‘तत्त्वज्ञानात एमए झालेली एक बंगाली महिला पाकिस्तानात- लाहोरमध्ये वाढलेली असल्याने, तेथेच ती भरतनाट्यमचे वर्ग घेऊ लागली आणि किमान दोन हजार पाकिस्तानी नर्तकांना तिने घडवले’ – हा असंबद्ध किंवा अर्थहीन वाक्याचा नमुना नव्हे… इंदू मिठा यांनी जगलेले आयुष्य आहे हे! या पाकिस्तानी नृत्यगुरू इंदू मिठा ३१ ऑगस्ट रोजी डब्लिन येथे निवर्तल्या.

इंदू मिठा या मूळच्या इंदू चटर्जी आणि त्यांचा जन्म १९२९ सालच्या लाहोरमधला. त्यांच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, तर त्याहीआधीच्या पिढीतले नातेवाईक ब्राम्हो समाजाचे सदस्य होते. विचारस्वातंत्र्याला धर्माच्याही मर्यादा नसण्याचा संस्कार असलेल्या कुटुंबात त्या वाढल्या. लाहोरच्या ‘ईस्ट पंजाब युनिव्हर्सिटी’त शिकल्या. कदाचित पदवीपूर्व शिक्षण घेतानाच त्यांचे सूर मूळचे मुंबईकर असलेले अबूबकर उस्मान मिठा यांच्याशी जुळले असावेत… पण विवाह मात्र १९५१ मध्ये झाला. तेव्हा ‘सेक्युलर पाकिस्तान’ उभारण्याच्या बॅ. जिना यांच्या भाषणांनी त्या देशातले अनेकजण भारावले होते, त्यापैकीच इंदू यांना ओळखणारे आणि लष्कराची चाकरी पत्करणारे अबूबकर मिठा हे एक. पण चटर्जी कुटुंब तर फाळणीच्या वेळी लाहोरातून दिल्लीस आले होते. तरीही प्रेमाखातर इंदू चटर्जी यांनी पाऊल उचलले- त्या परत लाहोरला आल्या आणि लग्नानंतर इंदू मिठा झाल्या.

माहेरच्यांनी इंदूला लहानपणापासूनच मोकळीक दिली होती. तिला नृत्याची आवड म्हणून थेट चेन्नईनजीक, रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या ‘कलाक्षेत्रा’त भरतनाट्यम शिकण्यासाठी पाठवण्यात आले. मग, त्या वेळी जगभर गाजत असलेल्या उदय शंकर यांच्या नृत्यनाट्य-शैलीचे धडे घेण्यासाठी इंदू अल्मोडा इथे राहिल्या. तिथे झोहरा  आणि कामेश्वर सेहगल यांच्याकडून शिकल्या (झोहरा सेहगल पुढे मुंबईत परतल्या आणि त्यांनी हिंदी चित्रपटांत अभिनय केला). इंदू यांच्या बहिणीने चेतन आनंद (चित्रपट दिग्दर्शक) यांच्याशी विवाह केला. त्यामुळे इंदू यांच्या लग्नाच्या निर्णयाला घरच्यांचा विरोध वगैरे झाला नाही. इंदूचे आयुष्य इंदूने निवडले, इतकेच.

हे आयुष्य सार्थक झाले, ते पाकिस्तानात आल्यावरच. जनरल झियांच्या राजवटीत नृत्य ‘अश्लील’ म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली होती; तेव्हाही आपला नृत्यवर्ग सुरू ठेवून इंदू मिठा यांनी अनेकांना शिकवले. ‘मी फक्त नर्तक होते, आता मी कार्यकर्तीसुद्धा झाले’- असे या काळ्या कालखंडाबद्दल त्या सांगतात (‘हाऊ शी मूव्हज’ (२०२०) अन्या रझा व आइशा अख्तर यांनी इंदू मिठांवर केलेल्या चरित्रपटात हे वाक्य आहे). हा कार्यकर्तेपणा पुढे नृत्यनाट्यांच्या विषयांमध्ये उतरला. संस्कृती ही प्रांत/ भाषा/ धर्म/ आध्यात्मिक संकल्पना यांवर अवलंबून नसते, तर त्याही पलीकडची सांस्कृतिक एकात्मता मानवजातीला साधता येते, हा त्यांच्या आयुष्याचा संदेश त्यांनी विविध नृत्यनाट्यांतून अनेकपरींनी दिला. उदाहरणार्थ, ‘इंडोनेशियाच्या (आशिया खंडातले सर्वाधिक मुस्लीम जिथे राहातात, त्या देशाच्या) दूतावासात दर्शनी भागात मांडण्यात आलेली सरस्वतीची मूर्ती मी पाहिली’ या अनुभवावर आधारित

‘कसीदा- ए- इल्म-ओ-जमाल’ – म्हणजे बुद्धिकौशल्य व सौंदर्य यांचा संगम- हे नृत्यनाट्य इंदू मिठा यांनी सादर केले. यामीना आणि तेहरीमा या दोन मुलींपैकी धाकटी तेहरीमा यांनी इंदू यांचा वारसा चालवला. तेहरीमा १९९७ पासून अमेरिकेत, वॉशिंग्टन डी.सी.त स्थायिक झाल्यानंतरच पाकिस्तान सरकारला इंदू यांच्या कार्याचे महत्त्व पटू लागले, हा कदाचित योगायोग!