आज आपल्या हातात अत्यंत सहजपणे उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्यांचे योगदान आपण अत्यंत सहजपणे गृहीत धरतो, तसेच काहीसे बी. के. सिनगल यांच्याबाबतीतही म्हणता येईल. प्रदीर्घ आजारपणाने वयाच्या ८२व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या विदेश संचार निगम लिमिटेडच्या एके काळच्या या अध्यक्षाचे आयुष्य नवल वाटावे असे कुठे कुठे भिरभिरत गेले. अंबालामध्ये जन्म, आधी लाहोरमध्ये आणि फाळणीनंतर दिल्लीत  शालेय शिक्षण, त्यानंतर खरगपूरच्या आयआयटीत इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, त्यानंतर लंडन, बुडापेस्टमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या अशा पद्धतीने जगणारे सिनगल १९९१ मध्ये उठून मुंबईत आले आणि त्यांनी विदेश संचार निगमची जबाबदारी घेतली. ३० वर्षांपूर्वी विकसित देशांमधील स्थिरस्थावर आयुष्य सोडून अशा पद्धतीने भारतात येऊन ज्याची बाराखडीदेखील लोकांना माहीत नाही अशा इंटरनेटसारख्या क्षेत्राची उभारणी करण्याचे आव्हान स्वीकारणे ही अजिबातच सोपी गोष्ट नव्हती. परदेशात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या माणसाला व्हीएसएनएलसारख्या लाल फितीतील सरकारी आस्थापनेत काम करणे किती जड गेले असेल याची आज आपण कल्पना करू शकतो. पण तेव्हा तसे करणे हे खरे तर धाडस होते. तसे आपल्याकडे १९९१ मध्ये ईथरनेट वापरात आले होते. पण ते फक्त काही मोजक्या आस्थापनांसाठी होते.

भारतात इंटरनेट सुरू करण्यासाठी सिनगल यांना देण्यात आलेला मुहूर्त होता, १५ ऑगस्ट १९९५. हा ‘भारताचा दुसरा स्वातंत्र्य दिन’ असेल असे माध्यमांनी या दिवसाचे वर्णन केले होते. या प्रकल्पाचा अतोनात ‘हाईप’ केला गेला होता. अशा वेळी व्हायचे तेच झाले. तांत्रिक चुकांमुळे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत पण तिथेच सिनगल यांच्यामधले नेतृत्वगुण दिसले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळय़ा चुकांची जबाबदारी घेतली, आपल्याकडून मूर्खपणा झाला हे कबूल केले आणि स्वत:ला नव्याने कामात गाडून घेतले. पुढच्या दोन – अडीच महिन्यांत अविश्रांत काम करून त्यांनी आणि त्यांच्या चमूने त्या तांत्रिक चुका सुधारल्या आणि मग व्हीएसएनएलने कधीच मागे वळून बघितले नाही. त्यांच्या या योगदानामुळे १९९५ मध्ये इंटरनेट वापरणारा जपान वगळता भारत हा आशियामधला पहिलाच देश ठरला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विदेश संचार निगममधली कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी खासगी क्षेत्रासाठी बरेच काम केले. अनेक ठिकाणी टेलिकम्युनिकेशन या विषयावर भाषणे दिली. अनेक शिक्षण संस्थांमध्ये जाऊन हा विषय शिकवला. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर काम केले. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे सध्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यासह काम केले. पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ‘टेलिकॉम मॅन’ हे आत्मचरित्र लिहिले. इंटरनेट हवे की नको या निवडीला आज कुणालाही वाव नाही, या पायरीवर आज जग येऊन पोहोचले आहे. त्याचा अधिकांसाठी अधिकाधिक सकारात्मक वापर कसा होईल हे पाहणे हीच सिनगल यांना खरी आदरांजली ठरेल.

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान