चित्ततोष खांडेकर
नदीकाठांवर असंख्य घरांची बेकायदा वस्ती, तिचं मलमूत्र थेट नदीतच आणि शहरभराचं सांडपाणीही अखेर नदीला मिळतंय; नदीचे किनारे हे अनधिकृत कचराडेपोच… अशा अवस्थेतून इंडोनेशियातली ‘कारांग मुमुस’ नदी बाहेर पडली; तीही स्थानिक प्रशासनाच्या मदतीविना…

ही गोष्ट  १९७०च्या दशकातली. इंडोनेशियाच्या कालिमंतन प्रांतांतल्या समरिंडा शहरात एक ७-८ वर्षांचा मुलगा कारांग मुमुस नदीच्या काठावर खेळत होता. त्याचे आजोबा त्याच्यावर लक्ष ठेवून होते. इतक्यात त्यानं झाडावरचं रामबूटान फळ तोडून  पटकन खाल्लं. त्याची साल आणि बी तो नदीत फेकायला काठावर गेला. ते तो  नदीत फेकणार इतक्यात आजोबांनी त्याला हटकलं, ‘मिसमान, बी नदीत फेकलं तर नदी खराब होईल, तेच जर जमिनीत अंकुरलं तर त्यातून नवीन रोप आकार घेईल’ हे ऐकताच त्यानं फळाचं बी जमिनीत टाकलं आणि झाड येण्याची वाट पाहू लागला. पण  खरंतर त्या आजोबांनी नदीस्वच्छतेचं  बीजच चिमुकल्या नातवाच्या- ‘मिसमान’च्या मनात पेरलं होतं, ज्यातून भविष्यात एका आगळ्या- वेगळ्या नदीसुधार प्रयोगाचा जन्म झाला.

समरिंडा शहराच्या मधोमध वाहाणारी जवळपास ३०-४० किमी लांबीची कारांग मुमुस नदी शहराच्या वेशीजवळ महाकाम नदीला जाऊन मिळते. शेकडो वर्षं ही नदी, समरिंडाची जीवनवाहिनी होती. ही नदी एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होती. समरिंडातली बर्‍यापैकी वाहतूकही या नदीमार्गेच व्हायची. या नदीत असंख्य प्रकारचे मासे आढळायचे. हे मासे स्थानिकांच्या आहाराचा अविभाज्य घटक होते. नदीकाठावर फळांची, दुर्मीळ फुलांची, अस्सल इंडोनेशियन झाडंही होती. नदीची अनोखी परिसंस्थाच इथं अस्तित्वात होती. पण हळूहळू शहर मोठं होतं गेलं. टेंपे आणि टाहूचे उद्योग  नदीकाठावर उभे राहिले.

टेंपे आणि टाहू हे सोयाबीनपासून तयार केले जाणारे प्रथिनयुक्त  खाद्यपदार्थ. त्यांना इंडोनेशियात प्रचंड मागणी आहे. हे पदार्थ बनवायला नदीतून पाणी कारखान्यांमध्ये घेऊन, सांडपाणी पुन्हा नदीत सोडलं जाऊ लागलं. तसंच या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी शहरात स्थलांतर झालं. तेव्हा या नव्या स्थलांतरितांसाठी घरं, इमारतींंचं, काँक्रीटचं जंगलच उभं राहू लागलं. काँक्रीटचा सगळा कचरा नदीत फेकला जाऊ लागला. या दोन व्यवसायांच्या साथीनं अनेक जोडव्यवसायही शहरात उभे राहू लागले. या सगळ्या ठिकाणी काम करणारा श्रमिक वर्ग शहरांत येऊन वस्ती करू लागला. शहरात जमीन वा घरं घेण्याइतकं वेतन या वर्गाकडे नव्हतं. तेव्हा आपल्या छोटेखानी झोपड्या आणि कौलारू घरं बांधून राहायला त्यांनी सुरुवात केली. त्यात सगळ्यात  महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता. तो सोडवायसाठी ही घरटी कारांग मुमुस नदीच्या काठावरच उभी राहिली.

