‘इतिहास’ म्हणजे ‘हे असे घडले’ यापलीकडे जाऊन, परस्पर-विसंगतीने भारलेल्या कथनांची विशिष्ट अभ्यासपद्धतींत केलेली विश्लेषक मांडणी. त्याविषयीच्या सूचना-अभिप्राय इत्यादींवरून तयार केलेली संस्करणे, प्रकाशनोत्तर परीक्षणे, परीक्षणांमधून समोर आलेल्या आक्षेप-प्रतिवादांचे शिस्तबद्ध चौकटींत खंडनमंडन असा साधारण व्यवहाराचा पैस असतो. एकीकडे अकॅडमिक अंगाने इतिहासलेखन, संशोधन करणारे अभ्यासक तर दुसर्‍या बाजूला विविध संदर्भांमध्ये इतिहासातील घटनांच्या कथनांवर बेतलेले विविधांगी, बहुमाध्यमीय सादरीकरण करणारे कलाकार, शाहीर, समाजप्रबोधक, व्याख्याते आणि संबंधित इतिहासा-इतिहासजनित कथनांभोवती राजकीय व्यूहरचना करणारे ‘चिंतक’ यांचा परस्परांतील व्यवहार यांच्या मोठ्या गुंतागुंतीच्या संरचना भारतात उभ्या राहिल्या.

अरविंद सिंह यांच्या ‘इंडियाज रोग हिस्टॉरियन्स : हाऊ दे फॉट अगेन्स्ट हिंदूज अँड लॉस्ट’ हे पुस्तक या सर्व प्रक्रियांच्या एक बाजूचे प्रतिनिधित्व करते. तब्बल ८०० पाने खर्चून लिहिलेल्या या ‘संशोधन’पर पुस्तकाचे शीर्षक त्याचा निष्कर्ष काय असणार हे आधीच जाहीर करते. येथे ‘रोग हिस्टॉरियन्स’ आहेत, ‘हिंदूज’ विरुद्ध त्यांचा संघर्ष आहे आणि शेवटी त्यांचा ‘पराभव’ही झाला आहे, अशी मांडणी सिंह करू पाहातात. ‘रोग’ या शब्दातील अभ्यासकांविषयीची शत्रूलक्ष्यी जाणीव संशोधकीय भूमिकेच्या दाव्याला पातळ करते. ‘संशोधनउद्योगा’ची दिशा आणि बांधिलकीचा ‘पोत’ काय आहे हेदेखील शीर्षकातूनच अधोरेखित होते.

कोणत्याही ऐतिहासिक घटनेचे सुसंगत-विसंगत आयाम समोर आणणे हे अभ्यासकाचे काम असते, मात्र सिंह यांचा हा जाडजूड ग्रंथ भारतातील विविधांगी, बहुसंदर्भीय इतिहासलेखन परंपरांचा समग्र विचार न करता अयोध्या, रामजन्मभूमी आणि त्याभोवतीच्या इतिहासलेखनासंदर्भात झालेल्या वादांचा सखोल ऊहापोह करण्याचा दावा करते. वैचारिक, अकॅडमिक मतमतांतरांचे रूपांतर वैचारिक पूर्वग्रह करून घेण्यात-देण्यात होणे, त्या पूर्वग्रहांद्वारे एका विशिष्ट पद्धतीच्या मांडणीला तुच्छ, धर्म/देशद्रोही मानणे, अभ्यासकसमूहाला शत्रूलक्ष्यी रीतीने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे ही रीत आपल्या परंपरेला नवी नाही. या रीतीला पर्यायी मांडणी करणार्‍यांना धर्म/ समाज/ राष्ट्रद्रोही ठरवून त्यांच्याविषयी आणि त्यांच्या संशोधनरीतींविषयी एकांगी आरोपांतून द्वेषभावना पसरवणे, हा उद्योग गेली काही दशके आपल्या देशात मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यातून रूढ झालेल्या राजकीय नीतीची आणि अकॅडमिक अभिनिवेशाआडून केल्या जाणार्‍या शत्रूलक्ष्यी मांडणीची नवी व प्रगत आवृत्ती म्हणून या ग्रंथाकडे पाहावे लागेल.

