-दोन खेळाडूंवरच लक्ष केंद्रित करण्याऐवजी आणखीही काही माजी खेळाडूंचे अनुभव या पुस्तकाला अधिक व्यापक रूप देऊ शकले असते.
पहिल्या कसोटी कर्णधार शांता रंगास्वामी, डायना एडल्जी आणि शुभांगी कुलकर्णी यांची कणखर वृत्ती, त्यानंतर मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी दिलेले स्थैर्य, तसेच हरमनप्रीत, स्मृती मनधाना आणि नव्या पिढीतील खेळाडूंची आक्रमकता व आत्मविश्वास यांना पुस्तकात स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि विविध स्तरांवर योगदान देणार्‍या व्यक्तींच्या भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

आज महिला क्रिकेटमधील आघाडीच्या संघांमध्ये भारताचा समावेश होतो. महिला प्रीमियर लीग, वाढती प्रेक्षकसंख्या, व्यावसायिक गुंतवणूक आणि माध्यमांचे वाढते लक्ष यामुळे भारतीय महिला क्रिकेट वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे. या यशामागे अनेक दशकांचा संघर्ष, त्याग आणि अविरत प्रयत्न दडलेले आहेत. भारतीय महिला क्रिकेटच्या या अद्भुत प्रवासाचा मागोवा घेण्यात आणि त्यामागील मानवी चेहर्‍यावर प्रकाश टाकण्यात हे पुस्तक निश्चितच यशस्वी ठरते. भारतीय क्रिकेटच्या वाटचालीचा अभ्यास करणार्‍यांसाठी पुस्तक उपयुक्त ठरेल.

हर स्टोरी, हर ग्लोरी : द मेकिंग ऑफ विमेन्स क्रिकेट इन इंडिया
लेखक : आदित्य भूषण
प्रकाशक : रूपा प्रकाशन
पृष्ठे : २७२, किंमत : ४९५ रु.