हे श्रमिक नदीतच आंघोळ करत, नदीतच शौच करत आणि सगळा कचराही नदीतच फेकत. ही वसाहत अर्थातच बेकायदा होती, त्यामुळे हे लोक नदीप्रदूषण करत असल्याची टीका चहूबाजूने होत होती. पण कायदेशीर वस्त्यांची आणि उद्योगांची अवस्था काय होती? त्यांच्यातून  सांडपाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहणार्‍या नाल्यांमध्ये सोडलं जात होतं. हे नाले परत नदीशीच जोडले होते. म्हणजे, शहराचं सगळंच औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी हे नदीतच सोडलं जात होतं. शिवाय बेकायदा वस्त्यांमध्ये राहणार्‍या आणि वेगानं वाढणार्‍या शहरासाठी कचर्‍याचा निचरा करायची व्यवस्था नव्हती.  तेव्हा नदीकिनारे अघोषित कचरा-डेपो झाले. कचर्‍याचे ढीगच्या ढीग या किनार्‍यावर उभे राहिले. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा होता.  सूक्ष्म प्लास्टिकचे कण माशांच्या पोटात जाऊ लागले. यामुळे नदीतील माश्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या, केवळ एकच प्रजाती कशीबशी तग धरून राहिली.  नदीकिनारी होणारी वस्ती आणि कचर्‍याच्या ढीगांमुळे नदीकाठची झाडझुडपं मेली वा तोडली गेली.

नदीचं पात्रही वाढत्या वस्तीमुळे अरुंद झालं आणि नदी फक्त कालवा होऊन बसली.  इथे दुथडी भरून वाहणारी स्वच्छ नदी १९७०च्या दशकापर्यंत होती, हे २१व्या शतकात  सांगताच येत नव्हतं. पण महानगरपालिकेकडे सतत वाढणार्‍या कचर्‍याचं नियोजन आणि व्यवस्थापन करण्याइतके स्त्रोत नव्हते. नदीप्रदूषण रोखण्यासाठी बेकायदा वस्ती हटवण्यापलीकडे दुसरं कोणतंही ठोस धोरणसुद्धा नव्हतं.

नदीकाठीच मोठा झालेला मिसमान हे सारे पाहत होता. स्थानिक वर्तमानपत्रांमधून तो हे लिहूही लागला होता.  पण जे स्थानिक राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नव्हतं ते मिसमाननं ओळखलं  होतं : ‘नदीशिक्षणाची गरज’. नदी अस्वच्छ आहे हे नागरिकांना कळत होतं; पण असं नेमकं का होतंय हे त्यांना आकळत नव्हतं. नव्या पिढीला हा पाण्याचा नाला एकेकाळी नदी होती, हेही माहीत नव्हतं. नदीचं अस्तित्व आणि तिचं होणारं नुकसान, त्यात  नागरिकांचं कळत-नकळत असलेलं योगदान या कशाचीच काडीचीही कल्पना त्यांना नव्हती. तेव्हा याचं शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते कृतीतूनच देता येईल अशी मिसमानची ठाम धारणा होती. 

मिसमाननं २०१०च्या सुमारास प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. तो नदीकाठचा कचरा उचलून किनारा स्वच्छ करू लागला. नदीकाठावर जनजागृतीसाठी एकपात्री पथनाट्याचे प्रयोग करू लागला. या प्रयोगांत तो एकटा, नदीशीच संवाद साधायचा. रोज सकाळी दुचाकीवर जाऊन नदीकिनारा स्वच्छ करणं आणि नदीशी संवाद साधणे हा त्याचा नित्यक्रम झाला. या प्रकारामुळे मिसमानला स्थानिक लोक वेडा समजायला लागले.  ज्यांना थोडंफार कळत होतं, ते एकट्याच्यानं काय होणार आहे असं म्हणत त्याची निर्भर्त्सना करायला लागले.  पण मिसमानची ओढ पाहून हळूहळू त्याचे मित्र त्याच्यासह येऊन किनार्‍यावरचा कचरा उचलू लागले.