व्यावसायिक-अकॅडेमिक शिस्त आणि इतिहासविवेक जागृत असलेल्या अभ्यासकांना त्यांच्या-त्यांच्या संबंधित वैचारिक चौकटींमुळे काही पुरावे अधिक महत्त्वाचे आणि काही कमी महत्त्वाचे वाटू शकतात. त्यांच्या पक्षपाती जाणिवाही मर्यादित किंवा कधीकधी अकॅडमिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन अधिक ठळकपणे समोर येतात. या ग्रंथाच्या ‘ब्लर्ब’वर प्रकाशित केलेल्या काही ‘नामवंत’ अभ्यासकांच्या नावांवरून हीच गोष्ट अधोरेखित होते. पण त्या अभिप्रायांमधून आणि ग्रंथातही जागोजागी दिसणार्‍या न्यूनगंड/ पराभवगंडग्रस्त अशा समूहलक्ष्यी जाणिवा समाजात सर्व वैचारिक वर्गांमध्ये सातत्याने दिसून येतात. अभ्यासकीय प्रणालीमध्ये नवीन पुरावा किंवा नवी, प्रतिवादात्मक सैद्धांतिक मांडणी समोर आल्यानंतरही अनेकदा एखादा अभ्यासक जुन्या निष्कर्षाला चिकटून राहू शकतो. पण त्यामुळे यापैकी कोणतीही गोष्ट आपोआप पूर्णत: ‘खोटी’ इतिहासरचना किंवा ‘फॅब्रिकेशन’ असल्याचे सिद्ध होत नाही. विश्लेषणात्मक चूक, पूर्वग्रह, पद्धतदोष आणि जाणीवपूर्वक बनावटपणा या चार परस्परांवर प्रभाव टाकणार्‍या पण मूलत: स्वतंत्र गोष्टी आहेत. सिंह मात्र त्यांच्या लेखनात या चारही गोष्टी अनेकदा एकमेकांत मिसळताना दिसतात.

इतिहासलेखन आणि कथानकातील फरक

अयोध्येच्या संदर्भात सिंह यांच्याकडे काही गंभीर आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखे मुद्दे आहेत. १९९१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इतिहासकारांच्या अहवालानंतर २००३मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) उत्खनन केले. संबंधित इतिहासकारांनी बी. बी. लाल यांच्या उत्खननातील सर्व मूळ सामग्री प्रत्यक्ष पाहिलेली नव्हती. पुढे न्यायालयीन प्रक्रियेत काही तज्ज्ञांच्या साक्षी, विशेषत: सूरज भान आणि डी. मंडल यांच्या भूमिकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एएसआयच्या उत्खननात मशिदीखाली एक मोठी पूर्वीची वास्तू असल्याचे आणि तिच्या स्वरूपात हिंदू धार्मिक वास्तुशैलीशी संबंधित वैशिष्ट्ये असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले.

पण सर्वोच्च न्यायालयाने ‘डाव्या किंवा उदारमतवादी इतिहासकारांनी इतिहास बनावट केला’ असा कोणताही निकाल दिलेला नाही. न्यायालयाने एखाद्या संघटित वैचारिक कटाचा शोध लावलेला नाही. रोमिला थापर, इरफान हबीब, आर. एस. शर्मा, डी. एन. झा, सूरज भान इत्यादी सर्वजण एका एकसंध राजकीय मोहिमेचा भाग होते, असेही न्यायालयाने म्हटलेले नाही. उलट, न्यायालयाने मशिदीखाली पूर्वीची हिंदू धार्मिक स्वरूपाची वास्तू असल्याचे मान्य करतानाच, ती वास्तू का नष्ट झाली वा ती मशिदीच्या बांधकामासाठीच पाडली होती का, हे पुरातत्त्वीय पुराव्याने सिद्ध होत नाही, हे स्पष्ट केले. तिथे रामाचे मंदिर असल्याचे वा त्याचा रामायणाशी संबंध असल्याचे पुरावे आढळल्याचा उल्लेख त्यात नाही. हा फरक किरकोळ नाही. इतिहासलेखन आणि त्याभोवती उभ्या राहणार्‍या राजकीय कथानकातील फरक यातून अधोरेखित होतो.

‘पपेटियर’ कुठे आहे?

सिंह यांच्या सार्वजनिक मांडणीत इरफान हबीब यांना ‘पपेटियर’- म्हणजे पडद्यामागून सूत्रे हलवणारा- असे संबोधले आहे. ते सूत्रधार असल्याचा पुरावा कुठे आहे? असल्यास तो समोर का आणला गेला नाही? सिंह यांनी काही इतिहासकार एकमेकांना ओळखत होते, समान मतप्रवाहात होते, असे म्हटले आहे, यावरून ते ‘सूत्रधार’ असल्याचे सिद्ध होत नाही. बौद्धिक प्रभाव आणि संघटित कारस्थानात फरक आहे. या कटाविषयीचा पत्रव्यवहार कुठे आहे? कथित षडयंत्रा-संदर्भातील चिठ्ठ्या/ सूचना लेखकाच्या हाती लागल्या आहेत का? याविषयी संस्थात्मक नोंदी कुठे आहेत? असे अनेक प्रश्न इथे उपस्थित करावे लागतात. त्याविषयीचा पुरावा जोवर सिंह किंवा अन्य मंडळी सादर करीत नाहीत, तोवर कुणालाही ‘पपेटियर’ म्हणून संबोधणे, हा केवळ लेखकाचा हेत्वारोप ठरतो.