नदीकाठच्या रहिवाशांना किनारा स्वच्छ होताना दिसू लागल्यावर  तेही यात सहभारी झाले. एका प्रसिद्ध कॅफेच्या मालकानं तर नदी स्वच्छ करा आणि मोफत कॉफी घ्या अशी योजनाही काढली. कोणी या अभियानासाठी पैसे दिले, कोणी  श्रमदान केलं, कोणी उपकरणं दिली तर कोणी ज्ञान दिलं. नदीकिनारा साफ केल्यावर तिथे पुन्हा कचर्‍याचे ढिगारे उभे राहू नयेत, म्हणून शोधून शोधून स्थानिक वृक्षांची रोपटी नदीकाठी पेरली गेली. यातून दहा वर्षांत किनार्‍यावर हिरवीगार वृक्षराजी उभी राहिली आणि स्वच्छ हवा खेळू लागली. याची दखल थेट केंद्र सरकारनं घेऊन, वृक्षरोपणासाठी मोठा निधी देऊ केला. नदीपात्रातील कचरा साफ करायला काही धनिकांनी होड्या दिल्या. मुख्य म्हणजे या सगळ्यात स्थानिक सरकारचा कुठलाही पाठिंबा नव्हता. आता होड्यांमधून फक्त नदीतला कचरा साफ होत नाही, तर नदीपर्यटनही सुरू झालं आहे. किनार्‍यावरून उचलेल्या कचर्‍याच्या साहाय्यानं विटा (इको-ब्रिक्स) बनवण्याचं तंत्रज्ञानही विकसित केलं गेल्यामुळे, या कचर्‍याचं पुढे काय करायचं हा प्रश्नही मिटला.  तसंच नदीत येणारं सांडपाणी कमी करण्यासाठी दररोज नाल्याची स्वच्छताही मिसमानचे सहकारी करायला लागले.

पण हे सगळे आपल्यापुरतंच मर्यादित राहून चालणार नाही. पुढच्या पिढीचा नदीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलायला हवा, हे मिसमानला पदोपदी जाणवायचं. यासाठीच त्यानं नदीकाठी २०१६ मध्ये आगळीवेगळी ‘नदीशाळा’ सुरू केली. ही नदीशाळा म्हणजे तासंतास वर्गात बसून खर्डेघाशी करायला लावणारी शाळा नाही. तर नदीबद्दलचे आपले अनुभव, त्यातून येणारं ज्ञान लोकांना चालत-बोलत सांगणारी आणि कृतीतून शिकायला उद्युक्त करणारी शाळा आहे. या शाळेत शिक्षक-विद्यार्थी अशी काही उतरंड नाही. सगळेच अनुभवातून शिकत नवनवे प्रयोग करणारे सहअध्यायी आहेत.

समरिंडातल्या शाळा-कॉलेजांचे अनेक विद्यार्थी या शाळेत दररोज येतात. कचरा उचलणं, नदीची सांस्कृतिक आणि तिच्या परिसंस्थेची माहिती घेत वृक्षारोपण करणं, कचर्‍यापासून विटा बनवणं, नदीशी निगडित इतर समस्यांची माहिती घेऊन उपाय शोधणं हे सारं या शाळेत दररोज चालतं. या शाळेत दाखल व्हायला वयाचं कोणतेही बंधन नाही. इंडोनेशियातल्या अनेक विद्यापीठांनी या शाळेत आपल्या विद्यार्थ्यांनी शिकायला, संशोधन आणि नवे प्रयोग करायला पाठवलं. यातून नदीसुधार मोहिमेला गतीही आली, आणि शहरातल्या आणखी काही ठिकाणचे किनारे स्वच्छ झाले. अजूनही बर्‍याच ठिकाणी कचर्‍याचे ढीग उभे राहातच आहेत, पण आता एक नदीवर प्रेम करणारी पिढी तयार होत असल्यामुळे त्यांचे प्रश्नही सुटतील असा मिसमानला विश्वास आहे.

फक्त बोलून आणि टीका करून नव्हे, तर कृतीतून आणि ‘नदीशिक्षणा’तून  प्रदूषणाचे प्रश्न सोडवता येतात, हा संदेश ही कथा देते. नदीशिक्षणातून नदीप्रेमाचं बीज अंकुरलं तर पुढच्या पिढ्या नदीस्वच्छतेची एकत्र येऊन जबाबदारी घेतात, ही अनुकरणीय बाबही महत्त्वाची! पण नदीकाठचे समूहच एकत्र नसतील तर काय करायचं, हे पुढल्या लेखात समजून घेऊ.

नदी विषयक संशोधक अभ्यासक

chittatoshresearch@gmail.com