‘मार्क्सवादी इतिहासकार’ संशयास्पद श्रेणी

अशा समधर्मी पुस्तकांत सातत्याने दिसणारी रंजक आणि तितकीच गंभीर बाब म्हणजे सरसकटपणे सर्व अभ्यासकांना ‘मार्क्सवादी इतिहासकार’ या श्रेणीमध्ये बसवण्याची हास्यास्पद रीत. पुस्तकात ज्यांच्यावर आरोप केले आहेत असे आर. एस. शर्मा, इरफान हबीब, रोमिला थापर, डी. एन. झा आणि सूरज भान हे सर्व एकाच अभ्यासकीय, वैचारिक चौकटीत बसवावे, असे इतिहासकार नव्हेत. त्यांच्या अभ्यासाचे विषय वेगळे होते, पद्धती वेगळ्या होत्या आणि वैचारिक भूमिकांमध्येही फरक होते. वास्तवात इतिहासकाराचे कामच अनेकदा अशा सोयीस्कर सामूहिक श्रेणींचे विघटन करणे असते. उदाहरणार्थ मुस्लीम शासनकाळ म्हटले की त्यात विविध शाह्या, त्यांच्या भूमिका, त्यांत झालेले बदल, त्या त्या स्थल-काळाच्या संदर्भांतील गतिमानतेनुसार त्यांच्या शासनपद्धतींत झालेले बदल इत्यादी अनेक गोष्टी या अत्यंत गुंतागुंतीच्या बहुपेडी आहेत. त्यांच्या मांडणीमध्येही पुरावे, साधने आणि साधनचिकित्सेच्या गतीनुसार परिवर्तन होत राहात असल्याचे सातत्याने दिसते.

सिंह यांच्या मांडणीमध्ये मात्र सारे एकसाची असल्याचे गृहीतक दिसते. विविध पद्धतींनी काम करणार्‍या अनेक विद्वानांना ते एकाच छत्राखाली बसवतात आणि या कल्पित छत्राला एकसंध वैचारिक हेत्वारोपांची वीण असल्याचे सांगत राहातात. मग त्याआधारे त्यांच्या स्वतंत्र लेखनाचे अर्थ लावतात. अशा लेखनाच्या प्रभावाला कमकुवत करण्याचे सामर्थ्य शिस्तबद्ध इतिहासचिकित्सेत असते, हे मात्र त्यांना लक्षात आल्याचे दिसत नाही.

अयोध्येपासून फाळणीपर्यंत

सिंह यांच्या अन्य लेखनातही त्यांच्या या ग्रंथांतील जाणिवा अधिक स्पष्ट होतात. एका संकेतस्थळावरील त्यांच्या लेखात ते मोहम्मद हबीब यांच्यापासून रोमिला थापर यांच्यापर्यंतच्या इतिहासकारांना मुस्लीम विभाजनवादाचे ‘व्हाइटवॉशिंग’ करणार्‍या, हिंदूद्रोही मार्क्सवादी परंपरेत बसवू पाहातात. त्याच संकेतस्थळावरील अन्य एका लेखात नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ला ते कथित-कल्पित मार्क्सवादी इतिहासदृष्टीच्या संस्थानीकरणाशी जोडतात. हे लेख उद्धृत करण्याचं कारण लेखकाला अभ्यासकांची एक मोठी परंपरा ‘रोग’, धर्मद्रोही वाटण्या-मागील वैचारिक जाणीव कशी विकसित झाली असावी याचा अदमास लावणे हे आहे. द्रोह केला जाणारा आणि तळी उचलली जाण्याचा ‘मान’ मिळणारा धर्म या दोन्ही संरचना एकसाची आहेत अशी दृढ भावना लेखकाच्या ‘बौद्धिक नेणीवे’त सखोल रुजली आहे. अशी जाणीव संबंधित धर्मांतील अंतर्गत प्रवाहांच्या इतिहासवरच नव्हे तर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम, त्यांच्या अवतारकार्याचे शब्दांकन करणार्‍या सर्व काव्यात्म-गद्यात्म रचना, त्यांतील परस्पर विसंगत तपशील, भौगोलिक, सांस्कृतिक जाणिवांवरही अन्याय करते. अयोध्येसंदर्भात आणि धर्मजाणिवांच्या संदर्भात बहुरंगी चित्रे समकालीन वृत्तांतातून समोर येतात. पेणजवळील वरसई गावातून निघून ‘हिंदुस्थानात जाण्याला विरोध करणार्‍या वडिलांची मनधरणी करून’ उत्तरेकडे जाणार्‍या आणि १८५७ च्या उठावाचे ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव घेत त्या प्रवासाचे आपल्या सश्रद्ध, वेद-धर्मनिष्ठ दृष्टीतून चित्रण करणार्‍या गोडसे भटजींच्या लिखाणामध्ये दिसून येणार्‍या जाणिवा पाहिल्या तरी पुरे.

भारतातील विद्यापीठीय इतिहासलेखनाची निर्मिती अनेक संस्था, पिढ्या, पद्धती आणि वैचारिक प्रवाहांनी केली. मार्क्सवाद त्यातील एक महत्त्वाचा प्रवाह होता; तो संपूर्ण इतिहासाचे सर्वप्रामाणिक संस्करण म्हणून मार्क्सवादी गटांतही कधीही स्वीकारला गेला नाही. मात्र नेहरूंना या संपूर्ण प्रक्रियेची ‘मास्टर की’ बनवले की पुढचा तपशील आपल्याला अपेक्षित कथानकाला अनुकूल ठरवण्यासाठी सहजसोपा होतो हे लेखकाला उमगले आहे.

विसंगतीपूर्ण साधर्म्य

सिंह ज्या पद्धतीविषयी त्यांच्या विरोधकांवर टीका करतात, त्याच पद्धतीचा काही अंश त्यांच्या स्वत:च्या लेखनातही दिसतो. त्यांचा आरोप असा, की इतिहासकारांनी आधी वैचारिक निष्कर्ष ठरवला आणि नंतर पुरावे निवडले. या आरोपाचा प्रतिवाद करण्यासाठी त्यांच्या ग्रंथाचे शीर्षकच पुरेसे ठरावे. समोरचा प्रतिवादी इतिहासकार वैचारिक चौकट घेऊन पुराव्याकडे पाहतो, असे म्हणताना आपण स्वत:ची वैचारिक चौकट पुराव्याची निवड आणि मांडणी कशी केली जाते हे दाखवून देण्यास हे शीर्षक सर्वसमर्थ आहे.

विश्लेषणात्मक ‘चूक’ नव्हे ‘फसवणूक’

सिंह यांच्या पुस्तकाच्या चिकित्सेसाठी कदाचित सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे ‘फॅब्रिकेशन’. एखाद्या इतिहासकाराचा निष्कर्ष चुकीचा असू शकतो, तो अपुर्‍या पुराव्यांवर आधारित, पूर्वग्रहदूषित असू शकतो, तो नवीन पुराव्यांमुळे कालबाह्य ठरू शकतो, पण ‘त्याने इतिहास खोट्या रीतीने समोर आणला’ हे सिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी वस्तुनिष्ठरीतीने दाखवाव्या लागतात. त्या न दाखवता धार्मिक-सांस्कृतिक असुरक्षिततांचा आधार घेत हेत्वारोप केले की विश्लेषणात्मक चूक आणि समाजाची फसवणूक यांच्यात असलेले महदंतर बेमालूमरीतीने कमी करून फसवणुकीच्या प्रक्रियेचे खरे भागधारक होण्याचा मान सहज मिळतो.

हे पुस्तक निरुपयोगी आहे का, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. ते वाचनीय आहे. मात्र, सिंह ज्या पद्धतीने वाचण्यास सांगतात त्या पद्धतीने नव्हे. १९९१च्या अहवालाची मर्यादा, नंतर उपलब्ध झालेला पुरातत्त्वीय पुरावा, काही तज्ज्ञांच्या साक्षीतील समस्या आणि अकॅडमिक अर्हता ही कायमच सार्वकालिक प्रामाण्याची हमी नसते, याचे त्यांनी करून दिलेले स्मरण ‘आजच्या काळात’ महत्त्वाचे आहे. किंबहुना याच निकषांमुळे त्यांच्या पुस्तकाची चिकित्सा करणे अधिक महत्त्वाचे ठरते.
इंडियाज रोग हिस्टॉरियन्स : हाऊ दे फॉट अगेन्स्ट हिंदूज अँड लॉस्ट
लेखक- अरविंद सिंह
प्रकाशक- रीडक्स प्रकाशन
पृष्ठे- ८००, किंमत- ७०० रु.
rajopadhyehemant@gmail.com